You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शरद पवारांना पंतप्रधान होण्याचं स्वप्न अजून पडतं का?'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जेष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात जाहीर मुलाखत घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आम्ही बीबीसी मराठीनं वाचकांना विचारलं होत की राज ठाकरेंनी पवारांना कोणते प्रश्न विचारावेत, हे तुम्ही सुचवा.
वाचकांनी राज ठाकरेंना अनेक प्रश्न सुचवले. त्यातलेच 11 निवडक प्रश्न आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
1) हस्त्रू लक्रीबाग यांनी विचारलं आहे की, "भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेस पक्षात विलिनीकरण होण्याची काही शक्यता आहे की नाही?"
2) संदीप डोंगरे यांनी मिश्किल प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, "पवार साहेबांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या गोष्टी सांगाव्यात."
3) "पतंप्रधान होण्याचं स्वप्न अजून पडतं का?" असा प्रश्न विचारायला सांगितला आहे गणेश मानकोसकर यांनी.
4) "मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होऊ शकेल का?" असा प्रश्न विचारला आहे संजय कुंभार यांनी.
5) राजू गरूड यांनी विचारलं आहे की, "(तुमच्या) नास्तिक जीवनात प्रबोधनकारांच्या विचारांचा कितपत प्रभाव आहे."
6) "भुजबळ समर्थक तुमच्याकडे न येता माझ्याकडे न्याय मागायला का आले?" असा प्रश्न राज ठाकरेंनी शरद पवारांना विचारावा असं प्रणिल बडगुर्जर यांना वाटतं.
7) राजीव कुलकर्णी विचारतात की, "तुम्ही (शरद पवार) दिवसातले 16 ते 18 तास काम करता. आजही दौरे करता. ग्रामीण भागातल्या हजारो कार्यकर्त्यांना तुम्ही नावानं ओळखता तरीही तुम्हाला महाराष्ट्रात स्बवळावर सत्ता का मिळवता आली नाही?"
8) "देशाचं कृषीमंत्रीपद इतके वर्षं सांभाळूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात अपयश का आलं," असा प्रश्न विचारायला सांगितला आहे मकरंद डोईजड यांनी.
9) सुदर्शन जाधव विचारतात की, "शरद पवार राजकारणातलं मुत्सदी व्यक्तिमत्व आहे, असं असूनही त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळवून दिला नाही?"
10) "मोदी म्हणतात की मला राजकारण पवारांमुळे कळालं. ते तुम्हाला गुरू मानतात तर तुम्ही भाजपविरोधी का?" हा प्रश्न विचारावा असं कृष्णा सोनारवाडकर यांना वाटतं.
11) "राज ठाकरे जर पुतण्या म्हणून लाभले असते तर?" असा प्रश्न विचारला आहे विराज कणेकर यांनी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)