You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुघलः जहांगीर बादशहा मध्यरात्री का जेवत असे?
आपल्याला मुलगा नाही, ही बाब अकबर बादहशाहला त्याच्या वयाच्या 27व्या वर्षापर्यंत बोचत होती. 1564 साली त्याला हसन व हुसैन हे दोन जुळे मुलगे झाले, पण ते केवळ एकच महिना या जगात टिकाव धरू शकले.
मग अकबराने त्याचे आवडते संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर प्रतिज्ञा केली की, मला एक मुलगा झाला, तर आग्रा ते अजमेर पायी प्रवास करून दर्ग्यावर माथा टेकेन.
अखेर ईश्वराने अकबराची प्रार्थना ऐकली आणि त्याच्या दरबारी मंडळींपैकी कोणीतरी त्याला सांगितलं की, आग्र्याजवळच्या एका डोंगरात मोइनुद्दीन चिश्ती यांचे शिष्य व पीर सलीम चिश्ती राहतात, ते बादशाहाची इच्छा पूर्ण करू शकतात.
जहाँगीरच्या जीवनावर 'अॅन इन्टिमेट पोर्ट्रेट ऑफ अ ग्रेट मुघल जहाँगीर' हे पुस्तक लिहिणाऱ्या पार्वती शर्मा म्हणतात, "अकबाराकडे जगातील सगळं काही होतं. पण त्याला मूल नव्हतं. याच इच्छेपोटी ते सलीम चिश्ती यांच्याकडे जायला लागले. एके दिवशी अकबराने त्यांना थेट विचारलं, मला किती मुलगे होतील? चिश्ती म्हणाले, खुदा तुला तीन मुलगे देईल. तसंच झालंही. परंतु, चिश्ती यांच्या आशीर्वादाने जन्मलेला सलीम कालांतराने त्यांच्याच मृत्यूला कारणीभूत ठरला."
त्या लिहितात, "एकदा अकबराने त्यांना विचारलं, तुम्ही किती काळ या जगात राहाल? सलीम चिश्ती म्हणाले, शहाजादा सलीम पहिल्यांदा एखादी गोष्ट आठवून दोनदा बोलेल, त्याच दिवशी मी हे जग सोडून जाईन. अनेक दिवस अकबराने सलीमला काहीच शिकवलं नाही. पण एक दिवस सलीमन कोणाच्या तरी ऐकलेल्या दोन ओळ्या पुन्हा म्हटल्या. त्याच दिवशी शेख सलीम चिश्ती यांची तब्येत बिघडायला लागली आणि काही दिवसांनी ते मरण पावले."
बाबरानंतर आत्मकथा लिहिणारा पहिला मुघल सत्ताधीश
थोर मुघल राजांपैकी जहाँगीर हा सर्वांत कमी चर्चिला गेलेला राजा होता, असं म्हटलं जातं. तो दारूबाज होता आणि त्याचं लक्ष सैनिकी मोहिमांऐवजी जगण्यातील सुख-चैन उपभोगण्याकडे जास्त असायचं. पण जहाँगीरचं हे मूल्यमापन रास्त आहे का?
दिल्ली विद्यापीठातील भारतीय महाविद्यालयामध्ये इतिहासाच्या अध्यापक असणाऱ्या अनुभूती मौर्य म्हणतात, "आपल्या जीवनाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करणारा जहाँगीर हा बाबरनंतरचा पहिलाच मुघल बादशाह होता. आपण इतिहास वाचताना थोरवी शोधत असतो. पण जहाँगीरने मोठी सैनिकी मोहीम हाती घेतली नाही, त्यामुळे त्याच्याकडे कधीकधी आपण पुरेसं लक्ष देत नाही. माझ्या मते, जहाँगीर एक अतुलनीय माणूस होता. त्याच्या आत्मकथेमध्ये त्याचे विचार विस्ताराने वाचायला मिळतात. शिवाय तो त्याच्या काळाचं उत्पादन होता."
त्या पुढे म्हणतात, "एका अर्थी तो त्याच्या काळाची एक खिडकी होता. सतराव्या शतकातील माणसाचे विचार काय होते, हे या खिडकीतून आपल्याला पाहता येतं. जहाँगीर बहुतेकदा बुद्धीने व तार्किकतेने त्याच्या अवतीभवतीच्या जगण्याचं निरीक्षण व छाननी करताना दिसतो."
दिवसाकाठी वीस पेले दारू रिचवायचा
जहाँगीर बायका व दारू यांचा शौकीन होता, असं सांगितलं जातं. 'तुझुके-जहाँगिरी' या आत्मकथेमध्ये तो लिहितो त्यानुसार, दिवसाकाठी तो 20 पेले दारू पित असे- सकाळी 14 पेले आणि रात्री 6 पेले. मग ही संख्या कमी करून तो 6 प्याले दारू प्यायला लागला.
पार्वती शर्मा सांगतात, "अठरा वर्षांचा असताना तो एकदा शिकारीवर गेला होता, त्याची गोष्ट त्यानेच लिहिलेली आहे. तिथे त्याला थकायला झालं. थोडी दारू प्यायलात तर थकवा निघून जाईल, असं कोणीतरी त्याला सांगितलं. तो दारू प्यायला आणि त्याला ती खूप आवडली. मग तो रोजच दारू प्यायला लागला. जहाँगीरच्या दोन्ही भावांनाही दारूचं व्यसन लागलं आणि ते दारूमुळेच मरण पावले."
त्या म्हणतात, "बाबरसुद्धा दारू प्यायचा. अकबरसुद्धा कधीकधी दारूची चव चाखत असे. पण शाहजहाँने कधीच दारूला स्पर्शही केला नाही. उलट, आपला मुलगा 24 वर्षांचा होऊनही त्याने अजून दारूचा एक घोटही प्यायलेला नाही, याचा जहाँगीरला खेद वाटत असे."
जहाँगीरने अबुल फजलची हत्या घडवली
अकबर आणि जहाँगीर यांच्या नात्यात कधीच सहजता नव्हती. जहाँगीरने अकबरचा निकटवर्तीय व चरित्रकार अबुल फजल याची ओर्छाचा राजा वीरसिंह देव याच्या हातून हत्या करवली, तेव्हा त्यांच्या नात्यात आणखी कडवटपणा आला. अबुल फजल दख्खनहून आग्र्याला येत असताना त्याची हत्या झाली. या हत्येचं जिवंत वर्णन असद बेग याने 'वाकए- असद बेग' या वृत्तान्तकथनामध्ये केलं आहे.
बेग लिहितो, "वीर सिंहाच्या प्रत्येक शिपायाने चिलखतं घातली होती. त्यांच्या तलवारी व भाले विजेप्रमाणे चमकत होते. वेगाने धावणाऱ्या घोड्यावर बसलेल्या एका राजपुताने अबुल फजलवर तलवारीने इतका जोरदार वार केला की त्याच्या शरीरातून रक्ताचा पाट वाहू लागला. खुद्दा त्याचा घोडाही त्याला चिरडून निघून गेला. घोड्याचं वजन पडूनही तो मरण पावला नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे.
फजल जिवंत असतानाच वीर सिंह तिथे पोचला. त्याच्या शेजारी बसून आपल्या खिशातील पांढरं कापड काढून त्याचं रक्त पुसायला लागला. या वेळी फजलने सगळी ताकद एकवटून बुंदेला प्रमुख असलेल्या वीर सिंहाला विश्वासघात केल्याबद्दल बोल लावले. तेव्हा वीर सिंहाने तलवार काढली व एक वार करून अबुल फजलचं डोकं धडापासून वेगळं केलं."
जहाँगीर बादशाह व्हावा असं फजलला वाटत नव्हतं
अबुल फजलच्या मनात जहाँगीरला आदराचं स्थान नव्हतं, हे खरं आहे. पण या एकाच कारणामुळे जहाँगीरने फजलची हत्या घडवली का?
अनुभूती मौर्य सांगतात, "सिंहासनावर कोणी बसावं यासाठी राजकीय स्पर्धा सुरू होती. अकबराची शारीरिक ताकद मंदावली होती. तो थकलेला होता आणि जहाँगीरला आता पुढील पिढीशी लढायचं होतं."
अनुभूती पुढे म्हणतात, "अकबराला अबुल फजलच्या हत्येविषयी कळलं तेव्हा तो बेशुद्ध पडला. ही हत्या आपण घडवल्याचं जहाँगीर त्याच्या आत्मकथेमध्येही नोंदवतो आणि त्याबद्दल काही खेदही व्यक्त करत नाही. जहाँगीर अबुल फजलच्या मुलाला भेटतो तेव्हाही त्याच्या मनात काही अपराधभाव नसतो. मला बादशाह व्हायचं होतं, आणि अबुल फजल दरबारात पोचला असता तर मी बादशाह झालो नसतो, असं तो स्पष्टपणे लिहितो."
"अबुल फजलचा मुलगा जहाँगीरचा एक अतिशय विश्वासू मंत्री म्हणून पुढे आला, ही एक रोचक बाब आहे," असं अनुभूती सांगतात.
जहाँगीरचं क्रौर्य
17 ऑक्टोबर 1605 रोजी अकबराचं निधन झाल्यावर जहाँगीर मुघल बादशाह झाला. तो खूपच 'मूडी' बादशाह होता, असं म्हटलं जातं. कधी तो एकदम उदार अंतःकरणाने वागत असे, तर कधी एकदम क्रूरतेने वागायचा.
जहाँगीरच्या क्रौर्याचं तपशीलवार वर्णन एलिसन बँक्स फिंडली यांनी 'नूरजहाँ: एम्प्रेस ऑफ मुघल इंडिया' या पुस्तकात केलं आहे.
त्या लिहितात, "नदीच्या काठावरील चाफ्याची काही झाडं कापली, एवढ्याच कारणावरून एका नोकराचा अंगठा कापून टाकण्याची शिक्षा जहाँगीरने दिली होती. नूरजहाँची एक दासी एका किन्नराचं चुंबन घेताना पकडली गेली, तर तिला जहाँगीरने एका खड्ड्यात अर्धं पुरण्याची शिक्षा दिली. वडिलांची हत्या केल्याबद्दल एका माणसाला शिक्षा म्हणून हत्तीच्या मागच्या पायाला बांधून कित्येक मैल ओढून नेण्याचे आदेश त्याने दिले होते."
"जहाँगीरचा मुलगा खुसरो याने बंड केल्यावर त्याला देहदंडाची शिक्षा न देता त्याचे डोळे फोडण्याचे आदेश जहाँगीरने दिले होते."
"अशा प्रकारची शिक्षा दिल्यानंतर जहाँगीरने क्वचितच त्यात बदल केले असतील. आपला मुलगा खुसरोला आंधळा केल्यानंतर जहाँगीरने त्याच्या डोळ्यांवर औषधोपचारही करवले, पण त्याची दृष्टी कधीच परत आली नाही."
नूरजहाँ आणि कबूतर
सिंहासनावर आल्यानंतर सहा वर्षांनी 42 वर्षाच्या जहाँगीरने नूरजहाँशी लग्न केलं होतं. त्या वेळी नूरजहाँचा पहिला नवरा शेर अफगन मरण पावला होता आणि तिचं वय 34 वर्षं होतं.
जहाँगीर व नूरजहाँ यांच्या आरंभिक प्रेमाचं रोचक वर्णन करताना रूबी लाल यांनी 'एम्प्रेस: द एस्टॉनिशिंग रेन ऑफ नूरजहाँ' या पुस्तकात लिहिलं आहे की, "बादशाह जहाँगीर उद्यानात आला तेव्हा त्याच्या दोन्ही हातात कबुतरांचं जोडपं होतं. तेव्हा त्याला एक सुंदर फूल दिसलं. त्याला फूल तोडायचं होतं, पण दोन्ही हातात कबुतरं होती. तेव्हाच एक सुंदर स्त्री तिथून जात होती."
रूबी लाल पुढे लिहितात, "जहाँगीरने त्या स्त्रियाच्या दोन्ही हातात कबुतरं दिली आणि फूल तोडायला वळला. तो परत आला तेव्हा त्या स्त्रीच्या हातात केवळ एकच कबूतर होतं. त्याने दुसऱ्या कबुतराविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'महामहीम, ते तर उडून गेलं.' बादशाहने विचारलं, 'कसं काय?' यावर त्या स्त्रीने हात पुढे करून दुसरं कबूतरही उडवून दिलं नि ती म्हणाली, 'हे असं.'"
जहाँगीर आणि नूरजहाँ यांचा बैलगाडीतून प्रवास
जहाँगीर व नूरजहाँ यांची आणखी एक रोचक कथा जहाँगीरच्या दरबारातील दूत टॉमस रो यांनी त्यांच्या पत्रांमध्ये नमूद केली आहे.
पार्वती शर्मा सांगतात, "एकदा रात्री सर टॉमस रो जहाँगीरला भेटायला जात होता. त्याने दिवसभर बादशाहाची वाट पाहिली. जहाँगीर शिकार करायला गेला होता. अंधार असल्यामुळे मशाली पेटवण्यात आलेल्या होत्या. तेवढ्यात अचानक हुकूम आला, मशाली ताबडतोब विझवून टाकाव्यात.
रस्त्यात जहाँगीरला एक बैलगाडी दिसली आणि बैलगाडी हाकायची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली, मग तो बैलगाडीत बसला व सोबत नूरजहाँलाही बसवलं. बादशाह नि बेगम दोघेही असे बैलगाडीतून महालापर्यंत आले. मुघल साम्राज्याचा बादशाह जहाँगीर बैलगाडीत बसून बैल हाकतोय आणि शेजारी त्याची बेगम नूरजहाँ बसलेय, हे चित्र मला खूप मजेशीर वाटतं."
जहाँगीर रात्रीचं जेवण मध्यरात्री खात असत
जहाँगीरने शेरशाह सुरी यांची जुनी परंपरा टिकवून ठेवली होती. तो महत्त्वाच्या बैठकी स्नानगृहात घेत असे.
शेरशाहाचे केस खूप कुरळे होते, ते सुकायला बराच वेळ लागत असे. जहाँगीर तर त्याचे केसही स्नागगृहात कापून घेत असे.
पार्वती शर्मा सांगतात, "जहाँगीर सूर्योदयापूर्वी उठायचा आणि जनतेला दर्शन द्यायचा. मग पुन्हा आत जाऊन नाश्ता वगैरे करायचा. मग विश्रांती घ्यायचा. दुपारी त्याचा सार्वजनिक दरबार भरत असे. संध्याकाळी तो त्याच्या स्नानगृहात दरबारातील खास लोकांसोबत दारू पीत चर्चा करायचा. मग झोपायला जायचा. त्यानंतर मध्यरात्री उठून जेवायचा."
गुरू अर्जन देव यांना देहदंडाची शिक्षा
शीख गुरू अर्जन देव यांनी जहाँगीरचा बंडखोर मुलगा खुसरो याची मदत केली होती, त्यामुळे जहाँगीर त्यांच्यावर नाराज झाला.
विख्यात इतिहासकार मुनी लाल यांनी जहाँगीरच्या चरित्रात लिहिलं आहे की, "प्रचंड संतापलेला जहाँगीरने गुरू अर्जन देव यांना म्हणाला, 'तुम्ही संत आहात, एक पवित्र व्यक्तिमत्व आहात. तुमच्या लेखी श्रीमंत नि गरीब सगळे सारखे आहेत. मग तुम्ही माझा शत्रू असलेल्या खुसरोला पैसे का दिलेत? गुरू म्हणाले, 'तो प्रवासाला जात होता, म्हणून मी त्याला पैसे दिले, तुमचा विरोधक होता म्हणून नाही. मी पैसे दिले नसते तर मी तुम्हाला घाबरून तसं केलं असं म्हणून लोकांनी माझा धिक्कार केला असता, आणि मी गुरू नानक यांचा शिष्य म्हणवून घेऊ शकलो नसतो.''
ते पुढे लिहितात, "गुरू नानकांचा उल्लेख आल्यावर जहाँगीर नाराज झाले. त्यांनी गुरू अर्जन देव यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि गुरू ग्रंथसाहेबमधील काही भाग हिंदू व मुसलमानांच्या भावना दुखावणारे असून ते भाग काढून टाकावेत, असे आदेश दिले."
यावर गुरू अर्जन देव म्हणाले, "माझ्याकडे जो काही पैसा आहे तो गरीबांसाठी आहे. तुम्ही माझ्याकडे माझे पैसे मागितलेत तर ते सगळे मी तुम्हाला देऊन टाकेन. पण दंड म्हणून मी तुम्हाला एक पैसाही देणार नाही, कारण दंड कपटी व सांसारिक लोकांवर लावला जातो, साधू-संतांवर नाही."
"जहाँगीरने यावर काहीच उत्तर दिलं नाही. तो दरबारातून उठून निघून गेला. दोन दिवसांनी अर्जन देव यांना अटक करून काळकोठडीमध्ये टाकण्यात आलं. तीन दिवसांनी त्यांना रावीच्या तीरावर नेऊन मारून टाकण्यात आलं."
बादशाह असतानाच अपहरण व कैद
जहाँगीरच्या सत्ताकाळातली आणखी एक रोचक घटना आहे. त्याचा सेनापती महाबत खाँ याने त्याचं अपहरण केलं होतं.
अनुभूती मौर्य लिहितात, "त्याने केवळ बादशाहाला अटक केली नाही, तर प्रत्यक्ष त्याला सिंहासनावरून उचलून स्वतःकडे नेऊन ठेवलं. शहाजहाँला त्याने हत्तीवर बसवल आणि त्याच्या मानमरातबाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली. त्याला वाचवायला आलेली नूरजहाँ आणि मग महाबत खाँ पळून जातात. या संपूर्ण प्रकरणादरम्यान जहाँगीर काही कृती करत नाही. या कृतीमागच्या सूचनाही जहाँगीरच्या नाहीत.
या घडामोडी घडत असताना सगळे जण त्याच्याशी आदराने वागतात. पण तो स्वतःच्या सिंहासनावर नाही हे स्पष्ट असतं. या दरम्यान महाबत खाँ त्याच्या समोर येतो, दोघं एकमेकांशी प्रेमाने बोलतात. मी बादशाह आहे, असं महाबत खाँ कधीच म्हणत नाही. तुम्ही चुकीच्या संगतीत आहात आणि मी तुम्हाला चुकीच्या संगतीपासून वाचवतोय, एवढंच तो शहाजहाँला म्हणतो."
आतडीही पुरण्यात आली
तूर्तास नूरजहाँच्या मदतीने जहाँगीर या कैदेतून कसाबसा बाहेर आला. पण तोवर त्याची तब्येत ढासळायला सुरुवात झाली.
28 ऑक्टोबर 1627 रोजी राजौरी व भिंभर या दरम्यान 58 वर्षीय जहाँगीरने जगाचा निरोप घेतला.
त्या दिवशी नूरजहाँ त्याला उठवण्यासाठी गेली, तेव्हा जहाँगीरने डोळे उघडले नाहीत. नूरजहाँच्या डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले आणि मौलाना हिसाम-उद्दीनने बादशाहाच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली.
अनुभूती मौर्य सांगतात, "उपलब्ध तपशिलांनुसार शहाजहाँला दम्याचा आजार होता. उत्तर भारतातील धूळ व उष्णता त्याला सहन होत नसे. त्यापासून बचाव करण्यासाठी तो आयुष्याची अखेरची वर्षं सतत काश्मीरला जात असे. एकदा तिथे जात असताना त्याने आग्रह केला की, त्याच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या सर्वांनीही त्याच्या सोबत जावं. नूरजहाँ तर त्याच्या सोबत होतीच, त्याचा जावई शहरयार व आसिफ खाँ यांनासुद्धा त्यांच्यासोबत जावं लागलं. ते राजौरीमार्गे परत यायला निघाले, तेव्हा त्यांना खाणं-पिणंही शक्य होत नव्हतं."
अनुभूती म्हणतात, "चंगेजघट्टी नावाचं एक ठिकाण होतं, तिथे जहाँगीरने जगाचा निरोप घेतला. त्याचं निधन झाल्यावर त्याच्या शवाला एक लेप लावण्यात आला. त्याची आतडी शरीरातून बाहेर काढून तिथेच पुरण्यात आली. मग जहाँगीरचं शव बसलेल्या स्थितीत पालखीत घालून लाहोरला आणण्यात आलं, तिथे शाही इतमामामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)