You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार: भाजपप्रवेशासाठी 'ईडी'चा दबाव या आरोपात किती तथ्य?
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ईडी, सीबीआय किंवा राज्य सरकारच्या असलेल्या एसीबीसारख्या संस्थांचा वापर करून लोकप्रतिनिधींवर पक्षप्रवेशासाठी दबाव आणला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
गेल्या दोन आठवड्यात तीन मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
एकामागोमाग एक तीन मोठे धक्के बसल्यानंतर शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आणि पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर भाष्य केलं.
सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांवर दबाव आणला जातोय आणि पक्षांतर घडवून आणला जातोय, असं म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हे बीबीसी मराठीने जाणून घेतलं...
पतीला वाचवण्यासाठी चित्रा वाघ भाजपच्या वाटेवर?
नाशिकच्या सिन्नरमधील असलेल्या चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास मोठा नसला, तरी आपल्या कार्यशैलीमुळे त्या राज्यभर पोहोचल्या. आधी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यकारिणीत, नंतर थेट राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षपदापर्यंत त्या पोहोचल्या.
सरकारविरोधात विविध आंदोलनं, महिलांचे प्रश्नांवर आवाज उठवणं इत्यादी गोष्टींमुळे त्या कायमच माध्यमांच्या केंद्रस्थानी असत. शिवाय, माध्यमांमध्ये राष्ट्रवादीची बाजू भक्कमपणे त्या मांडत असत.
लाचखोरी प्रकरणात पती किशोर वाघ यांची सुटका व्हावी म्हणून चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला राम राम केलं आहे. आता त्या भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे.
2016 मध्ये चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना लाच घेताना एसीबीनं पकडलं. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अहवाल ग्रंथपाल म्हणून किशोर वाघ कार्यरत होते. त्यावेळी नुकसान भरपाईचा धनादेश देण्यासाठी 4 लाखांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
"चित्रा वाघ यांच्या पतीवर एसीबीची केस आहे. तसेच त्यांच्या सहकारी संस्थांची देखील एसीबी चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे मला बाहेर जाण्यास परवानगी द्या, असे चित्रा वाघ यांनी सांगितलं," असं स्वत: शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
यावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, "किशोर वाघांना अटक झाली, त्यावेळी चित्रा वाघांचं विधान होतं की, राजकीय हेतूने प्रेरित कारवाई आहे. म्हणजेच, आज त्या आज जर भाजपमध्ये जात असतील, तर पवारांच्या विधानाला आधार मिळतो."
चित्रा वाघ यांची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला. या विषयावर सध्या काही बोलायचं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर बातमी अपडेट केली जाईल.
बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपामुळे पिचडांनी पवारांची साथ सोडली?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही दशकं घालवणाऱ्या आणि शरद पवारांशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या मधुकर पिचड यांनी पुत्र वैभव पिचडांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
आदिवासी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या अकोले मतदारसंघातून आधी स्वत: दोन ते तीन दशकं प्रतिनिधित्व केल्यानंतर मुलाला राजकारणात आणलं. मुलगा वैभव पिचड हे सध्या अकोलेचे आमदार आहेत.
पवारांचे जुने सहकारी असलेल्या मधुकर पिचडांच्या भाजपप्रवेशाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
"मधुकर पिचडांची दुसऱ्या पत्नी कमल पिचड या मराठा आहेत. त्यांचा बोगस जात प्रमाणपत्र दाखल तयार केला आणि त्यांच्या नावावर काही जमिनी घेतल्या," असा आरोप डॉ. किरण लहामटे यांनी केला.
डॉ. किरण लहामटे हे अहमदनगरमधील राजूरमधून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांचे ते प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात.
"पिचडांच्या या प्रकरणातील सर्व कागदपत्र मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत सादर केले. मात्र काहीच झालं नाही. त्यामुळे कोर्टात केस उभी केली. ती केस मी काहीही झालं तरी मागे घेणार नाही, हे पिचडांच्या लक्षात आलं. त्यामुळे जेलमध्ये जाण्याऐवजी भाजपमध्ये जाऊन बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत." असा गंभीर आरोप डॉ. लहामटे यांनी केला.
डॉ. लहामटे यांच्या आरोपामुळे शरद पवारांच्या विधानाला आधार मिळतो. मात्र, यासंदर्भात बीबीसी मराठीने आमदार वैभव पिचड यांच्याशी संपर्क साधला.
माझं वैयक्तिक कुठलंही प्रकरण नाही, जेणेकरून ईडीकडे जाण्याचा संबंध येईल, असं आमदार वैभव पिचड म्हणाले.
मधुकर पिचडांच्या आदिवासी जात प्रमाणपत्राबाबत वैभव पिचड म्हणाले, "पिचड साहेबांचा आदिवासी दाखला बनावट नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. वेगवेगळ्या स्तरावर सर्व लढाया झाल्या. मात्र, स्थानिक पातळीवर कुणी ना कुणी, लहामटे यांच्यासारखे आरोप करत असतात."
आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही जर कुणी आरोप करत असेल, तर आरोप करणारे न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे आहेत का? असा सवालही आमदार वैभव पिचड यांनी डॉ. लहामटेंच्या आरोपांवर उपस्थित केला.
भाजपमधील प्रवेशाबाबत बोलताना वैभव पिचड म्हणाले, "मागच्या वेळी सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. विरोधकांना थोडं कमी द्यायचं, ही भूमिका सत्ताधाऱ्यांची असते. त्यामुळे आताच्या सत्ताधाऱ्यांमुळे माझी कामं रखडत गेली. त्यात असं दिसून येतंय की, सत्तांतर होऊ शकत नाही. त्यामुळे विकासकामं आणि लोकांची मागणी पाहता मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला."
ज्यांच्याशी संघर्ष त्यांच्याच पक्षात सचिन अहिर का गेले?
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने वाढलेल्या राष्ट्रवादीला मुंबईत पोहोचवण्यात सचिन अहिर आणि संजय दीना पाटलांचा मोठा वाटा आहे. यातील सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला राम राम करून शिवसेनेत प्रवेश केला.
विशेष म्हणजे, सचिन अहिर यांचा परंपरागत संघर्ष शिवसेनेशीच राहिला आहे. कधी दहिहंडीवरून तर कधी सभांच्या मैदानांवरून. मात्र, अखेर त्यांनी मनगटावर शिवबंधन बांधत शिवसेनेतच प्रवेश केला.
राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात वादात अडकलेल्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला. त्यात ते मुंबई राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष होते.
राष्ट्रवादीकडून आमदार, मंत्री, मुंबई अध्यक्ष अशी मोठमोठी पदं सचिन अहिर यांनी भूषवली होती.
सचिन अहिर यांच्या भाजप प्रवेशाचं विश्लेषण करताना अभय देशपांडे म्हणाले, "काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत अनेक नेत्यांना आता तरी काही भवितव्य दिसत नाही. त्यामुळे राजकीय भविष्याचा विचार करून बरेचजण पक्ष बदलण्याचा विचार करत आहेत."
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत सर्वांत मोठं यश म्हणजे चार जागा मिळाल्या, असं म्हणत देशपांडे सचिन अहिरांचा शिवसेनेला काय फायदा होईल, यावर ते म्हणतात, "शिवसेना-भाजप येणाऱ्या प्रत्येकाला घेत आहेत. येणाऱ्या सर्वांचाच फायदा होईल असं नाही. मात्र, या नेत्यांचा विरोधकांना फटका बसले, ही एकूण रणनिती दिसते."
मुंबई मिररच्या पत्रकार श्रृती गणपत्ये यांना सचिन अहिरांचा भाजपप्रवेश संधीसाधू अधिक वाटतो. त्या म्हणतात, "पक्षांतर करणारे नेते संधीसाधू वाटतात. जिथे सत्ता आहे, तिकडे जाताना दिसतात."
एकनिष्ठतेपेक्षा वैयक्तिक राजकीय प्रगती या नेत्यांना महत्त्वाची वाटत असावी, असंही गणपत्ये सांगतात.
सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका केली असली तरी आपण केवळ जनतेच्याच भल्यासाठीच शिवसेनेत जात असल्याचं अहिर यांनी स्पष्ट केलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे विकासाबाबत काही नव्या कल्पना आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सहकार्य करू असं सचिन अहिर यांनी शिवसेनाप्रवेशावेळी म्हटलं होतं. त्यांच्याशी बीबीसीने संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पर्याय उभे राहतात, पक्ष संपत नाहीत : नवाब मलिक
हसन मुश्रीफ यांच्यावर धाडी टाकल्या, छगन भुजबळांबाबतही तेच झालं. म्हणजे एकतर धमकावताय किंवा आमिष दाखवताय. असं एकूणच भाजप इतर नेत्यांना फोडतंय, असं नवाब मलिक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
मात्र, कुणी पक्षांतराचा निर्णय घेत असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पर्याय उभे राहतील. पक्ष संपणार नाही, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.
राजकीय भवितव्याचा विचार करून सेना-भाजपकडे कल?
दरम्यान, "मोहिते पाटील, विखे पाटील किंवा आता पिचड यांचा भाजपप्रवेश असेल. या नेत्यांचा स्वत:पेक्षा मुलांच्या भवितव्याचा विचार अधिक दिसून येतो. पुढच्या पिढीला राजकारणात स्थान कायम राहावं, असं त्यांना वाटत असतं," असं अभय देशपांडे सांगतात.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेकडे वळताना दिसत आहेत. यावर अभय देशपांडे म्हणतात, "लोकसभेवेळी 288 पैकी 227 विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपला लीड असल्याचं समोर आलंय. त्यात युती आहे. केंद्रात मोदी आहेत. त्यामुळे स्वत:चं भवितव्य किंवा मुलांच्या भविष्याचा विचार करून अनेकजण निर्णय घेत आहेत."
'ईडी ही स्वायत्त संस्था'
ईडी ( सक्तवसुली संचालनालय) ही स्वायत्त संस्था आहे. एका अर्थानं त्यावर पंतप्रधानांचंही नियंत्रण नसतं. त्यामुळे पक्षांतरासाठी ईडीचा दबाव टाकला गेला असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ईडीची चौकशी सुरू होण्यासाठी अनेक महिन्यांचा वेळ लागतो. इतक्या सहज ती सुरू देखील होत नाही.
त्यामुळे या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. उलट राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षातल्या नेत्यांविषयी आदर राहिला नाही. नेतृत्वाविषयी विश्वास राहिला नाही यावर त्यांनी लक्ष द्यावं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
'चौकशी सुरू असलेल्या नेत्यांना पक्षात स्थान नाही'
नेत्यांवर दबाव टाकून पक्षांतरासाठी दबाव टाकला जात आहे हा आरोप बिनबुडाचा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्या लोकांची चौकशी सुरू आहे त्यांना पक्षात का स्थान दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर आरोप करण्यापेक्षा राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)