You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमाल खाशोग्जी खून प्रकरणी CIAने युवराज सलमानवर आरोप लावले नाही - डोनाल्ड ट्रंप
अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIAने पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्येसाठी युवराज मोहम्मद बिन सलमान यांना कधीच जबाबदार ठरवलं नाही, असं स्पष्टीकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलं आहे.
खाशोग्जी यांची 2 ऑक्टोबरला सौदी अरेबियाच्या इस्तंबूल येथील दूतावासात हत्या झाली होती. अशा कृत्यासाठी सलमान यांची पूर्वपरवानगी असू शकते, असं अधिकाऱ्यांनी अमेरिकन माध्यमांना सांगितलं होतं.
"अद्याप CIAने तसा निष्कर्ष काढला नाही," असं ट्रंप यांनी फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. "CIAला असं वाटत असण्याची शक्यता आहे. मी तो अहवाल वाचलाय. त्यात त्यांनी तसा काही निष्कर्ष काढलेला नाही. आणि मला हे देखील माहीत नाही की सलमान यांनी हे कृत्य केलं आहे, असा निष्कर्ष कुणाला काढता येईल," ट्रंप म्हणाले.
जमाल खाशोग्जी प्रकरणी सर्वत्र सौदी अरेबिया टीकेचा धनी होत असताना ट्रंप यांनी मात्र त्यांच्याशी अमेरिकेच्या संबंधांची पाठराखण केली आहे. आजही इथे बोलताना त्यांनी दोन्ही देशांमधले संबंध किती महत्त्वपूर्ण आहेत, ही गोष्ट वारंवार सांगितली.
यापूर्वी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की युवराज सलमान यांच्याविरोधात आम्ही काहीही ऐकून घेणार नाही.
काय म्हणाले होते सौदीचे परराष्ट्र मंत्री?
"सौदी अरेबियासाठी आमचं राजघराणं सर्वकाही आहेत. आमचे युवराज आमच्यासाठी अंतिम सत्य आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध आम्ही काहीही ऐकून घेणार नाही," असं सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री बीबीसीशी बोलताना म्हणाले होते.
पत्रकार जमाल खाशोग्जी खून प्रकरणी सौदी अरेबियाची चौकशी करण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत उठली आहे.
त्यानंतर बीबीसीच्या मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लीस ड्युसेट यांच्याशी बोलताना सौदीचे परराष्ट्र मंत्री आदिल अल-झुबैर यांनी पुन्हा दावा केला की 2 ऑक्टोबरला झालेल्या खाशोग्जींच्या खुनात राजकुमार सलमान यांचा हात नव्हता.
अमेरिकेच्या तपास संस्था CIAचं म्हणणं आहे की हा खून सलमान यांच्या आदेशांवरून झाला होता, पण तरीही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या सौदीबरोबरच्या संबंधांची पाठराखण केली आहे. "राजकुमार सलमान यांना त्या घटनेविषयी पूर्वसूचना असेलही आणि नसूसुद्धा शकते," असं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सलमान यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. त्यावर बीबीसीशी बोलताना अल-झुबैर म्हणाले, "सौदी अरेबियामध्ये आमचे नेते आमच्यासाठी सर्वकाही आहे. सौदीच्या दोन पवित्र मशिदींचे संरक्षक (राजे सलमान) आणि आमचे युवराज(मोहंमद बिन सलमान) हेच आमच्यासाठी सर्वकाही आहेत.
"ते प्रत्येक सौदी नागरिकाचं प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक सौदी नागरिक त्यांचा प्रतिनिधी आहे. आणि त्यांच्याविरुद्ध किंवा त्यांना अपमानित करणारी कुठलीही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही," असं परराष्ट्र मंत्री म्हणाले.
CIAच्या तपासाविषयी बोलताना ते म्हणाले की ते "दुष्ट कृत्य" कुण्या गुप्तचर एजंट्सनी केलं आहे. त्यांनी शेजारी राष्ट्र टर्कीला यावेळी विनंतीसुद्धा केली की खाशोग्जी खूनप्रकरणी जे काही पुरावे उपलब्ध आहेत, ते बाहेर लीक करण्याऐवजी सौदीलाही पुरवावेत.
यावरून जर अमेरिका कुठलेही निर्बंध लादण्याच्या तयारीत असेल तर तो दूरदृष्टीने न घेतलेला निर्णय असेल.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी खाशोग्जी खूनप्रकरणी राजकुमार सलमान यांची विशेष चौकशी करावी, अशी विनंती करणारं पत्र रिपब्लिकन नेते बॉब कॉर्कर आणि डेमोक्रॅट नेते बॉब मेनेंडेझ यांनी केली आहे. अमेरिकन कायद्याअंतर्गत या लेखी विनंतीला 120 दिवसांच्या आत उत्तर देण्यास ट्रंप बांधील आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)