You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमाल खाशोग्जींचा खून प्रिन्स सलमान यांच्याच आदेशाने झाला : CIA
पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या खुनासाठी सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच आदेश दिले असावेत, असं CIAला अर्थात अमेरिकेच्या 'सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी'ला वाटतं. CIAशी संबंधित सूत्रांनी या संदर्भातील पुरावे तपासले आहेत, अशी बातमी अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे.
कोणताही पुरावा नसला तरी अशा प्रकारच्या कारवाया सौदीच्या युवराजांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाहीत, असं CIAला वाटतं.
सौदी अरेबियाने हे दावे फेटाळले आहेत.
दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी खाशोग्जींच्या खुनातील गुन्हेगारांना शिक्षा होईल, असं म्हटलं आहे. पापाऊ न्यू गिनी इथल्या एका परिषदेवेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
खाशोग्जी यांचा इस्तंबूल इथल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात 2 ऑक्टोबरला खून झाला होता. टर्कीचा दावा आहे की खशोग्जी यांच्या खुनाचे आदेश वरच्या पातळीवरून आले होते.
वॉशिंग्टन पोस्टने बातमीत म्हटलं आहे की, "युवराजांचा भाऊ प्रिन्स खालेद बिन सलमानने सौदी अरेबियाच्या अमेरिकेतील राजनयीक अधिकाऱ्याला केलेल्या फोन कॉलच्या आधारावर CIAचं असं मत बनलं आहे."
खालेद यांनी खाशोग्जींना फोन केला होता असा संशय आहे. त्यांनी खाशोग्जी यांच्या सुरक्षेची हमी घेत त्यांना दूतावासात जायला सांगितलं होतं, असाही संशय आहे. शिवाय त्यांनी हा फोन भावाच्या सूचनेवरून केला होता, असाही संशयव्यक्त केला जातो.
सौदीच्या दूतावासाने हे आरोप फेटाळले आहेत.
या वृत्तावर व्हाईट हाऊस, परराष्ट्र मंत्रालयाने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांना CIAने काढलेल्या निष्कर्षांची माहिती देण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
खाशोग्जी यांचा खून केलेल्यांनी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना फोन केल्याचं ही म्हटलं जातं.
अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तात संबंधित सूत्राने म्हटलं आहे की, "खशोग्जी यांचा खुनाचा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संबध जोडणारा एकही पुरावा नाही, पण अशा कारवाईसाठी त्यांची परवानगी लागली असणार."
सौदी अरेबियाचं म्हणणं काय?
रियाध इथं झालेल्या पत्रकार परिषदेत उपसरकारी वकील शलान बिन रजीह शलान यांनी 11 जणांवर गुन्हा नोंद झाला असून यातील 5 जणांना फाशीची शिक्षेची मागणी केली असल्याचं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "खशोग्जी यांनी विषारी इंजेक्शन देण्यात आलं, त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे सोपवण्यात आले. "
टर्कीच्या मते हा खून पूर्वनियोजित होता आणि सौदीच्या एजंटांनी हा खून केला.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)