You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरासाठी फायझरने मागितली भारत सरकारची परवानगी
भारतात कोव्हिड-19 विरोधी लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता द्या, अशी मागणी औषध बनवणारी कंपनी फायझरने भारत सरकारकडे केली आहे.
फायझरने गेल्या आठवड्यात ब्रिटन आणि बहरिनच्या सरकारकडून कोरोनाविरोधी लशीच्या आपात्कालीन वापराची मागणी मिळवली आहे.
फायझर इंडियाने याबद्दल भारतातील औषध नियंत्रकांना (DCGI) पत्र पाठवलं आहे. या पत्रात फायझरने, कोव्हिड-19 विरोधातील लशीची भारतात आयात, विक्री आणि वितरण करण्याची परवानगी मागितली आहे.
वृत्तसंस्था PTIनं दिलेल्या माहितीनुसार, "फायझर इंडियाने 4 डिसेंबरला औषध नियंत्रकांकडे (DCGI) कोरोनाविरोधी लशीच्या आपात्कालीन वापरासाठी प्रस्ताव पाठवला आहे."
ब्रिटनच्या सरकारने सर्वात पहिल्यांदा फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) ने विकसित केलेल्या कोव्हिड-19 विरोधी लशीला मान्यता दिली. Pfizer-BioNTech ने कोरोनाविरोधी लस व्हायरसपासून 95 टक्के सुरक्षा देत असल्याचा दावा केला आहे. ब्रिटिश सरकारने ही लस सामान्यांना देण्यासाठी सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.
बहरिनच्या सरकारने शुक्रवारी Pfizer-BioNTech ने विकसित केलेल्या कोरोनाविरोधी लशीला मान्यता दिल्याची माहिती दिली होती.
Pfizer-BioNTech ने विकसित केलेली कोरोनाविरोधी लस, उणे 70 अंश तापमानात ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ही लस भारतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. भारतातील ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये ही लस ठेवण्यासाठी उणे 70 अंश तापमानाची 'कोल्डचेन' तयार करणं खूप कठीण असल्याचं भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
फायझरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात या लशीच्या वापरासाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. कंपनी विविध पर्यायांवर विचार करत आहे.
"कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर, करण्यात आलेल्या करारांनुसारच ही लस दिली जाईल," असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
भारतात सद्यस्थितीत कोरोना विरोधातील पाच लशी अंतिम टप्प्यात आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायटेक-आयसीएमआरकडून विकसित करण्यात येणाऱ्या लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)