You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राठोड यांच्यानंतर धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी
उद्धव ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा चव्हाण या तरुणीसोब संजय राठोड यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापार्श्वभूमीवर संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.
काही आठवड्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. पण याप्रकरणात ठाकरे सरकारने वेगळा न्याय का केला? शरद पवार असे धाडस कधी दाखवणार? असे प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही दिशा मृत्यू प्रकरणात आरोप झाले होते. भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेच्या युवा मंत्र्याला वेगळा न्याय का? असा टोला लगावला आहे.
'शिवसेनेच्या युवा मंत्र्यांना वेगळा न्याय का?'
नितेश राणे म्हणाले, "सामान्य शिवसैनिकाला एक न्याय. मग हा न्याय "युवा मंत्री"ला पण लागू होतो. तो राजीनामा कधी?" असा प्रश्न राणेंनी विचारला आहे.
"संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन ठाकरे सरकारने उपकार केले नाहीत. भाजपच्या दाबावामुळे हा राजीनामा घेतला आहे. अठरा दिवस उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिशी घातले. 22 वर्षीय तरुणीचा या प्रकरणात मृत्यू झाला. या तरुणीने गर्भपात केला. याची चौकशी झाली पाहिजे." अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली.
'शरद पवार धाडस कधी दाखवणार?'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आणि त्यांची वैयक्तिक माहिती उघड झाल्यानंतर त्यांचा राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला आहे.
भाजपचे प्रेदेधाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी जे धाडस दाखवलं ते साहस शरद पवार यांनी दाखवणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार मागणी केली होती की धनंजय मुंडे प्रकरणात हाच निर्णय घेतला गेला असता तर सरकारची इज्जत राहिली असती. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे."
'धनंजय मुंडे प्रकरण वेगळं'
दुसऱ्या बाजूला पूजा चव्हाण प्रकरणात सातत्याने संजय राठोड यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र धनंजय मुंडे प्रकरण वेगळं असल्याचं म्हटलं आहे.
संजय राठोड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय. धनंजय मुंडे प्रकरणाबाबत बोलताना मात्र त्यांनी दोन प्रकरणांची तुलना करता येणार नाही असं म्हटलंय.
"तुम्ही धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणात गल्लत करू नका," असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील हा पहिला राजीनामा असल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने गेल्या काही काळात आरोप झालेल्या इतर मंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. यामुळे विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)