पूजा चव्हाण प्रकरणावर उदयनराजे भोसले म्हणतात, 'चुकीला माफी नाही' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'चुकीला माफी नाही, मग उदयनराजे का असेना'

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणावर भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

"चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा ही झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजे का असेना," असं स्वतः भाजप नेते आणि खासदार उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी) राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण प्रकरणावर उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

"लोकशाहीत सर्व लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारीने वागायला हवं. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. चुकीचं केलं असेल तर शासन व्हायलाच हवं. त्याठिकाणी उदयनराजे असले तरी शासन हे व्हायलाच हवं," असं उदयनराजे भोसले म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिव असलेले सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

सीताराम कुंटे हे 1985 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. कुंटे यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं.

पण याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात कुंटे हे निवृत्त होणार असल्यामुळे ते सचिवपदावर केवळ 9 महिनेच काम करू शकणार आहेत.

सीताराम कुंटे हे सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते.

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या ठिकाणी कुंटे यांची वर्णी लागणार आहे.

राज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली असून ही परिस्थिती हाताळण्यास आपण प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया सीताराम कुंटे यांनी यावेळी दिली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

3. रंजन गोगोई यांच्याविरोधात खटल्यास परवानगी नाही

भारतीय न्यायव्यवस्थेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांच्याविरोधात न्यायालयीन अवमानाचा खटला सुरू करण्यास महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी परवानगी नाकारली आहे.

"भारताची न्यायव्यवस्था जीर्ण व मोडकळीस आलेली असून आपण तरी कुठल्या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणार नाही, न्यायालयात लोकांना वेळीच न्याय मिळण्याची शक्यता फार कमी असते," असं वक्तव्य गोगोई यांनी एका मुलाखतीत केलं होतं.

यावर आक्षेप घेत माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी याप्रकरणी रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती.

पण, रंजन गोगोई यांच्या वक्तव्याबाबत आपण विचार केला. त्यांचं वक्तव्य चुकीचं असलं तरी ते न्यायसंस्थेच्या भल्यासाठीच होतं, त्यामध्ये न्यायव्यवस्थेतील कमतरतांवर बोट ठेवलं गेलं होतं. त्यातून न्यायालयीन अधिकाऱ्यांचं प्रतिमाहनन होत नाही, असं वेणूगोपाल म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर महिलेचा छळाचा आरोप, कोर्टात धाव

मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञ महिलेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांपासून (2013 पासून) संजय राऊत आपला छळ करत असल्याचं महिलेने याचिकेत म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली, तसंच हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणं, धमक्या देणे असे प्रकार आपल्यासोबत घडल्याचा आरोप महिलेने केला आहे.

याप्रकरणी दोन याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या असून त्यावरील पहिली सुनावणी 4 मार्चला होईल. ॲडव्होकेट आभा सिंह यांनी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

5. मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपवाले माझ्यावर दिवसभर टीका करतात - राहुल गांधी

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिलायन्स आणि अदानी यांना फायदा पोहोचवत आहेत. हे दोघेही पंतप्रधानांचा वापर स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी करत आहेत. त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी उपयुक्त तर गरिबांसाठी निरुपयोगी आहेत. मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपवाले माझ्यावर दिवसभर टीका करत असतात," अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.

तामिळनाडूच्या थुथुकूडी येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी तसंच भाजपवर हल्लाबोल केला.

आपले पंतप्रधान देशाच्या हितांशी तडजोड करतील, हे चीनला माहीत होतं. गेल्या सहा वर्षांत भाजप आणि संघाने देशातील विविध संस्था आणि माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला चढवला आहे.

देशातील लोकशाही एका फटक्यात संपुष्टात येत नाही. त्यामुळे हळुहळु संस्थांमधील लोकशाही संपुष्टात आणली जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ही बातमी लोकमतने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)