You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : भारतीय कंपन्यांना जगात टार्गेट का केलं जातं? - भारत बायोटेक
तज्ज्ञांच्या समितीने दोन लशींच्या (कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
या दोन्ही लशींना परवानगी देण्याची शिफारस स्वीकारली आहे, अशी माहिती भारतीय औषध नियंत्रक म्हणजेच ड्र्ग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) चे संचालक व्ही. जी. सोमाणी यांनी दिली.
कोव्हॅक्सिन सुरक्षित - भारत बायोटेक
संपूर्णतः भारतीय बनावटीच्या कोवॅक्सीन लशीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत बायोटेकने निर्माण केलेली ही लस प्रभावी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईला यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत डॉ. कृष्णा ईला म्हणाले, "हे फार दुखद आहे. भारतीय कंपन्यांना जगभरातून टार्गेट का केलं जातं. जगभरात आपात्कालीन परिस्थितीत मंजूरी देण्यात येते. अमेरिकाही म्हणते, लसीकरणाची चांगली माहिती उपलब्ध असेल तर मंजूरी देता येते."
भारत बायोटेकने निर्माण केलेली कोरोनाविरोधी लस कोव्हॅक्सीन चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे, ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार आहे.
कोव्हॅक्सीन प्रभावी आहे का नाही. याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. याबद्दल उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना डॉ. कृष्णा ईला पुढे म्हणतात, "आम्ही माहिती देण्यात पारदर्शक नाही असं अनेकांच म्हणणं आहे. लोकांनी यासाठी इंटरनेटवर जाऊन माहिती वाचली पाहिजे. आम्ही विविध वैद्यकीय जर्नलमध्ये 70 पेक्षा जास्त आर्टिकल छापली आहेत."
कंपनीच्या माहितीनुसार, लस बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉ. ईला पुढे सांगतात, "सुरूवातीला लशीची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे. लशीच्या उपलब्धतेप्रमाणे बाजारात लशीच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येईल."
DCGI ने काय सांगितलं?
भारतीय औषध नियंत्रक व्ही. जी. सोमानी यांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्या क्षमतेबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, कोव्हिशिल्ड लशीची एकूण कार्यक्षमता 70 टक्के, तर कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस सुरक्षित असून, तिच्यामार्फत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.
सुरक्षेबाबत कुठलीही कसर राहिली असती, तर भारतीय औषध नियंत्रकांनी लशीली परवानगी दिली नसती, असं सोमानी म्हणाले.
कोरोनावरील या लशींना परवानगी मिळाली, याचा अर्थ आता भारत सरकार या दोन्ही कंपन्यांसोबत करार करू शकतं.
यंदा 30 कोटी जणांना लस देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलापरवानगी
2 जानेवारी 2021 रोजी भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस DCGI च्या तज्ज्ञांच्या समितीने केल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी ANI वृत्तसंस्थेला दिली होती.
कोव्हॅक्सिन (Covaxin) असं भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीचं नाव असून, ही लस भारतीय बनावटीची आहे.
कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेक कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीसोबत मिळून तयार केली आहे.
सीरमच्या कोव्हिशिल्डलाही परवानगी
तसंच, 1 जानेवारी 2020 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनकाद्वारा विकसित 'कोव्हिशिल्ड' लशीची केंद्र सरकारच्या एसईसीने (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी) आपात्कालीन वापरासाठी शिफारस केली होती.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे.
लशींना मंजुरी मिळाल्यानं भारताला कोरोनामुक्त करण्याच्या दिशेला आता वेग येईल, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
DCGI च्या पत्रकार परिषदेनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्वीट करून कोव्हिशिल्ड लस सुरक्षित, परिणामकारक असल्याचा दावा केला. सीरमची लस सरकारला 200 रुपयांना तर जनतेला 1000 रुपयांना दिली जाईल असं पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)