गणेश नाईक : युनियन लीडर ते मंत्री, आता साम्राज्य वाचवण्यासाठी भाजप प्रवेश?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बेलापूरच्या खाडीकिनारी 301 चौरस मीटरवर बांधलेलं अलिशान 'ग्लास हाऊस' पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आणि नवी मुंबईतील राजकीय क्षेत्रात दोन दशकं आपला दबदबा निर्माण करणाऱ्या गणेश नाईक यांना जोरदार धक्का बसला.

ग्लास हाऊस जरी नाईकांच्या भाच्याचं होतं, तरी ते वाचवण्यासाठी नाईकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासूनच एक एक पायरी वर चढत गेलेल्या नाईकांच्या राजकीय साम्राज्याला तो पहिला धक्का होता.

युनियन लीडर ते राजकीय नेता

15 सप्टेंबर 1950 रोजी ठाणे जिल्ह्यातल्या खैरणे-बोनकोडे गावात जन्मलेल्या गणेश नाईक यांचा सार्वजनिक जीवनातला वावर ऐंशीच्या दशकात सुरू झाला. पनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत युनियन लीडर म्हणून काम करत असताना आक्रमक कामगार नेता म्हणून ते उदयास आले.

दरम्यानच्या काळातच शिवसेना मुंबईची वेस ओलांडून बाहेर पडत होती. नवी मुंबईत आपल्या युनियनमुळे ओळख निर्माण करू लागलेल्या नाईकांची सेना नेत्यांशी गाठभेट झाली आणि ते शिवसेनेत दाखल झाले. इथूनच गणेश नाईकांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

"गणेश नाईक यांचं राजकारण आणि दिवंगत आनंद दिघे यांचं समाजकारण हे समकालीन. मात्र, गणेश नाईक मूळचे ठाणेकर असले तरी त्यांनी नवी मुंबईकडेच आपलं लक्ष ठेवलं. त्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने झाली. या वाढीला वावही मिळाला," असं ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ म्हणतात.

शिवसेना सोडली आणि पराभवही पदरी पडला!

नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून 1990 साली गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे 1995 साली जिंकले आणि त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. या काळात गणेश नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं. इथेच गणेश नाईक यांच्या शिवसेनेतील नाराजीची ठिणगी पडली.

गणेश नाईक यांचा प्रवास जवळून पाहणारे सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा सांगतात, "युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आलं. मनोहर जोशी, नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं. गणेश नाईक यांनाही त्या पदाची आशा होती. ते स्वत:ला त्या योग्यतेचे समजत होते. मात्र, मुख्यमंत्रिपद नाहीच, पण पर्यावरण मंत्रिपद देऊन त्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांपासूनही बाजूला सारलं गेलं म्हणून ते नाराज झाले."

गणेश नाईक हे कायमच महत्त्वाकांक्षी राजकारणी राहिले आहेत. मात्र, राजकीय वाटचालीसोबत विकासात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते पुढे जात राहिले आहेत, असं बल्लाळ सांगतात.

पुढे गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी ठाण्यात शिवसेनेचं नेतृत्त्व आनंद दिघे करत होते. शिवसेना सोडल्यानतंर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर बेलापुरातून आनंद दिघे यांनी अत्यंत नवख्या अशा सीताराम भोईर यांना उभं केलं आणि गणेश नाईक पराभूत झाले.

आधी शिवसेनेत मंत्रिपदाबाबत भेद आणि राजकीय जीवन ऐन भरात असताना शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराकडून झालेला पराभव नाईकांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जातं.

नंतर 2004 आणि 2009 या दोन्हीवेळा पुन्हा ते जिंकले. मात्र, 2014 साली गणेश नाईकांना भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभूत केल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या फळीतल नेते असलेल्या गणेश नाईकांचा पराभव झाल्याने राज्यभर चर्चा झाली होती.

नवी मुंबईच्या विकासाची चर्चा

नवी मुंबईच्या विकासाची चर्चा नेहमीच देशभर होत असते. कधी स्वच्छ शहरांच्या यादीत असल्याने तर कधी वाहतुकीमुळे. गणेश नाईक नेहमीच या विकासाचं श्रेय घेत आले.

"नवी मुंबई व्यवस्थित विकसित होत गेली, याचं कारण सिडको सारखी संस्था तिथे आहे. पण अर्थात, सिडकोला लोकप्रतिनिधी म्हणून गणेश नाईक यांनी सहकार्य करण्यात मागे-पुढे पाहिलं नाही," असं राजीव मिश्रा सांगतात.

मिलिंद बल्लाळ म्हणतात, गणेश नाईक यांनी राजकीय वजन टिकवत असताना नवी मुंबई शहराकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांच्यावरील आरोप झाले, मात्र शासन-प्रशासनाच्या मदतीने शहराची बांधणी केली.

नवी मुंबईच्या विकासाची चर्चा सुरू असतानाच गणेश नाईक यांच्यावरी आरोपही होत राहिले. नाईकांच्या भाच्याचं 301 चौरस मीटर जागेवर बांधलेलं ग्लास हाऊस असो वा एमआयडीसीच्या जागेवरील 33 एकरावर बांधलेलं बावखळेश्वर मंदिर असो, नाईक वादातही अनेकदा अडकले.

यातील ग्लास हाऊस आणि बावखळेश्वर मंदिर दोन्ही जमीनदोस्त करण्यात आलं. या दोन्ही वेळा गणेश नाईक यांना धक्का बसला.

घराणेशाहीची टीका

गणेश नाईक हे जरी युनियन लीडर म्हणून राजकारणात आले असले, त्यांना जरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसली, तरी पुढे नाईकांनी मुलगा, पुतणे आणि कुटुंबातल्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर विराजमान केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाहीला 'बळ' देण्याचं कामही त्यांनी केलं, असं राजीव मिश्रा सांगतात.

गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक हे ठाण्याचे खासदार होते. धाकटे पुत्र संदीप नाईक ऐरोलीचे आमदार आहेत. पुतणे सागर नाईक नवी मुंबईचे महापौर होते. नवी मुंबईत 'नाईक कुटुंब' कायमच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं आणि विरोधकांनीही नाईकांच्या घराणेशाहीवर कायम बोट ठेवलं.

नाईकांनी भविष्यातले पडसाद ओळखले?

गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणुकीआधीच पक्षांतर का केलं नाही, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आश्चर्य व्यक्त करतात. ते पुढे म्हणतात, "नवी मुंबई विमानतळाचा मुद्दा असो वा स्थानिकांचे अनेक प्रश्न असो, इतकी वर्षे नवी मुंबईत सक्रिय राहिलेल्या नाईकांना बाजूला ठेवलं जात होतं. त्यामुळे ते आज ना उद्या सत्ताधारी पक्षात जातील, ही शक्यता होतीच."

गणेश नाईक हे भाजपमध्ये गेल्यामुळे नवी मुंबईतील राजकारणात मोठे पडसाद उमटतील, असं मिलिंद बल्लाळ सांगतात. ते म्हणतात, "गणेश नाईक यांना अहोरात्र विरोध करणाऱ्या मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील भाजपच्या आजच्या घडीला प्रमुख नेत्या आहेत. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी ठेवणं भाजपला अवघड जाईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)