वॉट्सअॅपचे नवे नियम स्वीकारले नाहीत तर तुमचं अकाऊंट डिलीट होणार?

वॉट्सअॅप युजर्सनी 15 मेपर्यंत वॉट्सअॅपच्या नवीन अटी आणि नियमांचा स्वीकार केला नाही तर त्यांचं वॉट्सअॅप अकाऊंट आता डिलीट होऊ शकतं.

नवीन अटी स्वीकारण्यासाठी वॉट्सअॅपने आता 15 मेपर्यंतची मुदत दिली आहे. असं न केल्यास युर्जर्सना वॉट्सअॅप मेसेज पाठवताही येणार नाहीत आणि त्यांना आलेला मेसेज पाहताही येणार नाही.

कारण वॉट्सअॅप अशा युजर्सचे अकाऊंट इनअॅक्टीव्ह करणार आहे आणि यानंतर हे इनअॅक्टीव्ह अकाऊंट 120 दिवसांनंतर डिलीट होईल.

वॉट्सअॅप कॉल काही दिवसांपर्यंत करता येतील तसंच नोटिफिकेशन्सही काही दिवसांपर्यंत येत राहतील, पण टेकक्रंचच्या एका रिपोर्टनुसार, ही सेवा काही आठवड्यांपर्यंतच सुरू राहणार आहे.

वॉट्सअपने आपले नवीन प्रायव्हसी नियम आणि अटी जानेवारी महिन्यात जाहीर केल्या होत्या. याबाबत मोठ्या संख्यने युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती.

वॉट्सअॅप आता वैयक्तिक डेटा फेसबुकसोबत शेअर करणार अशा प्रतिक्रिया युजर्सकडून येत होत्या. वॉट्सअॅपने मात्र असे आरोप फेटाळले होते. आपले हे अपडेट धोरण व्यवसाय खात्याशी संबंधित असल्याचं वॉट्सअॅपने स्पष्ट केलं होतं.

युजर्सना माहिती देण्याच्या पद्धतीत बदल

व्हॉट्सअॅप आधीपासूनच फेसबुकशी काही प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण करतं. यात वापरकर्त्यांच्या आयपी अॅड्रेसचा समावेश आहे. (हा आयपी अॅड्रेस म्हणजे प्रत्येक डिव्हाइसला जोडलेल्या आकड्यांचा क्रम जो डिव्हाइसचे लोकेशन शोधण्यासाठीही वापरला जाऊ शकतो.) या माध्यमातून खरेदीची माहितीही गोळा केली जाऊ शकते.

युरोप आणि यूकेमध्ये मात्र असे नियम नाहीत. या देशांमध्ये गोपनीयतेचे वेगवेगळे कायदे आहेत.

व्हॉट्सअॅपने नियम बदलल्यानंतर सुरुवातीला व्हॉट्स अॅप युजर्सनी एन्क्रिप्टेड-मेसेजिंग सेवेसाठी इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यामुळे टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या प्लॅटफॉर्मची मागणी अचानक वाढली.

व्हॉट्सअॅपने अपडेट्स लागू करण्याची तारीख सुरुवातीला टाळली. आता मात्र युजर्सना याबाबत माहिती देण्याच्या पद्धतीतही बदल केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)