नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विजयाचा श्री’गणेश’ करू शकेल?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"आता इथं तीन वाघ आहेत. फक्त शिवसेनेचा नाही, तर महाविकास आघाडीचा वाघ म्हणायचं. विचारानं वेगळे असलो, तरी जनतेसाठी एक झालोय."

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं हे विधान.

नवी मुंबईतल्या विष्णूदास भावे सभागृहात महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा झाला. त्यात ते बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या विचारधारांवर चालणारे पक्ष राज्यात एकत्र आले आणि सत्ताही स्थापन केली.

त्यानंतर राज्यातील काही महापालिकांमध्ये महापौर निवडीत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीनं भाजपला धक्का देत सत्तेबाहेर काढलं. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच लोकांसमोर जाणार आहे. याचे संकेत नवी मुंबईतून दिलेत.

नवी मुंबईत महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे. कारण नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यापासून इथं आजवर माजी मंत्री गणेश नाईक यांचं एकहाती वर्चस्व राहिलंय.

1995 साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी गणेश नाईक शिवसेनेते होते. त्यांनी नवी मुंबईत सत्ता मिळवली आणि त्यांचे पुत्र संजीव नाईक हे नवी मुंबईचे पहिले महापौर झाले.

त्यानंतर 2000 साली शरद पवारांच्या उपस्थितीत गणेश नाईकानी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पुढे नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीकडून गणेश नाईकांची सत्ता राहिली.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी गणेश नाईक राष्ट्रवादीच्या 58 नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये दाखल झाले. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळं राज्यात भाजप सत्तेत येऊ शकली नाही. आता महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपचा कस लागणार आहे आणि नवी मुंबईपुरता विचार करायचा झाल्यास गणेश नाईकांचा कस लागणार आहे.

त्यात महाविकास आघाडी दोन महिने आधीच रिंगणात उतरल्याचे नवी मुंबईतल्या वाशीत झालेल्या मेळाव्यानं दाखवून दिलंय.

याच मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, "गेल्या काही काळात इथं एकाधिकारशाही होती. पण त्याला घाबरण्याचं कारण नाही."

नवी मुंबईतली हुकूमशाही बाजूला करण्याची गरज आहे, असंही अजित पवार म्हणाले.

अर्थात, अजित पवारांचा रोख त्यांचेच आधीचे सहकारी राहिलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर होता.

अजित पवार, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण आणि इतर सगळ्यांनीच गणेश नाईकांना निशाणा केला. त्याबाबत बीबीसी मराठीनं गणेश नाईक यांचे पुत्र आणि ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांच्याशी बातचीत केली.

"नवी मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीला एवढ्या लवकर मोर्चेबांधणी करावी लागली, यातच सर्वकाही आलं," असं म्हणत संजीव नाईक यांनी गणेश नाईकांच्या प्रभावाचा उल्लेख केला. ते पुढे म्हणतात, "गणेश नाईकांनी नवी मुंबई शहरासाठी जे केलंय, ते देशानं पाहिलंय. आम्ही सर्वच केलंय असाही आमचा दावा नाही, पण इतर शहरांपेक्षा चांगलंच केलंय. त्यामुळं आम्ही कुणाच्या विरोधात नाही, आम्ही कुणावर टीकाही करणार नाही. विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाऊ."

संजीव नाईक विकासाच्या अजेंड्याबाबत बोलत असले, तरी महाविकास आघाडीनं दोन महिने आधीच तयारी सुरु केलीय. त्यामुळं नवी मुंबईतली निवडणूक चुरशीची होणार, हे उघड आहे.

मात्र, सुमारे तीन दशकांइतका काळ नवी मुंबईवर आपला प्रभाव राखून असलेल्या गणेश नाईकांना आव्हान देणं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शक्य आहे का? याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतलाय.

निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीचे महाविकास आघाडीची तयारी का?

आगामी महापालिका निवडणुकांची अद्याप घोषणा झाली नाहीय. एप्रिलमध्ये राज्यातील काही महापालिकांच्या मुदती संपतील. त्यामुळं एप्रिलमध्ये निवडणुका होतील, हे निश्चित. त्यात नवी मुंबई महापालिकेचाही समावेश आहे.

नवी मुंबईत गणेश नाईकांसारखा नेता भाजपमध्ये दाखल झालाय. त्यामुळं महाविकास आघाडीनं तयारी सुरू केलीय का, असा साहजिक प्रश्न समोर येतो.

'ठाणे वैभव'चे संपादक मिलिंद बल्लाळ मात्र ही शक्यता नाकारतात. ते म्हणतात, "महाविकास आघाडीनं घाई केली नाहीय. तारीख जाहीर झाली नसली, तरी महापालिकेची मुदत संपत आलीय. त्यामुळं पूर्वतयारीचा भाग म्हणजे हा मेळावा असल्याचं मला वाटतं."

शिवाय, "महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्यानं इच्छुक अधिक असतील. त्यामुळं त्यांना शांत करण्याचं आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल," असं म्हणत बल्लाळ पुढे सांगतात, "गणेश नाईकांचं जवळपास तीन दशकं नवी मुंबई भागात वर्चस्व आहे. त्यामुळं त्यांना तिथून हलवण्यासाठी महाविकास आघाडीला तयारीही तेवढी करावी लागेल. त्यामुळं घाई केली असं म्हणता येणार नाही."

शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी कालच्या मेळाव्यातून प्रयत्न झाल्याचे पत्रकार मिलिंद तांबे सांगतात.

तसंच, नवी मुंबई पालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याचं लवकरात लवकर सांगणे गरजेचे होते, ती घोषणा काल करून त्यांनी कामाला लागण्याचे एकप्रकारे आदेशच दिले आहेत, असंही तांबे सांगतात.

एक महत्त्वाची शक्यताही मिलिंद तांबे वर्तवतात. ते सांगतात, "गणेश नाईक हे नवी मुंबईतील मोठं राजकीय नेतृत्व आहे. इथलं राजकारण गेली अनेक वर्षे त्यांच्या बाजूनेच राहिलेलं आहे. गणेश नाईक भाजपात गेल्याने ते इतर पक्षातील नेत्यांना आपल्या गळाला लावून भगदाड पाडण्याची भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असावी. यामुळे गणेश नाईक यांच्या गळाला कुणी लागणार नाही, याची काळजी इतक्या लवकर मेळावा घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली दिसतेय."

'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांना मात्र महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील मेळावा 'सांकेतिक' वाटतो.

प्रधान म्हणतात, "भाजपनं सातत्यानं हा मुद्दा मांडलाय की, ही अनैसर्गिक युती आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी या महाविकास आघाडीत धुसफूस सुरू होऊन पुढे राज्याच्या सत्तेला हादरे मिळतील, असं गृहितक भाजपनं तयार केलंय. हेच गृहीतक खोडून काढण्याची सुरुवात महाविकास आघाडीनं नवी मुंबईतल्या मेळाव्याच्या निमित्तानं सुरु केलीय. आम्ही एकत्र येऊ शकतो, असा संदेश महाविकास आघाडीनं दिलाय. त्यामुळं नवी मुंबईतला मेळावा हा 'सांकेतिक' आहे."

महाविकास आघाडी की गणेश नाईक... कोण कुणाला आव्हानात्मक?

प्रश्न असा आहे की, एप्रिलमध्ये ज्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यात केवळ नवी मुंबईची निवडणूक नाही. मात्र, महाविकास आघाडीनं मैदानात उतरण्याची सुरुवात नवी मुंबईतूनच का केली, याचं कारण अनेक जाणकार 'गणेश नाईक' या नावात असल्याचं सांगतात.

"महाविकास आघाडीसमोर गणेश नाईक यांचं आजही मोठं तगडं आव्हान आहे हे नाकारता येणार नाही. गेली 15 ते 20 वर्ष नवी मुंबईतील राजकारणावर गणेश नाईक यांची पकड राहिलेली आहे. त्यांना थांबवण तेवढं सोपं नाही. आज ही गणेश नाईक यांची ताकद नवी मुंबईत कायम आहे," असं मिलिंद तांबे सांगतात.

नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असं गेल्या काही दशकांचं समीकरण आहे. त्यामुळं गणेश नाईकांशिवाय नवी मुंबई महापालिकेत सत्ता येऊ शकते, हे महाविकास आघाडीला कार्यकर्त्यांना पटवून द्यावं लागेल, असं तांबे सांगतात.

संदीप प्रधानही राजकीय डावपेचांचा संदर्भ देत म्हणतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते. नवी मुंबईसारख्या विकसित होणाऱ्या शहरामधील बंडखोऱ्या रोखणं मोठं आव्हान महाविकास आघाडीकडे असेल. त्यामुळं त्याचा विचार केल्यास, अशी मोठी बंडखोरी झाल्यास गणेश नाईक फायदा उठवतील."

नवी मुंबईत महाविकास आघाडीसाठी नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे, गणेश नाईक पक्षात नसल्यानं राष्ट्रवादी रिकामी झालीय, तर काँग्रेसची पुरेशी ताकद नवी मुंबईत नाहीय आणि दुसरी बाजू म्हणजे, शिवसेनेमुळं महाविकास आघाडीला बळ आलंय. कारण सेनेची नवी मुंबईत ताकद आहे.

"शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने प्रामाणिकपणे निवडणूक लढवली तरी नक्कीच गणेश नाईक यांच्यासमोर ते एक आव्हान उभे करू शकतील... इतकंच नाही तर नाईक यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग ही लागू शकतो," असा अंदाज मिलिंद तांबे वर्तवतात.

"महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसातील निवडणुका पाहिल्या, तर तीन पक्ष एकत्र आल्यावर भाजपला फटका बसतो. त्यादृष्टीनं विचार केल्यास महाविकास आघाडीचं जागावाटप नीट झालं, बंडखोरी झाली नाही, तर नवी मुंबईत त्यांची कामगिरी चांगली राहील," असं संदीप प्रधान म्हणतात.

मंदा म्हात्रेंची भूमिका काय राहील?

गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोन्ही नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. मात्र, दोन्हींचा राजकीय स्वभाव, मुद्दे आणि इच्छा-आकांक्षा एकमेकांना स्पर्धक स्वरुपात राहिलेत.

गणेश नाईकांना ज्यावेळी भाजपनं पक्षात घेतलं गेलं, त्यावेळी मंदा म्हात्रे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक की मंदा म्हात्रे, कुणाला तिकीट मिळणार, अशीही चर्चा झाली. मात्र, भाजपनं मंदा म्हात्रेंना झुकतं माप दिलं.

नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक सिनियर आणि भाजपमध्ये मंदा म्हात्रे सिनियर आहेत.

असं असलं तरी नवी मुंबई महापालिकेचा विचार करता, गणेश नाईक हेच सरस ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्यातला वाद नवी मुंबई महापालिका निवडणुकीतून उफाळून येण्याची शक्यताही जाणकार वर्तवतात.

"गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात विस्तव जात नाही, ही गोष्ट लपली नाहीय. एकाला शांत करायला जावं, तर दुसरा आक्रमक होईल, अशी स्थिती भाजपची होईल," असा अंदाज वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ व्यक्त करतात.

मनसे स्वबळावर लढणार की भाजपसोबत जाणार?

काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना यांची एकत्रित महाविकास आघाडी आणि गणेश नाईकांच्या नेतृत्त्वात भाजप अशी केवळ लढत नवी मुंबईत नसेल. कारण यात आणखी एक खेळाडू आहे, तो म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष.

नवी मुंबई शहरातील दोन विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत मनसेने जवळपास 50 हजार मतं मिळवली होती. त्यामुळं मनसे स्वबळावर लढणार की कुठल्या पक्षाच्या सावलीत उभी राहणार, हे पाहावं लागेल.

भाजपसोबत जाणार का, या प्रश्नावर मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "स्वतंत्र लढणार हेच सध्यातरी चित्र आहे. माझ्या पातळीवर तरी आम्ही एकला चलो रेची भूमिका आहे. भाजपला यायचं असल्यास, त्यांनी अॅप्रोच व्हावं. आम्ही कुणाच्याही दारात जाणार नाही."

"गेल्या विधानसभा निवडणुकीत नवी मुंबई शहरातील 15 ते 20 वॉर्डांमध्ये मनसेला सेना-भाजपच्या उमेदवारापेक्षा 50-100 मतं जास्त मिळाली, तर इतर 15-20 वॉर्डांमध्ये जवळपास हजार मतांचा फरक राहिलाय. त्यामुळं आमची इथं ताकद आहे," असंही गजानन काळे म्हणाले.

बीबीसीनं याबाबत संजीव नाईक यांनाही प्रश्न विचारला, तर ते म्हणाले, "नवी मुंबईत मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यांची मतं आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर काहीच अद्याप चर्चा झाली नाही. मनसेसोबत युती करण्याची आज तरी निर्णय नाही. पक्षानं तसं काही स्पष्ट केलं नाही."

भाजपसमोर मनसेचा पर्याय असल्याचं संदीप प्रधान म्हणतात.

"स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिघांसमोर एकट्यानं लढण्यापेक्षा सोबत कुणी असेल तर चांगलं असतं. मात्र, मनसेची ताकद पाहावी लागेल, मनसेला इथं लढण्यास किती रस आहे, हे पाहिलं जाईल. कारण नवी मुंबईत गणेश नाईकांमुळे सगळे पक्ष निष्प्रभ राहिलेत. पण मनसे नक्कीच पर्याय आहे," असं प्रधान यांना वाटतं.

एकूणच महाविकास आघाडीनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ नवी मुंबईसारख्या काहीशा आव्हानात्मक असणाऱ्या भागातूनच फोडल्यानं, निवडणुका चुरशीच्या होतील, यात शंका नाही. आता यापुढे होणाऱ्या राजकीय घडामोडी कशा असतील, त्या घडामोडींचा नवी मुंबईसह इतर महापालिकांच्या समीकरणांवर कसा प्रभाव पडेल, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)