You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राठोड : 'पूजा चव्हाण प्रकरणी माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही'
वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन करून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
"गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं असेल किंवा समाजमाध्यमं असतील, अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची कृपया बदनामी करू नका," असं संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
"मी गायब झालो नव्हतो. माझे आई-वडील आहेत, मुलबाळं आहे , पत्नी आहेत. त्यांना मी सांभाळत होतो. मुंबईच्या ऑफिसमधूनही माझं काम सुरू होतं. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी होईल असं म्हटलं आहे. चौकशी, तपास सुरू आहे. तपासानंतर सत्य बाहेर येईलच," असं संजय राठोड यांनी पुढे सांगितलं जात आहे.
"आमच्या समाजातील तरुणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, त्याचं आमच्या सर्वच समाजाला दुःख झालं आहे, या घटनेवरून केलं जाणारं राजकारण हे मात्र घाणेरडं आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, या गोष्टीत कोणतंही तथ्य नाहीये," असा दावा त्यांनी केला आहे.
"सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. मी तीस वर्षं सामाजिक जीवनात वावरणारा कार्यकर्ता आहे. अनेक जण भेटतात. फोटो काढतात," असं स्पष्टीकरण त्यांनी व्हायरल झालेल्या फोटोबाबत दिलं आहे.
गुन्हेगाराला जात नसते - चित्रा वाघ
"समाजाला वेठीला धरून मी निर्दोष आहे, असं सांगण्याचा संजय राठोड यांनी केलेला प्रकार केविलवाणा आहे," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं
"तिथे लाख लोक जमा झाले, घोषणा दिल्या तरीही संजय राठोड हेच पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हेगार आहेत, असंच आमचं मत आहे," अस आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
"आज जे संजय राठोड यांनी शहाणपणा दाखवला, तो पंधरा दिवस कुठे होता," असा सवाल वाघ यांनी केला आहे.
"बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जी एकी दाखवली, ती एरव्ही कधी पाहायला मिळाली नाही," असा आरोपही वाघ यांनी केला आहे.
"स्वतः शेण खायचं आणि सगळ्या समाजाला वेठीस धरायचं, हा आता राजकारणातला नवीन ट्रेंड बनला आहे," असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
पोलिसांचा लाठीचार्ज
संजय राठोड यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्तेही आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी इथं जमलेल्या कार्यकर्त्यांनवर लाठीचार्ज केला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड हे चर्चेत आहेत. पण या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलेलं नाही.
वनमंत्री संजय राठोड कुठे आहेत, असा प्रश्नही विरोधक विचारत आहेत. इतके दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहिलेले संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं.
संजय राठोड सहपरिवार पोहरादेवीत आले आहेत. ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतील, संत रामराव बापू आश्रमाला भेट देतील, धर्मपीठावर जाऊन भक्तीधामला भेट देऊन निघून जातील. राठोड माध्यमांशी बोलणार की नाही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही. संजय राठोड यांचा कार्यालयीन प्रतिनिधी पोहरादेवी येथे आला होता, त्यांनी ही माहिती दिल्याचं पोहरादेवीचे जितेंद्र महाराज यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली होती.
"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती.
"यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय. असंही होता कामा नये आणि कोणावर अन्यायही होता कामा नये," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.
2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)