You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Whatsapp: व्हॉट्स अॅपवरचे मेसेज 7 दिवसांत होणार गायब
व्हॉट्स अॅपवर आता लवकरच डिसअॅपिअरिंग मेसेजस नावाचं एक फिचर आणणार आहे. यामुळे व्हॉट्सअॅपवरचे मेसेज आता सात दिवसांत गायब होतील.
मेसेज पाठवणारा आणि स्वीकारणारा या दोघांकडून हे मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट नाहीसे होतील, अशा प्रकारच्या सेटींगमुळे वापरकर्त्यांना आपला खासगीपणा जपण्यास मदत होईल, असं व्हॉट्स अॅप कंपनीने म्हटलं आहे.
वापरकर्ते त्यांना हवे असलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉट काढून घेऊ शकतात. किंवा ते मेसेज इतरांना फॉरवर्ड करू शकतात, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये या बदलाचं अपडेट उपलब्ध होईल, असं कंपनीने सांगितलं.
व्हॉट्स अॅप कंपनीचे मालकीहक्क फेसबुक या कंपनीकडे आहेत. व्हॉट्स अॅपचे जगभरात 2 अब्जांहून अधिक वापरकर्ते आहेत.
कंपनीने आपल्या ब्लॉगमधून याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ब्लॉगमध्ये कंपनीने म्हटलं, "तुम्हाला आता मेसेज सात दिवसांनी एक्स्पायर होतील, अशी सेटींग करता येईल. पण काय बोलत होता, हे विसरून जाऊ नका."
एप्रिल 2019 मध्ये फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या लोकांचा खासगीपणा जपण्यात येईल, असं ठामपणे सांगितलं होतं. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
फेसबुक ही कंपनी व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रॅम आणि फेसबुक मॅसेंजर या सर्वांच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचं एकत्रिकरण करण्याच्या प्रयत्नात आहे.
फेसबुकची स्पर्धक असलेली कंपनी स्नॅपचॅटने याआधी अशा प्रकारचं फिचर सुरू केलं होतं. त्यातून आपणही असं मेसेज नाहीसे होण्यासाठीचं फिचर सुरू करावं, असा फेसबुकचा विचार होता.
व्हॉट्स अॅपने याआधीच 2017 मध्ये अशा प्रकारचं फिचर सुरू करण्याबाबत म्हटलं होतं. पण हे प्रत्यक्षात येण्यास आजचा दिवस उजाडावा लागला, अशी माहिती तंत्रज्ञानविषयक घडामोडींचे पत्रकार इनग्रिड लुंडेन यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)