कोरोना व्हायरसच्या काळात कानाचे आजार का वाढत आहेत?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

'वर्क फ्रॉम होम' करताना 'हेडफोन', 'इयरफोन' चा सतत वापर घातक आहे का?

कोव्हिड-19 काळात कामाचा पॅटर्न पूर्णत: बदललाय. ऑफिसचं काम घरी आलं, पालकांचं 'वर्क फ्रॉम होम', तर मुलांची शाळा ऑनलाईन झाली. ऑफिसची मीटिंग मोबाईल किंवा लॅपटॉपवर होऊ लागली. त्यामुळे कानात सतत 'हेडफोन', 'इयरफोन' असणं आलंच. 'हेडफोन' आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय.

पण, तुमचा 'हेडफोन', 'इयरफोन' आजारांना निमंत्रण देतोय असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल? नाही ना ! पण, 'हेडफोन', 'इयरफोन' च्या सततच्या वापरामुळे कानाचे आजार वाढल्याचं प्रकर्षाने दिसून येत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 संसर्गाच्या काळात सतत 'हेडफोन', 'इयरफोन' च्या वापरामुळे कानाच्या आजारांनी रुग्णालयात येणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.

'हेडफोन', 'इयरफोन' मुळे कोणते आजार होतात?

  • कानात बॅक्टेरिया किंवा फंगल इंन्फेक्शन
  • कानात सूज येणं किंवा कान लाल होणं
  • कमी ऐकू येणं (Noise Induced Hearing Loss)
  • कानात शिटीसारखा आवाज येणं

कोव्हिडमध्ये कानाचे आजार 50 टक्क्यांनी वाढले?

मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरस संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे ऑफिसचं काम मोबाईल आणि लॅपटॉपवर सुरू झालं. राज्यात हळूहळू अनलॉकिंग सुरू झालं असलं तरी, वर्क फ्रॉम होम संपलेलं नाही. मुलांच्या शाळा, कॉलेजच लेक्चर ऑनलाईन असल्याने मोठ्या संख्येने मुलं 'हेडफोन' किंवा 'इयरफोन' वापरताना पहायला मिळत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, 'हेडफोन', 'इयरफोन' चा अतिरिक्त वापर घातक ठरतोय.

बॉम्बे हॉस्पिटलचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिनेश जुवेकर सांगतात, "गेल्या काही महिन्यात शाळा आणि कॉलेजमधील मुलं सर्वात जास्त कानासंबंधी आजारांच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात आले आहेत. कानाच्या आजारांमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय."

शाळा आणि कॉलेजची मुलं साधारण: तीन ते चार तास 'हेडफोन' किंवा 'इयरफोन' घालून अभ्यास करताना पाहायला मिळतात. अभ्यास करताना आजूबाजूचा आवाज येऊ नये, यासाठी 'हेडफोन' किंवा 'इयरफोन' जबरदस्तीने कानात बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचं चित्र घरा-घरात दिसून येतं.

पण, फक्त मुलं नाही, तर कोव्हिड-19 च्या काळात सर जे.जे रुग्णालयात कॉर्पोरेट संस्थांमधील अनेक लोक ऐकू कमी येण्याची तक्रार घेऊन दाखल होत असल्याची माहिती, रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या काळात ऑफिस मीटिंग, चर्चा, प्रेझेन्टेशन आणि इतर गोष्टींमुळे हेडफोन सतत मोठ्या आवाजात कानात असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे कानासंबंधी आजार वाढल्याचं तज्ज्ञांच मत आहे.

"हेडफोनच्या अतिरिक्त वापरामुळे शाळातील मुलांना बहिरेपणाचा त्रास झाल्याचं आढळून आलेलं नाही. पण, इयरफोनच्या सतत वापरामुळे कानात दुखण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत," असं मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. नीलम साठे सांगतात.

'मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी घ्यावी जास्त काळजी'

फुफ्फुसांवर आघात करणारा कोरोना व्हायरस मधुमेह आणि उच्चरक्तदाबाने ग्रस्त रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये मधुमेह आणि उच्चरक्तदाबाने आजारी लोकांची संख्या जास्त आहे.

डॉ. साठे सांगतात, "मधुमेह आणि उच्चरक्तदाबाने ग्रस्त रुग्णाला कानाचे आजार झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांना बहिरेपणा आणि चक्कर येत असल्याचं दिसून आलं आहे."

मुलांच्या कानात अडकले 'इयरप्लग्ज'

अभ्यास करताना आजूबाजूचा आवाज बिलकुल येऊ नये. शिक्षक काय सांगतात हे नीट ऐकू येण्यासाठी मुलं, इयरफोन कानात जबरदस्तीने दाबताना/घालताना आढळून येतात. तुमचा मुलगी/मुलगा ही असं नक्की करत असेल. तुम्ही हे नक्की पाहिलं असेल, तर, मग पालक म्हणून योग्य वेळी काळजी घ्यायला हवी, असं डॉ. मिनेश जुवेकर सांगतात.

"माझ्याकडे आलेल्या 8 ते 10 मुलांच्या कानात 'इयरप्लग्ज' अडकून बसले. आवाज नीट ऐकू यावा यासाठी मुलांनी जबरदस्तीने 'इयरप्लग्ज' कानात घातले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पालकांनी स्क्रूडायव्हर आणि इतर गोष्टींच्या मदतीने हे काढण्याचा प्रयत्न केला. त्यात इयरप्लग बाहेर येण्यापेक्षा अधिकच आत ढकलले गेले. या मुलांना भूल देऊन कानात अडकलेले 'इयरप्लग्ज' काढावे लागले," असं डॉ. जुवेकर पुढे सांगतात.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार मुलांसाठी काही विशेष हेडफोन नसतात. मोठ्यांचे हेडफोन मुलं अभ्यासासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी वापरतात. लहान मुलांच्या कानाचा आकार छोटा असतो. 'हेडफोन', 'इयरफोन' कानात जबरदस्तीने फिट बसवण्याच्या नादात कानाच दुखणं सुरू होतं.

बोरिवलीत रहाणाऱ्या मानसी जाधव (नाव बदललेलं) सांगतात, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या मुलाच्या कानात सतत दुखत होतं. कधी उजवा कर कधी डावा कान दुखायचा. नक्की काय हे कळत नव्हतं. मात्र, कानापेक्षा मोठ्या हेडफोनच्या वापरामुळे मुलाचा कान दुखत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आता शक्यतो हेडफोनच्या वापरापेक्षा स्पीकरवर ऐकण्यावर मी भर देते. काळजी घेणं गरजेचं आहे."

पावसाळ्यात होतं बॅक्टेरिया किंवा फंगल इंन्फेक्शन

तज्ज्ञांच्या मते, सामान्यत: पावसाळ्याच्या दिवसात कानासंबंधी आजार किंवा इंन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. याच कारण हवेतील आद्रता. पण, कोव्हिड-19 च्या काळात मार्च महिन्यापासून सतत हेडफोन किंवा इयरफोन वापरल्यानेही इंन्फेक्शन वाढल्याचं

वाशीच्या फोर्टिस-हिरानंदानी रुग्णालयाच्या संचालक डॉ. फराह इंगळे सांगतात, "हेडफोनच्या अतिरिक्त वापरामुळे कानातील तापमान आणि आद्रता वाढते. इयरफोनमुळे हवा कानात येण्यास प्रतिबंध होतो. कान बंद असल्याने बॅक्टेरियांना (जंतू) वाढण्यास पोषक वातावरण तयार होतं. त्यामुळे कानात इंन्फेक्शन होतं. हे बॅक्टेरिया हेडफोनवर वाढत असल्याने कानात इंन्फेक्शनचं प्रमाण वाढतं."

डॉ. चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे, 'हेडफोन', 'इयरफोन' मुळे कानातील जंतू बाहेर येण्यासाठी जागा मिळत नाही. जंतू कानात गेल्याने लोकांना कानात इंन्फेक्शन होण्याचा धोका जास्त वाढतो.

'अर्धा तास 'हेडफोन' वापरले तर 10 मिनिटं ब्रेक घ्या'

तज्ज्ञांच्या मते हेडफोन किंवा इयरफोनचा आवाज मोठा असेल तर कानाच्या पडद्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

डॉ. मिनेश जुवेकर सांगतात, "कोरोनाच्या काळात काम करताना किंवा अभ्यास करताना हेडफोन आवश्यकच आहेत. पण, अर्धा तास किंवा चाळीस मिनिटं सतत 'हेडफोन', 'इयरफोन' वापरल्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. ज्यामुळे कानाला ब्रेक मिळेल आणि त्रास होणार नाही."

तर, पालकांनी लहान मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवावं. दोन लेक्चरच्या मध्ये मिळणाऱ्या 10 मिनिटांच्या ब्रेकमध्ये मुलांना 'हेडफोन', 'इयरफोन' पासून दूर ठेवावं असं डॉ. चव्हाण सांगतात.

डॉ. नीलम साठे म्हणतात, खूप वेळ बोलायचं असेल तर स्पीकरचा वापर करावा. जास्त मोठ्या आवाजात गाणी ऐकू नये. मोबाईलचा आवाज नियंत्रणात ठेवावा.

कानात इंन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्यावी?

कानात इन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. फराह इंगळे यांनी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत.

  • कान दुखत असल्यास गरम पाण्याची बाटली किंवा कपड्याने शेक द्यावा.
  • डॉक्टरांशी तत्काळ संपर्क करावा. डॉक्टर दुखणं कमी करण्यासाठी पेन किलर देतील
  • लहान मुलांना कानात इंन्फेक्शन झालं असल्यास 'अॅस्पिरिन' देऊ नये. त्यांना तातडीने नाक-कान-घसा तज्ज्ञांकडे घेऊन जावं

कान साफ करण्यासाठी 'कॉटन बड' किती सुरक्षित?

कान साफ करण्यासाठी आपण कॉटन बड वापरतो. पण, सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण, लोकांना कॉटन बड न वापरण्याचा सल्ला देत आहेत.

"कान साफ करण्यासाठी बडचा वापर केल्याने इंन्फेक्शन अधिक वाढतं. कानात थोड्याप्रमाणात वॅक्स असणं गरजेचं आहे. हा वॅक्स कानाच्या पडद्याला सुरक्षित ठेवतो. कानातील वॅक्स काढण्याच्या प्रयत्नात तो आपण अधिक आत ढकलतो. ज्यामुळे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते," असं ते म्हणतात.

मोठ्या आवाजात हेडफोनवर ऐकणं, इयरफोनघालून झोपणं या सवयी आपल्यापैकी अनेकांना आहेत. याचे दुष्परिणाम होतील याची जाणीव आपल्याला आहे. मात्र आपण याकडे लक्ष देत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)