BMC Budget: मुंबई महापालिकेच्या बजेटबद्दल या 7 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मुंबई महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर झाला. महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला.

बंद झालेला जकात कर, मालमत्ता करवसुलीतली घट इत्यादी गोष्टींमुळं पालिकेच्या महसुलावर झालेला परिणाम पाहात, आयुक्त परदेशी कोणत्या नव्या योजना घोषित करतात आणि कुठल्या गोष्टींसाठी किती तरतूद करतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

अर्थसंकल्पाला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची परवानगी मिळाल्यानंतर मनपा आयुक्त प्रवीणसिंह परदेशी अर्थसंकल्प सभागृहात सादर केलं. आणि नंतर मतदान होऊन ते मंजूर करून घेतलं जाईल.

BMCच्या अर्थसंकल्पाबाबत निवडक महत्त्वाच्या गोष्टी :

1) मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पची फारशी प्रक्रिया किचकट नसते. विषयनिहाय समित्या आपापल्या शिफारशी देतात आणि त्यांवर विचार करून अर्थसंकल्प तयार केला जातो. त्यानंतर तो अर्थसंकल्प आयुक्तांकडून स्थायी समिती अध्यक्षांकडे सादर करतात. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर सभागृहात वाचून दाखवतात. मग मतदान होऊन अर्थसंकल्प मंजूर केला जातो.

2) मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही जास्त रकमेचा असतो. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख आहे.

3) बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, जयपूर, नागपूर, नाशिक आणि पटना या 10 महापालिकांच्या एकत्रित अर्थसंकल्पाइतका अर्थसंकल्प एकट्या मुंबई महापालिकेचा असतो. अर्थात, अर्थसंकल्प कमी-जास्त होत असतो, त्यामुळं यंदाही स्थिती हीच असेल का, हे अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच लक्षात येईल.

4) जकात कर, मालमत्ता कर हे मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या उत्पन्नापैकी महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यातील जकात कर बंद झाल्यानं आणि मालमत्ता करवसुली घटल्यानं मुंबई महापालिकेसमोर शहरात विकासकामं करण्यासाठी आर्थिक आव्हानं उभी राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.

5) मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 50 ते 70 टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच खर्च होतो. उर्वरीत खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो.

6) मुंबई महापालिकेत यंदाचा अर्थसंकल्प (2020-21 साठी) हा मांडत असताना शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्या रूपानं महिला महापौर आहेत. असं आतापर्यंत सातेवळा झालंय. याआधी सुलोचना मोदी, निर्मला सामंत, विशाखा राऊत, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव आणि स्नेहल आंबेकर या महिला महापौर होत्या.

7) 1996 पासून आजपर्यंत म्हणजे गेली 24 वर्षं मुंबई महापालिकेत शिवसेनेची सलग सत्ता आहे. त्याआधीही पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र, 1996 पासून सेना सलग सत्तेत आहे. त्यामुळं यंदाचा अर्थसंकल्पही शिवसेनेच्या नेतृत्त्वात सलग 24 वा असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)