कोरोना लस : कोव्हिशिल्डला काही अटींसह मंजुरी

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनकाद्वारा विकसित 'कोव्हिशिल्ड' लशीला केंद्र सरकारच्या एसईसीने (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी) आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे.

याच लशीला दोन दिवसांपूर्वी ब्रिटननेही आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.

काही अटींसह कोव्हिशिल्डला मंजुरी देण्यात येत असली तरी भारतात मंजुरी मिळणारी ही पहिलीच लस ठरली आहे.

लशीच्या वापरासंदर्भात अंतिम निर्णय डीसीजीआई संस्था घेणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाव्यतिरिक्त फायझर, भारत बायोएन्टेक या कंपन्यांचेही लशीसाठी प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत.

"आमच्याकडे कोव्हिशिल्डचे चार ते पाच कोटी डोस तयार आहेत. सरकारकडून या लशीला परवानगी दिली की, मग सरकारनेच ठरवायचंय की, किती डोस खरेदी करायचे आणि लोकांना किती वेगानं द्यायचे," अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. ANI वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोव्हिशिल्ड ही सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोरोना विषाणूवरील लस आहे.

अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट जुलै 2021 पर्यंत 30 कोटी डोस तयार करेल.

"भारत COVAX चा भाग आहे. आम्ही COVAX आणि भारताला एकाचवेळी डोस देऊ. भारताची लोकसंख्या इतकी आहे की, बहुधा पाच कोटी डोस भारतातच द्यावे लागतील," असं पुनावाला म्हणाले.

कोरोना लशीच्या समन्वयासाठी COVAX ची स्थापना करण्यात आलीय. यात जागतिक आरोग्य संघटनेचाही सहभाग आहे. भारत सुद्धा COVAX चा सहभागी देश आहे.

"2021 मधील पहिले सहा महिने जगभरात सगळीकडेच लशीची कमतरता भासेल. पण या गोष्टीला कुणीच काही करू शकत नाही. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इतर लस निर्माते लशीच्या पुरवठ्यासाठी पुढे आल्यानंतर यातून दिलासा मिळेल," असं अदर पुनावाला म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)