शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मनोहरलाल खट्टर यांना रद्द करावा लागला कार्यक्रम

मनोहरलाल खट्टर

फोटो स्रोत, Getty Images

शेतकऱ्यांनी केलेल्या विरोध प्रदर्शनामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची पूर्वनियोजित किसान पंचायत रद्द करण्यात आली.

खट्टर यांची ही बैठक करनालमधील कैमला गावामध्ये होणार होती. या बैठकीत मनोहरलाल खट्टर केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याबद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते.

मात्र शेतकऱ्यांनी या बैठकीला मोठ्या प्रमाणावर विरोध केला. शेतकऱ्यांना अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते.

पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रू धूर आणि पाण्याचे फवारे मारले. मात्र तरीही शेतकरी खट्टर यांच्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.

बीबीसी पंजाबीचे सत सिंह यांच्या मते शेतकऱ्यांनी आसपासच्या शेतांमध्ये आश्रय घेत स्वतःचा पोलिसांपासून बचाव केला. अजूनही तिथली परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दरम्यान आंदोलकांनी खट्टर यांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बनवलेलं हेलिपॅडच खोदलं. त्यामुळे खट्टर यांना आपला कार्यक्रम रद्द करावा लागला.

त्याआधी हरियाणा पोलिसांनी आंदोलकांना गावात घुसण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड लावले होते. खट्टर जिथे भाजप समर्थक शेतकऱ्यांना संबोधित करणार होते, तिथल्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच आंदोलक शेतकऱ्यांनी तोडफोड सुरू केली.

कार्यक्रम न होऊ देण्याचा इशारा

मुख्यमंत्री किसान पंचायत करणार होते, तर आम्हाला तिथे प्रवेश का करू दिला नाही, असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता.

जेव्हा आम्ही सभा रोखण्यासाठी जात होतो, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केली, असा आरोप आंदोलक शेतकरी व्हीडिओमध्ये करताना दिसत आहेत.

आंदोलक शेतकरी

फोटो स्रोत, REUTERS/DANISH SIDDIQUI

यामुळे शेतकऱ्यांना राग आला. शेतकरी संघटनांनी राज्य आणि स्थानिक प्रशासनाला कार्यक्रम रद्द करण्यासाठी आधीच विनंती केली होती.

कार्यक्रम रद्द केला नाही, तर आम्ही तो होऊ देणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता.

पण मुख्यमंत्री खट्टर हा कार्यक्रम करण्यावर ठाम होते.

शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा

किसान सभेचे अध्यक्ष प्रीत सिंह यांनी हा खऱ्या शेतकऱ्यांनी खोट्या शेतकऱ्यांवर मिळविलेला विजय असल्याचं म्हटलं.

त्यांनी म्हटलं, "शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत, हे खट्टर यांना माहीत असायला हवं. अशावेळी किसान पंचायतीच्या नावाखाली ते खोट्या शेतकऱ्यांना गोळा करून राजकारण करू शकत नाहीत. भाजपच्या कोणत्याही नेत्यानं असं केलं तर त्याच्यासोबतही हेच केलं जाईल."

भाजपच्या कोणत्याही नेत्यानं या प्रकरणी माध्यमांशी बोलायला नकार दिला. आम्ही परिस्थिती सांभाळण्यात व्यस्त आहोत, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पहा.)