You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : सीरमने तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे मागितली परवानगी
सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड (COVISHIELD) या कोरोनावरील लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. तसा परवानगीचा अर्ज केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांनी ट्विटवरून दिली आहे.
अदर पुनावाला यांनी ट्विटरवरून सांगितलं, "तुम्हा सगळ्यांना शब्द दिल्याप्रमाणे, 2020 साल संपण्याच्या आधीच सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या मेड-इन-इंडिया लशीच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगीचा अर्ज केला आहे."
यावेळी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.
'फायझर'नेही मागितली भारत सरकारची परवानगी
कालच (7 डिसेंबर) फायझर इंडिया कंपनीने भारत सरकारकडे कोव्हिड-19 विरोधी लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता द्या, अशी मागणी केली आहे.
फायझर इंडियाने याबद्दल भारतातील औषध नियंत्रकांना (DCGI) पत्र पाठवलं आहे. या पत्रात फायझरने, कोव्हिड-19 विरोधातील लशीची भारतात आयात, विक्री आणि वितरण करण्याची परवानगी मागितली आहे.
वृत्तसंस्था PTIनं दिलेल्या माहितीनुसार, "फायझर इंडियाने 4 डिसेंबरला औषध नियंत्रकांकडे (DCGI) कोरोनाविरोधी लशीच्या आपात्कालीन वापरासाठी प्रस्ताव पाठवला आहे."
फायझरने गेल्या आठवड्यात ब्रिटन आणि बहरिनच्या सरकारकडून कोरोनाविरोधी लशीच्या आपात्कालीन वापराची मागणी मिळवली आहे.
मोदींनी दिली होती 'सीरम'ला भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला 28 नोव्हेंबर रोजी भेट देऊन आढावा घेतला होता.
त्यानंतर 'सिरम'चे सीईओ आणि मालक अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत आणि कोरोनावरील लशीबाबत अधिक माहिती दिली. त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की, येत्या दोन आठवड्यात सीरम इन्स्टिट्यूट भारत सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करेल.
"लशीचं वितरण सुरुवातीला भारतातच केलं जाईल, त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच आफ्रिकेतील देशांमध्ये लशीचं वितरण केलं जाईल," अशी माहितीही अदर पुनावाला यांनी त्यावेळी दिली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)