पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंह यांनी आज सोलापुरात भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.

याआधी, शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह यांनीसुद्धा भाजपा-सेनेत दाखल झालेल्या इतर नेत्यांप्रमाणेच एक सभा घेतली होती. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देणार असून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी या सभेत जाहीर केलं होतं.

जगजीत सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश का घेतला असावा याचा वेध बीबीसी मराठीने घेतला आहे.

मागच्या सहा महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात 'आऊटगोईंग' झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जात आहेत.

विशेष म्हणजे, भाजपच्या 'मेगाभरती'पेक्षाही राष्ट्रवादीची 'मेगागळती' मोठी असल्याचं लक्षात येईल. राधाकृष्ण विखे पाटील - सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील - विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड - वैभव पिचड, यांच्या पंक्तीत आता पद्मसिंह आणि राणाजगजितसिंह पाटील पिता पुत्राची जोडीही जाऊन बसली आहे.

पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशावरून पवारांना मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. भाजप-सेनेत जाणाऱ्या इतर कोणत्याही नेत्यांबाबत बोलताना शरद पवारांचा संयम ढळल्याचं दिसून आलं नाही.

पण पद्मसिंह पाटलांबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया वेगळीच होती. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका कार्यक्रमासाठी अहमदनगरला आले होते. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने "राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्यात तुमचे 'नातेवाईक' पद्मसिंह पाटील यांचाही समावेश आहे," असा प्रश्न विचारला.

पण या प्रश्नावर शरद पवार संतप्त झाले. "ही सभ्यता नाही. तुम्ही माफी मागा. अन्यथा चालते व्हा," असं त्यांनी त्या पत्रकाराला सुनावलं. तसंच जागेवर उठून जाण्यासही शरद पवार निघाले होते. मात्र नंतर राष्ट्रवादीचे अविनाश आदिक व ज्येष्ठ पत्रकारांच्या मध्यस्थीनंतर त्यावर पडदा पडला.

नंतर बोलताना शरद पवार म्हणाले, "माजी आमदार चंद्रशेखर कदम हे भाजपचे आहेत. ते माझे नातेवाईक आहेत. ते सुद्धा इथं आले आहेत. राजकारण आणि नातं म्हणून इथं कोणी एकत्र आले आहेत का? असा सवाल शरद पवार यांनी केला.

पवार पुढे म्हणाले, "अनेकांचे नातेवाईक वेगवेगळ्या पक्षात असतात. राजकारणात नातेगोते मी पाहत नाही. पद्मसिंह पाटील हे माझे मित्र आहेत."

शरद पवार असं किती जरी म्हणत असले तरीही पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा फटका बसणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातलं राजकारण गेल्या 40 वर्षांपासून पद्मसिंह पाटील यांच्याच अवतीभोवती फिरत होतं.

पद्मसिंह पाटील नेमके आहेत कोण?

पद्मसिंह पाटील यांना डॉक्टर, पहेलवान या नावांनीही ओळखलं जातं. 1974 दरम्यान त्यांचा शरद पवारांशी संपर्क आला. खरं तर शरद पवारांचं बोट पकडूनच ते राजकारणात आले, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही.

त्यानंतर पवारांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव मोजण्यात येत होतं. सुरूवातीला जिल्हा परिषद, नंतर आमदारकी आणि मंत्रिपद, खासदार अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं. उस्मानाबादमध्ये डॉक्टरांची ऐट वेगळी होती, असं त्यांना जवळून पाहणारे लोक म्हणत.

उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी उस्मानाबादचं राजकारण जवळून पाहिलं आहे बीबीसीनं त्यांच्याशी संपर्क साधला.

नानासाहेब सांगतात, "1974 ला उस्मानाबादमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचं तिकीट मागितलं होतं. त्यावेळी निरीक्षक म्हणून आलेल्या शरद पवार यांनी त्यांना हेरलं. पुढे शरद पवार यांनी त्यांना बळ दिलं.

"अनेक राजकीय खलबतांनंतर पद्मसिंह पाटील यांना तिकीट मिळालं. त्यानंतर सुरू झालेली डॉक्टरांची राजकीय घोडदौड 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती. यादरम्यान त्यांना पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे व्यक्ती म्हणून ओळखलं जाऊ लागलं," असं नानासाहेब सांगतात.

वादग्रस्त व्यक्तिमत्व

पद्मसिंह पाटील नेहमीच एक आक्रमक नेते राहिले आहेत. त्यांचे अनेक किस्से उस्मानाबाद तसंच राज्यभरात लोकप्रिय आहेत. पद्मसिंह पाटील आणि त्यांचा पांढरा घोडा यांची चर्चा नेहमीच व्हायची. घोड्यावर मांड टाकून ते शहरात फिरत असायचे. त्याशिवाय बुलेट ही त्यांची आवडती गाडी आहे. 2004 च्या निवडणुकीतील पत्रकांचा मुद्दाही बराच गाजला.

पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अण्णा हजारेंनी मोहीम उघडली होती. तेरणा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप होता. हे आरोप पद्मसिंहांनी फेटाळले होते. अण्णा हजारेंना जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार पद्मसिंह यांच्याविरोधात दाखल झाली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

तेरणा सहकारी साखर कारखाना तसंच कारगिल आणि गुजरातमधल्या भूकंपांनंतर मदतनिधी प्रकरणातील गैरव्यवहारात त्यांचं नाव आलं. 2006 मध्ये उस्मानाबादचे काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली. या प्रकरणात संशयाची सूई पद्मसिंह पाटील यांच्यावर गेली. सीबीआयने या प्रकरणी त्यांना 2009मध्ये अटक केली होती.

मुलाचा जम बसवला

पद्मसिंह सलग सात वेळा आमदार राहिले. कालांतराने त्यांना मंत्रिपदंही मिळत गेली. त्यामुळे एक ताकदवान नेता म्हणून त्यांना ओळखलं गेलं. त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांना सुरूवातीला विधान परिषद सदस्य बनवण्यात आलं. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतानाही त्यांना मंत्री बनवण्यात आलं होतं.

पुढे त्यांनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवली. 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवण्याची कामगिरी राणा जगजितसिंह यांनी केली होती. अखेरीस त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

"मागच्या पाच वर्षांत आपण जनतेसाठी अनेक आंदोलनं केली. लोकांचे विषय मार्गी लावण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावली. आपलं आपण हा निर्णय घेत आहोत. या प्रक्रियेमध्ये तुमची साथ आवश्यक ठरणार आहे. संपूर्ण बळ तुम्ही आहात. आपण 20 वर्षांपासून संघर्ष करत होतो, करत राहू," असं राणा जगजितसिंह म्हणाले.

भाजप-सेनेतच प्रवेश का?

पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "पद्मसिंह पाटील समाजवादी काँग्रेस होती तेव्हापासून ते पवारांच्या सोबत होते. सुरूवातीपासूनच ते शरद पवार यांचे कार्यकर्ते आणि समर्थक राहिले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्रीसुद्धा राहिले होते. पवारांनी त्यांच्यासारखे अनेक लोक तयार ठेवले होते."

चोरमारे पुढे सांगतात, "पवारांच्या प्रत्येक टप्प्यात पद्मसिंह त्यांच्या सोबत राहिले. त्याचप्रमाणे पवारसुद्धा पद्मसिंहांच्या पाठीशी होते. पवनराजे खूनप्रकरणात पद्मसिंह यांच्यावर आरोप झाल्यानंतर पवार त्यांच्यासोबत होते. त्यांनी गुणदोषांसकट पद्मसिंहांना स्वीकारलं होते. वाईट काळातसुद्धा त्यांनी अंतर दिलं नाही. तरीसुद्धा ते पक्षांतर करत आहेत, यामागे इतर कारणं असू शकतात."

"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या बाजूने काहीतरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षी होती. पण मुळात उलट घडलं. त्यामुळे एक टर्म विरोधात राहिलेल्या नेत्यांनी हळुहळू बाहेर पडण्यास सुरूवात केली." चोरमारे सांगतात.

"यातील बहुतांश नेत्यांच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने यांसारखे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही आधीच बंद पडले आहेत. संस्था चालवण्यात अडचणी येत असतात. सरकारी यंत्रणा कधीही कोणत्याही संस्थेला अडचणीत आणू शकते. त्यामुळे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे नेत्यांना नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत," असं विजय चोरमारे यांना वाटतं.

"काही लोक पदांसाठी चालली आहेत. काही लोक पद मिळालं नाही तरी चालेल पण सत्तेचं संरक्षण मिळवणं हा एकमेव उद्देश यामागे आहे. सत्ताधाऱ्यांची कृपादृष्टी असल्यानंतर संस्था नीट राहू शकतात.

"पद्मसिंह पाटील तर वयामुळे जवळपास राजकारणातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या काही इच्छा अपेक्षा असण्याची फारशी शक्यता नाही. राणा जगजितसिंह यांचाच भाजपमध्ये जाण्याचा जास्त आग्रह आहे. पद्मसिंह पाटलांची शरद पवार यांच्यावर कितीही निष्ठा असली तरी राणा जगजितसिंह यांचीसुद्धा काही गणितं असू शकतात. त्यामुळे मुलगा चाललाय आणि उतारवयात आपण दुसऱ्या पक्षात राहून काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो." चोरमारे सांगतात.

राणा जगजीत सिंह यांच्या भाजप प्रवेशावर भाजपची प्रतिक्रिया

गंभीर आरोप असणारे नेते एकामागून एक भाजपमध्ये दाखल होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

माधव भांडारी सांगतात, "अजून त्या खटल्याचा निकाल लागलेला नाही. पक्षात प्रवेश दिला म्हणजे लगेच उमेदवारी दिली असा अर्थ नसतो. गेली कित्येक वर्षे पद्मसिंह पाटील निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आहेत. निवडणुकीच्या राजकारणात राणा जगजितसिंह पाटील आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत."

ते पुढे सांगतात, "महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात साखर उद्योग क्षेत्र अडचणीत आहे. ते काँग्रेसच्या राजवटीपासून अडचणीत आले, एनपीएमध्ये गेले. ते सत्तेत असतानासुद्धा त्यांच्यावर ती वेळ आली होती. ज्यांनी अनेक वर्षे एकाच पद्धतीने राजकारण केलं होतं. एकाच विचारसरणीचं राजकारण केलं होतं. त्यांनी बदल स्वीकारला आहे. ते पूर्णपणे विचार करूनच भाजपमध्ये दाखल होत आहेत."

वैयक्तिक कारणांसाठीच निर्णय

राणा जगजीत सिंह यांनी राष्ट्रवादी सोडण्याची अनेक कारणं सांगितली. लोकांचा विकास या पक्षात राहून होत नसल्याचं म्हटलं यात तथ्य आहे का?

"नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना मतदारसंघाचा विकास, कार्यकर्त्यांची इच्छा वगैरे काहीही कारणं सांगत असले तरी त्यांना सत्तेपासून दूर राहायची इच्छा नसते. यामागे वैयक्तिक स्वार्थ हे मूळ कारण आहे," ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात.

चोरमारे पुढे सांगतात, "विरोधात असलो तर मतदारसंघाचा विकास होत नाही असं काही नसतं. प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान निधी मिळत असतो. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी संपूर्ण हयात विरोधातच घालवली आहे. त्यांच्या मतदारसंघाचा काहीच विकास झाला नाही का? त्यामुळे वर्षानुवर्षे एका पक्षात राहिलेल्या नेत्यांच्या पक्षांतरामागे वैयक्तिक स्वार्थाशिवाय इतर कोणतंही कारण असण्याची शक्यता नाही."

पद्मसिंह पाटील यांनी भूषवलेली पदे

1975 ते 1978 - उस्मानाबाद जिल्हापरिषद सदस्य

1975 ते 1978 - उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे बांधकाम समिती सभापती

1978 ते 2009 - विधानसभा आमदार

1978 ते 1980 - उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री,

1986 ते 1988 - उपसभापती, विधानसभा

1995 ते 1999 - विरोधी पक्ष उपनेता

1999 ते 2002 - उर्जा व जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार

2002 ते 2004 - जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार

2009 - लोकसभा खासदार

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)