You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोव्हिड टेस्ट बंधनकारक
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोव्हिड संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम लागू केले आहेत. त्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर चेक पोस्ट उभे करत प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश हवा असेल तर 72 तासांच्या आत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र सोबत बाळगणं कर्नाटक प्रशासनाने बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांकडे हे प्रमाणपत्र नसेल त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून पुन्हा महाराष्ट्र राज्यात पाठवण्यात येत आहे.
पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाक्यावर चेक पोस्ट उभा करत गेले 2 दिवस प्रवाशांना प्रवेश नाकारला जात आहे. कोव्हिड निगेटीव्ह प्रमाणपत्र असेल तरच या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे. अनेक प्रवाशांना याची कल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा होत आहे. प्रवेश नाकारल्याने अनेक वाहनं महाराष्ट्रात परतीचा प्रवास करत आहेत.
याबाबत बोलताना बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने महाराष्ट्र हद्दीतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. सर्वाना ही चाचणी सक्तीची असल्याचं हिरेमठ यांनी सांगितलं. कोगनोळी, शिनोळी , कागवाड याठिकाणी चेक पोस्ट उभे करुन तपासणी केली जात आहे. अशी माहिती हिरेमठ यांनी दिली.
वाहने, रेल्वे, हवाई अशा कोणत्याही मार्गाने कर्नाटकात प्रवेश हवा असेल तर 72 तास आधीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असं हिरेमठ यांनी स्पष्ट केले.
तसंच गेल्या 7 दिवसात महाराष्ट्रातून जे कोणी आले असतील त्यांची माहिती घेऊन संबधितांची तपासणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाची बाब म्हणजे केवळ महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना अडवले जात आहे. पण त्याच टोलनाक्यावर कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही तपासणीविना प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
कल्याणसिंग पवार हे मुंबईहून उडुपीकडे प्रवास करत होते. मात्र कोगनोळी टोल नाक्यावर आल्यावर त्यांना अडवण्यात आले. कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळं परत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं.
तर प्रदीप मंगल आणि त्यांचं कुटुंब कोल्हापूरमधून कोगनो ळी या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र आरटीपीसीआर टेस्ट प्रमाणपत्र नसल्याने त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे त्याचं गाव टोलनाक्यापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळं त्यांनी प्रवेश नाकारणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी बेंगळुरूला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स अडवल्याने टोलनाक्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही तासांनी या बसेसना सोडण्यात आले.
कोल्हापूरवरून दररोज ये जा करणाऱ्या महाराष्ट्राच्या बसेस देखील अडवल्याने एसटी प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोगनोळी टोलनाक्यावर 3 एसटी बसेसमधले जवळपास 150 प्रवासी टोलनाक्यावर थांबून होते.
अखेर 2 तासांनंतर या बसेसना परवानगी दिल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या एसटी बसेसमधून कामाच्या निमित्ताने दररोज येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळं यावर तोडगा काय असा सवाल प्रवाशांनी केला.
याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्नाटक सरकार जबाबदारी घेत नसल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले की , केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. कर्नाटक सरकारची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी महाराष्ट्र सरकारने करावी पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला प्रवेश द्यायचा असेल तर तुम्ही टेस्ट करून घ्या. पण अशा प्रकारे प्रवाशांना बंदी घालणं योग्य ठरणार नाही. मग महाराष्ट्र सरकारला देखील बंदी घालावी लागेल.नत्यामुळं आता याप्रकरणी मुख्य सचिवांसोबत आणि कर्नाटक सरकारसोबत बोलून विनंती करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
प्रवाशांना अशा प्रकारे बंदी घातली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळं कर्नाटक सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे असंही पाटील म्हणाले.
तर याबाबत बेळगावच्या पालकमंत्र्यांशी चर्चा सुरू असून यातून मार्ग काढला जाईल असं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितलं.
दरम्यान अनेक प्रवाशांना आरटीपीसीआर प्रमाणपत्र सक्तीचं असल्याची माहिती नसल्याने टोलनाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत पण माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमुळे अनेकांनी प्रवास करण टाळलं असल्याने पुणे बेंगळुरू महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)