You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑपरेशन सायलेंट वायपर : पुण्यात 22 वर्षांनी असा सापडला गँगरेपमधील आरोपी
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ओडिशा पोलिसांनी 1999 साली झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला 22 वर्षांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन दशकांपासून हा नराधम पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याच्या नशिबानं त्याची साथ सोडली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पोलीस पुण्यातील विवेकानंद बिस्वाल यांच्या घरात पोहोचले, तेव्हा आरोपी पळून जाण्याच्या बेतात होता.
ओडिशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधांशु सारंगी यांनी बीबीसीला सांगितलं की, "पोलिसांचं पथक येताना पाहिल्यानंतर त्यानं पळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो पकडला गेला, तेव्हा त्यानं आम्हाला सांगितलं की, मला इथून दूर घेऊन चला. मी तुम्हाला सर्वकाही सांगेन."
विवेकानंद बिस्वाल हा त्या तीन आरोपींमधील एक आहे, ज्यांच्यावर 9 जानेवारी 1999 च्या रात्री 29 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले आहेत.
बिस्वालव्यतिरिक्त आणखी दोन आरोपींवर बलात्काराचा आरोप आहे. प्रदीप साहू आणि धीरेंद्र मोहंती अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. दोघांवर खटला चालला आणि जन्मठेपेची शिक्षाही झाली. यातील प्रदीप साहू याचा गेल्यावर्षी तुरुंगातच मृत्यू झाला.
हल्ला आणि गोंधळ
बलात्कार पीडित महिला तिच्या पत्रकार मित्रासोबत कारने भुवनेश्वरहून कटकला जात होती. त्यावेळी तीन जणांनी भर रस्त्यात त्यांची कार रोखली.
कोर्टातील कागदपत्रांनुसार, बंदुकीचा धाक दाखवत या तिघांनी नियोजित ठिकाणी बलात्कार पीडित तरुणीला घेऊन गेले. पीडित तरुणीवर चार तासांपर्यंत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला धमकी दिली आणि मारहाणही केली. त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान गोष्टी घेतल्या.
या घटनेची क्रूरता आणि काही महत्त्वपूर्ण लोकांविरोधात पीडित महिलेनं केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण बरेच दिवस चर्चेतही राहिलं होतं.
ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री जे बी पटनायक यांचं नावही यात आलं होतं. पीडित महिलेचा आरोप होता की, पटनायक हे त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत, ज्याच्याविरोधात 18 महिन्यांआधी याच महिलेने बलात्काराच्या प्रयत्नांची तक्रार दाखल केली होती.
पीडित महिलेचा आरोप होता की, सामूहिक बलात्कार करणाऱ्यांमधील दोन आरोपींनी तिला धकमावलं होतं आणि त्या अधिकाऱ्याविरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगितलं होतं.
जेबी पटनायक यांनी त्यावेळी त्यांच्यावरील आरोपांना 'राजकीय कट' म्हटलं होतं.
एका महिन्यानंतर जेव्हा जे बी पटनायक यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा वृत्तपत्रांनी छापलं होतं की, हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळणं हे त्यांच्या राजीनाम्यामागचं मुख्य कारण होतं.
एका वर्षानंतर तो अधिकारी बलात्काराच्या प्रयत्नाप्रकरणी दोषी आढळला आणि त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली होती.
गँगरेप प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयलाही बोलावण्यात आलं होतं. मात्र, विवेकानंद बिस्वालच बेपत्ता होता. या बिस्वालला कोर्टानं 'घटनेतील मुख्य आरोपी आणि घटनेचा मास्टरमाईंड' म्हटलं होतं. तसंच, 'बलात्कार करून पीडितेला बेदम मारहाण' करण्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
हे प्रकरण पूर्णपणे शांत झालं होतं आणि यासंबंधी फाईल्स सुद्धा कटक पोलीस ठाण्यात धूळ खात पडल्या होत्या.
'ऑपरेशन सायलेंट वायपर'
त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर आणि कटकचे पोलीस आयुक्त सुधांशु सारंगी जेव्हा चौद्वार तुरुंगात इतर एका प्रकरणाच्या निमित्ताने गेले होते, तेव्हा त्यांची भेट या प्रकरणातील आरोपी मोहंती याच्याशी झाली.
सुधांशु सारंगी सांगतात, "जेव्हा मी त्याच्याशी बोललो, तेव्हा मला कळलं की, या प्रकरणात सहभागी असलेला त्याचा आणखी एक साथीदार अजूनही पकडला गेला नाही. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कार्यालयात परतलो, तेव्हा या प्रकरणाशी संबंधित फाईल्स मागवल्या."
"जेव्हा मी या प्रकरणाच्या फाईल्समधील तपशील वाचला, तेव्हा मला वाटलं की, बेपत्ता असलेल्या आरोपीला पकडणं आवश्यक आहे," असं सारंगी सांगतात.
या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आला - 'ऑपरेशन सायलेंट वायपर '
सारंगी सांगतात, "वायपर (आशियात आढळणारा एक विषारी साप) अशा प्रकारे राहतो की, कुठूनही पळून जाता येईल. अजिबात आवाजही करत नाही, जेणेकरून कुणी पकडू नये. या ऑपरेशनसाठी हे नाव योग्य वाटलं. कारण आरोपीही 22 वर्षांपासून पकडला गेला नव्हता."
या ऑपरेशनसाठी चार सदस्यीय पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. केवळ या चार जणांनाच या ऑपरेशनबद्दल माहिती होती. कुठलीही माहिती लीक होऊ नये, हे यामागचं कारण होतं.
आरोपीला कसं शोधलं?
सारंगी सांगतात, "19 फेब्रुवारीला साडेपाच वाजता मला खात्री पटली की, आम्हाला नेमक्या व्यक्तीबाबत माहिती मिळालीय. 7 वाजता आमचे तिन्ही अधिकारी पुण्याला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसले होते. ओडिशा आणि महाराष्ट्राच्या संयुक्त पोलीस पथकाने दुसऱ्याच दिवशी छापा मारला आणि बिस्वालला अटक केली."
ते सांगतात, बिस्वालची माहिती मिळवायला आणि त्याला पकडायला पोलिसांना तीन महिने लागले.
"जेव्हा आम्ही तपास सुरू केला, तेव्हा आम्हाला कळलं की, तो पत्नी आणि दोन मुलांच्या संपर्कात आहे. त्याच्या नावाची एक जमीन कुटुंबाने विकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पकडला गेला," असं सारंगी सांगतात.
कटक जिल्ह्यातील नारायणपूर गावात त्याच्या घराजवळच एक छोटासा प्लॉट त्याच्या नावावर आहे. या भागाचं वेगानं शहरीकरण होत असल्यानं, प्लॉट विकून चांगले पैसे मिळतील, असं कुटुंबीयांना वाटलं.
कुटुंबीयांच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवून असल्यानं पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले.
पोलिसांना असं आढळलं की, बिस्वालची पत्नी आणि मुलांकडे कुठलीही नोकरी नसल्यानं नियमित उत्पन्नाचं कुठलंच स्रोत नव्हतं. तरीही पुण्यातील कुणा जलंधन स्वांईकडून नियमितपणे खात्यात पैसे पाठवले जातात.
बिस्वालच्या अटकेनंतर त्याची पत्नी गीतांजलीने गेल्या 22 वर्षांत त्याच्याशी संपर्क केल्याच्या गोष्टीला फेटाळलं. गीतांजलीने द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, "गँगरेपच्या घटनेनंतर तो पळून गेला होता आणि आमच्याशी कधीच फोनवर किंवा लपून घरी येऊनही संपर्क केला नाही."
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने विवेकानंद याच्याकडून पैसे घेतल्याला नकार दिला. मात्र, पुण्यातून पैसे पाठवणारा जालंधर स्वांई कोण आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ती व्यक्ती का पैसे पाठवत होती?
बिस्वाल कुठे लपला होता?
सारंगी सांगतात, "भारत मोठा देश आहे. बिस्वाल नोकरी मिळवण्यात यशस्वी झाला होता आणि त्याच्याकडे बँक अकाऊंट, पॅन कार्ड आणि आधार कार्डही होतं."
2007 पासून पुण्यातील अॅम्बी व्हॅलीमधील कामगारांच्या बॅरेकमध्ये तो राहत होता. अॅम्बी व्हॅली अत्यंत उच्चभ्रू अशी टाऊनशिप आहे. भारतातील श्रीमंतांची तिथं घरं आहेत. विवेकानंदच्या गावापासून ही जागा 1740 किलोमीटरहून अधिक दूर आहे.
सारंगी सांगतात, "बिस्वालने तिथे पूर्णपणे एक नवी ओळख बनवली होती. प्लंबरचं काम तो करत असे. अॅम्बी व्हॅलीत काम करणाऱ्या 14 हजार कामगारांपैकी तो एक होता. तिथं त्याच्यावर कुणीच शंका घेत नव्हतं. एखाद्या वायपर सापासारखंच तो तिथं राहत होता."
आधार कार्डवर त्याचं नाव जलंधन स्वांई लिहिलं होतं आणि वडिलांचं नाव पूर्णानंद बिस्वालऐवजी पी. स्वांई लिहिलं होतं. मात्र, गावाचं नाव तेच होतं. पोलिसांना आढळलं की, जालंधर स्वांई नावाची कुणीच व्यक्ती गावात नाहीय.
विवेकानंद बिस्वालने बलात्काराचे आरोप फेटाळले, मात्र त्याच्या खऱ्या ओळखीला त्याने नकार दिला नाही, असं पोलीस सांगतात.
ते म्हणतात, "वेगवेगळ्या स्रोतांशी त्याला भेटवण्यात आलं. त्यात त्याच्या कुटुंबाचाही समावेश होता. पुढील तपासासाठी त्याला सीबीआयकडे सोपवलं आहे."
सोमवारी जेव्हा भुवनेश्वर कोर्टात त्याला हजर केलं गेलं, तेव्हा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी एकच गर्दी केली होती. निळा शर्ट आणि राखाडी पँट घालून अनवाणी पायांनी तो कोर्टात पोहोचला होता. त्याचा चेहरा झाकलेला होता.
"तो आता 50 वर्षांचा आहे. डोक्यावर टक्कळ पडत चाललंय. शारीरीकदृष्ट्या तो ताकदवान राहिला नाही. खरं सांगायचं तर आता तो अत्यंत सामान्य दिसतो," अस सारंगी सांगतात.
आता पुढे काय?
सारंगी म्हणतात, "आता अनेक प्रश्नांची उत्तरं येणं बाकी आहेत. तो पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? 2007 च्या आधी तो कुठे होता? इतक्या वर्षांत तो का पकडला गेला नाही? त्याला नोकरी कशी मिळाली? कुणी त्याची मदत केली होती का?"
हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. विशेषत: यासाठी की, पीडितेनं काही मोठ्या लोकांवर आरोप केले आहेत.
या प्रकरणात काही आव्हानंही असतील. पीडितेला आरोपीची ओळख करून द्यावी लागेल. त्या घटनेला मोठा कालावधी लोटला आहे. त्यानंतर सुनावणी होईल. यात दोष सिद्धही होईल किंवा नाहीही.
सारंगी म्हणतात, "या प्रकरणात दोष सिद्ध व्हावा असं आम्हाला वाटतं. मला वाटतं की, आरोपीने त्याचं बाकी आयुष्य तुरुंगात घालवावं. तुरुंगात मेल्यानंतर त्याचं मृत शरीरच बाहेर यावं."
पीडितेनं सारंगी आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले आहेत. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी इच्छा पीडितेने व्यक्त केली.
पीडितेनं स्थानिक टीव्ही चॅनेलशी बोलताना म्हटलं की, "बिस्वालच्या अटकेची आशाच सोडली होती. मात्र, आता त्याच्या अटकेनं बरं वाटतंय आणि आनंद झालाय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)