You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पत्रकार खाशोग्जींचा दूतावासात गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे केले'
पत्रकार जमाल खाशोग्जी यांची हत्या कशी झाली याबाबत टर्की सरकारने पहिल्यांदाच अधिकृतरीत्या वक्तव्य केलं आहे. इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात खाशोग्जी येताच त्यांचा गळा दाबण्यात आला, असं टर्कीने म्हटलं आहे.
2 ऑक्टोबरला जमाल खाशोग्जी यांची हत्या झाल्यानंतर जगभरातील मीडियाने ती बातमी उचलून धरली होती. या घटनेच्या काही आठवड्यांनंतर टर्कीने खाशोग्जी यांच्या हत्येबाबत माहिती दिली आहे. पण, दाव्यांबाबत टर्कीने कोणाताही पुरावा दिलेला नाही.
सोमवारी सौदी अरेबियाच्या सरकारी वकिलांसोबत झालेल्या बैठकीत काही ठोस निर्णय झालेला नाही, असं टर्कीचे सरकारी वकील इरफान फिदान यांनी म्हटलं आहे.
सौदी अरेबियाने या बैठकीबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
टर्की सरकार काय म्हणाले?
"जमाल खाशोग्जी यांनी दूतावासाच्या इमारतीमध्ये प्रवेश केला, त्यावेळी सौदीच्या कटानुसार, त्यांचा गळा दाबून हत्या केली. मग, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले," असं टर्की सरकारने म्हटलं आहे.
खाशोग्जी अमेरिकन मीडियामध्ये काम करायचे. ते युवराज सलमान आणि सौदी सरकारचे टीकाकार मानले जायचे.
अजूनपर्यंत त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. पण त्यांची हत्या ही सौदी अरेबियाच्या दूतावासातच झाली, असं टर्की, अमेरिका आणि नंतर सौदी अरेबियानेही मान्य केलं आहे.
सौदी अरेबियाच्या शाही परिवाराकडे बोट?
खाशोग्जी यांची हत्या सौदी अरेबियाने केली आहे, असं सार्वजनिकरीत्या म्हणणं टर्की आता टाळत आहे.
दरम्यान, सौदी सरकारमधल्या वरिष्ठांच्या आदेशाशिवाय ही हत्या झाली नसावी, असं टर्कीच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
पत्रकार जमाल खाशोग्जी यांची हत्या ही 'मोठी चूक' आहे, पण यामध्ये युवराज मोहम्मद बिन सलमान यांची काही भूमिका नाही, असं स्पष्टीकरण सौदी अरेबियानं दिलं आहे.
या घटनेसाठी काही एजंट जबाबदार आहेत, पण या हत्येत सलमान यांचा काही हात नसल्याचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अदल अल झुबेर यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं.
पत्रकार जमाल खशोग्जी यांच्या खून प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असं सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान म्हणाले आहेत. एका व्यापारी संमेलनात बोलताना ते म्हणाले, "हा गुन्हा सौदीसाठी अत्यंत दु:खद आहे. या प्रकरणतून टर्कीसोबत जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दूर केला जाईल."
दरम्यान, टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसीप तय्यप एर्दोगान आणि सौदी अरेबियाचे युवराज यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तपासात सहकार्य करण्यावर एकमत झालेलं आहे.
टर्कीने याआधी त्यांच्याकडे या घटनेच्या व्हीडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगचा पुरावा असल्याचं म्हटलं होतं. पण, टर्कीने असा कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
टर्कीमधल्या मीडियाने सरकारी सूत्रांचा हवाला देत, खाशोग्जी यांना यातना देऊन हत्या केल्याचं म्हटलं आहे.
खाशोग्जी कोण होते?
खाशोग्जी यांचा जन्म 1958मध्ये मदीना येथे झाला होता. अमेरिकेतल्या इंडियाना स्टेट विश्वविद्यालयात त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण पूर्ण केलं.
1980ला सौदीत परतल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एका स्थानिक वृत्तपत्रासाठी ते अफगाणिस्तावरील सोव्हिएट आक्रमणाच्या बातम्या कव्हर करत होते.
यादरम्यान त्यांनी अल्-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचीही भेट घेतली होती. 1980 ते 1990च्या काळात त्यांनी अनेकदा ओसामा बीन लादेनची मुलाखती घेतल्या होत्या.
गेल्या आठड्यात खाशोग्जी यांचा विवाह हतीजे जेंग्गिज यांच्याशी होणार होता. हतिजे यांनी टर्कीमधल्या स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "सौदी अरेबियाच्या कटाविषयी अगोदरच कल्पना असती तर खाशोग्जी यांना दूतावासात मी जाऊ दिलं नसतं. दूतावासामध्ये काही कागदपत्रं घेण्यासाठी ते गेले होते."
या प्रकरणात 18 संशयितांना अटक झाली असून त्यांच्या सौदी अरेबियात खटला चालणार आहे. टर्कीने या संशयितांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)