शेतकरी आंदोलनः भगतसिंह यांच्या काकांनी जेव्हा कृषी कायद्यांविरोधात 'पगडी संभाल जट्टा' आंदोलन केलं होतं...

    • Author, चमन लाल
    • Role, निवृत्त प्राध्यापक, जेएनयू

भगतसिंह यांनी आपल्या एका लेखामध्ये एकदा लिहिलं होतं- लोकमान्य टिळकांकडे जे तरुण आकर्षित झाले होते, त्यात पंजाबमधले काही तरूणही होते. किशन सिंह आणि माझे काका सरदार अजित सिंह हेही त्यांपैकीच होते.

अजित सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1881 साली जालंधर जिल्ह्यातल्या खटकड कलां गावात झाला. भगतसिंह यांचे वडील किशन सिंह थोरले होते. धाकटे भाऊ स्वर्ण सिंह हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते आणि वयाच्या 23 व्या वर्षीच तुरूंगात असतानाच त्यांचं निधन झालं.

किशन सिंह, स्वर्ण सिंह आणि अजित सिंह या तिघांचे वडील म्हणजेच भगत सिंह यांचे आजोबा अर्जन सिंह काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. या तिन्ही भावांनी जालंधरमधील साईं दास अँग्लो संस्कृत स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा पास केली.

अजित सिंह यांनी 1903-04 साली बरेली कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1904 साली त्यांचा विवाह सुफी विचारणीच्या धनपत राय यांची मानसकन्या हरनाम कौर यांच्यासोबत झाला.

1906 साली दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली कोलकत्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनातील लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या किशन सिंह आणि अजित सिंह यांनी भारत माता सोसायटी किंवा अंजुमन-मुहब्बाने वतन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीशविरोधी पुस्तकं छापायला सुरूवात केली.

ब्रिटिशांनी संमत केले होते तीन कृषी कायदे

1907 साली ब्रिटिशांनी तीन कृषी कायदे संमत केले होते. या कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.

अजित सिंह यांनी शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि संपूर्ण पंजाबमध्ये सभांचं आयोजन करायला सुरूवात केली. त्यांनी या सभांसाठी पंजाबमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते लाला लजपत राय यांनाही बोलावलं होतं.

या तीन कायद्यांबद्दल भगत सिंह यांनी लिहिलं होतं- नवीन वसाहतवादी कायदा, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होऊ शकत होत्या. शेतसारा आणि कालव्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दरही वाढले होते. मार्च 1907 मध्ये ल्यालपूरमधल्या एका मोठ्या सभेत झंग स्याल पत्रिकेचे संपादक लाला बांके दयाल, जे पोलिसांची नोकरी सोडून आंदोलनात सहभागी झाले होते, त्यांनी एक मार्मिक कविता वाचली- पगडी संभाल जट्टा. या कवितेत त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाचं वर्णन केलं आहे. ती प्रचंड लोकप्रिय झाली. या कवितेवरून आंदोलनाचं नावच 'पगडी संभाल जट्टा' असं पडलं होतं.

113 वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. 2020-21 मध्ये दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.

21 एप्रिल 1907 रावळपिंडीमध्ये झालेल्या एका मोठ्या मीटिंगमध्ये अजित सिंह यांनी एक भाषण केलं. ब्रिटिश सरकारला हे भाषण प्रचंड विद्रोही आणि देशद्रोही वाटलं. त्यांच्यावरही तेव्हा 124-ए D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण पंजाबमध्ये अशा 33 बैठका झाल्या आणि त्यांपैकी 19 सभांमध्ये अजित सिंह हे प्रमुख वक्ते होते.

भारतात ब्रिटिश सैन्याचे कमांडर असलेले लॉर्ड किचनर यांना वाटलं की, या आंदोलनानं लष्कर आणि पोलिसांमध्ये शेतकऱ्यांच्या घरातली जी मुलं होती, ती बंड करतील. पंजाबच्या लेफ्टनंट गव्हर्नरनेही आपल्या अहवालात ही शंका व्यक्त केली होती. त्यानंतर ब्रिटीश सरकारने मे 1907 मध्ये हे तिन्ही कृषी कायदे रद्द केले. मात्र आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या लाला लजपत राय आणि अजित सिंह यांना सहा महिन्यांसाठी ब्रह्मदेशातील (त्यावेळेचा बर्मा) मंडालेच्या तुरूंगात पाठवलं. 11 नोव्हेंबर 1907 ला त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

मंडालेहून परत आल्यावर अजित सिंह, सूफी अंबाप्रसाद यांच्यासोबत 1907 साली सुरतमधील काँग्रेस अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गेले. तिथे लोकमान्य टिळक यांनी अजित सिंह यांना 'शेतकऱ्यांचा राजा' म्हणत त्यांच्या डोक्यावर एक पगडी ठेवली. आजही ही पगडी बंगामधील भगत सिंह संग्रहालयामध्ये पहायला मिळतो.

सुरतहून निघाल्यानंतर अजित सिंहनं पंजाबमध्ये टिळक आश्रमाची स्थापना केली. या आश्रमाच्या माध्यमातून टिळकांच्या विचारांचा प्रसार केला जात होता.

परदेशातील क्रांतिकारकांशी संपर्क

अजित सिंह यांच्या बंडखोर विचारांमुळे ब्रिटीश सरकार त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्याचा विचार करत होती. याची कुणकूण लागल्यानंतर अजित सिंह ऑगस्ट-सप्टेंबर 1909 च्या दरम्यान सूफी अंबा प्रसाद यांच्यासोबत जहाजानं कराचीमार्गे इराणला निघून गेले. त्यांनी आपलं नाव बदलून मिर्झा हसन खान असं ठेवलं. याच नावानं त्यांनी ब्राझीलचा पासपोर्टही बनवला होता.

1914 पर्यंत ते इराण, तुर्कस्तान, पॅरिस, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये राहिले होते. तिथे ते केमाल पाशा, लेनिन, ट्रॉटस्की सारख्या परदेशी क्रांतिकारकांना भेटले. लाला हरदयाळ, वीरेंद्र चट्टोपाध्याय आणि चंपक रमन पिल्लई यांसारख्या भारतीय क्रांतिकारकांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतल्या. ते मुसोलिनीलाही भेटले होते.

1914 साली ते ब्राझीलला गेले आणि पुढची 18 वर्षं ते तिथेच राहिले. तिथे ते गदर पार्टीच्या संपर्कात राहिले. गदर संघटनेतील क्रांतिकारी रत्न सिंह उर्फ बाबा भगत सिंह बिलगा यांनाही ते भेटायचे.

तब्येतीसंबंधीच्या काही कारणांमुळे त्यांना अर्जेंटिनामध्येही राहावं लागलं. उपजीविकेसाठी ते परदेशी लोकांना भारतीय भाषा शिकवायचे. त्यांना जवळपास चाळीस भाषा येऊ लागल्या होत्या.

या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबीयांना पहिलं पत्र 1912 साली पाठवलं. आपले सासरे धनपत राय यांना त्यांनी पत्र लिहिलं.

आपल्या काकांचा शोध घेण्यासाठी भगत सिंह त्यांच्या मित्रांना पत्र लिहायचे. या पत्रांना उत्तर देताना प्रसिद्ध लेखिका आणि भारतीय क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या एगनेस स्मेडली यांनी मार्च 1928 मध्ये बीएस संधू लाहौर या नावानं त्यांचा ब्राझीलचा पत्ता पाठवला.

अजित सिंह यांना आपल्या पुतण्याला म्हणजेच भगत सिंह यांना परदेशात बोलवायचं होतं. दुसरीकडे आपल्या काकांचं परदेशातच निधन झालं तर काय, ही काळजी भगत सिंह यांना वाटत होती.

1932 ते 1938 या काळात अजित सिंह युरोपमधील अनेक देशांमध्ये राहिले. त्यातही त्यांचा बराचसा काळ हा स्वित्झर्लंडमध्ये गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते इटलीलाही गेले होते. इटलीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेटले आणि तिथे 11 हजार सैनिकांना घेऊन आझाद हिंद लष्कराची स्थापना केली.

अजित सिंह हे फ्रेंड्स ऑफ इंडिया या संस्थेचे सरचिटणीस होते. या संस्थेचे अध्यक्ष मुसोलिनीचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार ग्रे होते. इक्बाल शैदाई त्याचे उपाध्यक्ष होते.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर प्रकृती खराब असतानाही अजित सिंह यांना जर्मनीतील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटका करण्यासाठी तत्कालिन हंगामी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना हस्तक्षेप करावा लागला. सुटका झाल्यानंतर ते दोन महिने लंडनमध्ये राहिले. त्यांनी तब्येतीकडे लक्ष दिलं आणि 7 मार्च 1947 ला 38 वर्षांनंतर भारतात परतले.

दिल्लीमध्ये ते नेहरुंचे खास पाहुणे होते.

तब्येतीच्या कारणामुळे ते गावी जाऊ शकले नाहीत आणि हवापालटासाठी त्यांना जुलै 1947 साली डलहौसी इथं जावं लागलं. तिथेच त्यांनी 15 ऑगस्ट 1947 साली जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून केलेलं भाषण ऐकलं. हे भाषण ऐकल्यानंतर पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांनी 'जय हिंद' म्हणत जगाचा निरोप घेतला.

डलहौसी इथं पंजपूला या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे. जिथे आजही अनेक लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात.

(चमन लाल हे भारतीय भाषा केंद्र, दिल्लीमधील जवाहर लाल नेहरू विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत तसंच भगत सिंह अर्काइव्हज आणि संशोधन केंद्रात मानद सल्लागार आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)