मुंबई महापालिका निवडणूक : शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाण्यास काँग्रेसला कशाची अडचण?

राज्यातील आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र लढवाव्यात, हे सूत्र ठरलं आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतीलच. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्याबद्दल चर्चा होईल, असंही राऊत म्हणाले आहेत.

त्यामुळे येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार का, की या निवडणुकीत काँग्रेस एकटी पडणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची याविषयीची काय भूमिका आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, आमचं म्हणणं एकच आहे की, येणाऱ्या निवडणुका सगळ्यांनी एकत्र लढल्या पाहिजेत.

पण, मग काँग्रेस पक्षाला हे मान्य आहे का, काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न कायम राहतो.

याविषयी काँग्रसेची बाजू घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण अद्याप ती मिळालेली नाहीये. काँग्रेस नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर बातमीत अपडेट केली जाईल.

मात्र असं असलं तरी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आधीच म्हटलंय की, मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षानं स्वतंत्र लढवावी.

काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भाषा कशामुळे?

काँग्रेस शिवसेनेसोबत युती करायला टाळत आहे. कारण, काँग्रेसची मुंबईत ताकद आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात.

ते सांगतात, "काँग्रेस शिवसेनेसोबत युती करायला टाळत आहे कारण, काँग्रेसची मुंबईत ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत पक्षाच्या स्थापनेपासून ताकद नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस कधीच मुंबईत रुजली नाही. दुसरीकडे काँग्रेसनं शिवसेनेला मुंबईत वर्षानुवर्षं टक्कर दिली आहे. शिवसेनेसोबत गेल्यास जागावाटप अडचणीचं ठरेल असंही काँग्रेसला वाटत आहे. कारण शिवसेनेसोबत गेल्यास काही मतदारसंघांतील आपलं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी भीती काँग्रेसच्या मनात असणार."

पत्रकार कृष्णात पाटील यांच्या मते, "मुंबईत काँग्रेसचं संघटन चांगलं आहे. शिवसेनेसारखीच संघटनात्मक ताकद काँग्रेसची आहे. समजा एकत्र लढायचा निर्णय झाला, तर शिवसेना काँग्रेसला किती जागा देणार हा प्रश्न येणार आहे."

जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं की, "ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन व्हावी आणि निवडणुका लढववाव्यात, असं ठरलंय. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर इथं पूर्णपणे शिवसेनेची ताकद आहे. तिकडे इतर पक्ष तुलनेत कमी आहेत."

मुस्लीम व्होट बँक

या निवडणुकीत मुस्लीम समाज काय करणार, अशी भीतीही काँग्रेसला वाटत असणार, असं मत संदीप प्रधान व्यक्त करतात.

ते सांगतात, "जर मुस्लिमांनी काँग्रेसचं शिवसेनेबरोबर जाणं स्वीकारलं नसेल तर या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात त्यांची मतं जातील किंवा काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेनं राज्यात भाजपला सत्तास्थापनेपासून रोखलं, असं जर मुस्लीम समाजाच्या मनात असेल तर ते शिनसेनेला मतदान करतील. या दोन्ही शक्यतांमुळे काँग्रेसच्या मनात भीती असू शकते."

कृष्णात पाटील यांच्या मते, "दिवसेंदिवस शिवसेनेचं हिंदुत्व मवाळ होत चालल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मग आपल्या हातातली मुस्लीम व्होट बँक शिवसेनेकडे वळली तर तिला परत आपल्याकडे आणणं कठीण जाईल, हे काँग्रेसला माहिती आहे. त्यामुळे कदाचित काँग्रेस शिवसेनेसोबत जायला तयार नसावी."

"असं असलं तरी शिवसेनेलाही काँग्रेसची गरज आहे. कारण मुंबई महापालिकेत मुस्लिमांचं मतदान जवळपास 24 लाख इतकं आहे. इथं भाजपला टक्कर द्यायची असेल तर मुस्लीम मतं मिळावी, यासाठी शिवसेनेला काँग्रेस सोबत हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर 8 ते 9 नगरसेवक वगळता मुंबईत पक्षाचं फारसं अस्तित्व नाही. राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाऊन आपलं अस्तित्व वाढवायचं आहे," पाटील पुढे सांगतात.

मुंबई महापालिकेतील संख्याबळ

शिवसेना - 86 + अपक्ष 3+ 6 ( मनसेतून आलेले ) = 95

भाजप - 81 + 1 अपक्ष +1 अभासे = 83

काँग्रेस - 29

राष्टृवादी - 8

सपा - 6

एमआयएम - 2

मनसे - 1

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोजरात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)