कोरोना लस : मुंबईत पन्नास टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही कोव्हिड-19 ची लस?

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड-19 च्या विरोधातील लस अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली. भारतात जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला शनिवारी (16 जानेवारी) सुरू झाली.
महाराष्ट्र सरकारने लसीकरण मोहीम उत्साहात सुरू झाल्याचा दावा केला. पण, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे आकडे वेगळचं चित्र दाखवतात.
किती आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस?
सरकारच्या आकडेवारीनुसार, राज्यात 64 टक्के आणि मुंबईत फक्त 50 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी लस घेतली आहे.
महाराष्ट्रात 18,338 आरोग्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी लस घेतली, तर मुंबईत 1926 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी कोरोनाविरोधी लस घेतली.

मुंबई महानगर पालिकेने 16 जानवारीला 4000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं टार्गेट ठेवलं होतं. पण प्रत्यक्षात फक्त 1926 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली.
याचं कारण काय? हे आम्ही पालिका अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, लसीकरण कमी झाल्याची चार प्रमुख कारणं असू शकतात.
- लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना खूप उशीरा मेसेज गेले
- लसीकरण खूप उशीरा सुरू झालं
- शनिवार सुट्टी असल्याने आरोग्य कर्मचारी बाहेर पडले नसतील
- कामाच्या वेळेतच लस घेऊ अशा विचाराने आले नसतील
लसीबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये शंका?
बीबीसीने मुंबईतील विविध रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली. काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस सुरक्षित असल्याने घेतल्याचं सांगितलं.
पण पालिका रुग्णालयातील एका डॉक्टरांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, "मला पालिकेकडून तुमचं नाव लसीकरणाच्या लिस्टमध्ये आहे असा फोन आला. पण, मी सध्या तरी लस न घेण्याचं ठरवलंय. लशीची सुरक्षा, कार्यक्षमता याबद्दल काही प्रश्न आहेत. त्यामुळे लस न घेण्याचा निर्णय घेतलाय.'

फोटो स्रोत, Getty Images
'येणाऱ्या काळात लशीच्या सुरक्षेबाबत चित्र स्पष्ट झालं तर लस घेण्याचा निर्णय घेईन,' असं त्यांनी पुढे म्हटलं.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातील लशीच्या सुरक्षेबाबतच्या भीतीचा प्रश्न आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला.
त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "कोणती लस द्यावी हा निर्णय त्याबद्दलची खात्री पटवून मग केंद्र सरकार घेत असतं. पंतप्रधानांनी याचं उद्घाटन केलंय. माझ्यामते कोणाच्याही मनात याबाबत प्रश्न असू नयेत."
"केंद्राने या लशींचा पुरवठा केला आहे. त्यामुळे या लशींबाबत कोणाच्याही मनात शंका असू नये," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई लसीकरणाची आकडेवारी

फोटो स्रोत, BMC
ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही त्यांचं काय?
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं, 'लस घेण्यासाठी आम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल. लस न घेण्याचं कारण काय याबाबत माहिती घेतली जाईल.'
मुंबई महापालिकेच्या व्ही एन देसाई रुग्णालयात लसीकरणासाठी 200 लोकांची लिस्ट प्रशासनाला मिळाल्याची माहिती, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मोरे यांनी बीबीसी मराठीला दिली होती. पण, प्रत्यक्षात 80 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण, डॉक्टरांच्या भीतीचं काय? हा प्रश्न आम्ही पालिका अधिकाऱ्यांना विचारला.
'लशीबाबत डॉक्टरांनी भीती बाळगण्याचं कारण नाही. आशा सेविका, वरिष्ठ डॉक्टरांनी लस घेतली आहे. जर याबाबत कोणाला शंका असेल तर, त्यांच्याशी बोलून याचं निरसन केलं जाईल.' असं ते पुढे म्हणाले.आरोग्य कर्मचारी आणि पालिका यांच्यात लशीबाबत काही कम्युनिकेशन गॅप राहिला असेल, तर तो दूर करावा लागेल असं पालिका अधिकारी पुढे सांगतात.
सर जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी सांगितलं, 'जे जे रुग्णालयात 39 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात आला. एकाही आरोग्य कर्मचाऱ्याने डोस घेण्यास नकार दिला नाही.'
'शंका दूर करून कोरोनाची लस घ्यावी'
पहिला दिवस असल्याने लोकांच्या मनात भीती असण्याची शक्यता आहे आणि ती होती. पण लशीकरणाचे सर्व मापदंड पाळून लशीला परवानगी मिळते, असं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय महाराष्ट्रचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं.
"ही लस संपूर्ण सुरक्षित आहे. ट्रायलचे परिणाम आल्यानंतरच आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे," असं डॉ. लहाने यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो. आपण पुढे येऊन ही लस घ्यावी. ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी शंका दूर होईपर्यंत घेऊ नये. त्यांनी शंका दूर कराव्यात. प्रश्न विचारावे. ज्यांनी लस घेतली त्यांना भेटावं आणि त्यानंतर निर्णय घ्यावा.
कारण लस घेणं गरजेचं आहे. आजार होण्यापेक्षा लस घेणं चांगलं म्हणून लस सर्वांनी घेतली पाहिजे," असंही डॉ. लहाने यांनी म्हटलं.
कोविन अॅपचा गोंधळ?
शनिवारी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नावं कोविन अॅपमध्ये फिड करण्यात आली होती.
या अॅपमधून लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना फोन जाणं अपेक्षित होतं. पण, प्रत्यक्षात लोकांना मेसेज गेले नाहीत किंवा फार उशीरा गेले. त्यामुळे मुंबई महापालिकेने फोन करून आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचं नाव लसीकरणाच्या लिस्टमध्ये असल्याची माहिती दिली.
कोविन अॅपमध्ये झालेली गडबड राज्याचे आरोग्य सविच प्रदीप व्यास यांनी देखील मान्य केली. पत्रकांरांशी बोलताने ते म्हणाले, 'कोविन अॅपमध्ये बग होता. त्यामुळे लोकांना मेसेज फार हळू जात होते. त्यामुळे सकाळपासून लोकांना मेसेज येण्यास सुरूवात झाली आहे'
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








