You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम सातपुते विवाहः आमदाराच्या लग्नासाठी हजारोंची गर्दी, देवेंद्र फडणवीसही उपस्थित #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सर्वसामान्यांना विवाह सोहळ्यासाठी 50 लोकांची मर्यादा पण आमदाराच्या लग्नासाठी हजारोंची गर्दी
कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी 50 जणांची मर्यादा आहे. पण हा नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्न आता विचारला जातोय. या विवाहाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे लोकप्रतिनिधीच कोरोनासंदर्भातील नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. सोलापूरचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या लग्नसोहळ्यात हजारोंची गर्दी होती. सकाळने हे वृत्त दिले आहे.
हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आणि मास्क घालण्याचा नियमही पाळताना लोक दिसले नाहीत.
या लग्नात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील, नितेश राणे ही मंडळी उपस्थित होती.
2. रिलायन्स उभारणार प्राणी संग्रहालय
गुजरातमध्ये रिलायन्स कंपनी जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
जामनगरच्या मोती खवडी येथील रिलायन्सच्या रिफायनरी प्रकल्पाजवळ हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाईल. 280 एकर जमीनीवर प्राणीसंग्रहालय उभारण्याचे नियोजन असून जगभरातील 100 हून अधिक विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी याठिकाणी असणार आहेत.
यासंदर्भात बोलताना रिलायन्स कॉर्पोरेट व्यवहार विभागाचे संचालक परिमल नथवाणी यांनी सांगितले, "या प्रोजेक्टसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. कोरोनामुळे याचे काम आम्ही तात्पुरते थांबवले होते. आता काम सुरू झाले असून पुढील दोन वर्षात प्राणी संग्रहालय पूर्ण होईल. 'ग्रीन झूलॉजिकल, रेस्क्यू, रिहॅबिल्टेशन किंगडम' असे नाव देण्यात येणार आहे."
3. भारतात मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा- साक्षी महाराज
भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा अशी इच्छा भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशात बागपत येथे बोलताना ते म्हणाले, 'पाकिस्तानची लोकसंख्या 20 कोटी आहे तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या 20 कोटींवर पोहोचली आहे. हा चिंतेचा विषय आहे. मुस्लिमांना देण्यात येणारा अल्पसंख्यांक दर्जा तात्काळ संपुष्टात यावा," ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
4. कोरोना काळात सोन्याची आयात घटली
कोरोनामुळे या वर्षी भारताची सोने आयात घसरल्याचं दिसून येते. एप्रिल ते नोव्हेंबर महिन्याच्या काळात सोन्याच्या आयातीत 40 टक्के घसरण झाली असून ती 12.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
गेल्यावर्षी भारताने 20.6 अब्ज डॉलर किंमतीचं सोनं आयात केलं होतं. सोन्याप्रमाणे चांदीच्या आयातीत 65.7 टक्क्यांची घसरण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीत 8.74 टक्के घट झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात हिरे आणि आभूषणे उद्योगातील निर्यात 44 टक्क्यांनी घटली आहे. ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.
5. चिनी सैन्याची लेहमध्ये घुसखोरी
चीनमधील सैनिकांनी सामान्य नागरिकांच्या वेशात भारतात घुसखोरी करण्याची घटना लडाखमध्ये घडली आहे. स्थानिकांच्या आणि आयटीबीपी जवानांच्या मदतीने त्यांना पुन्हा सीमेपार पाठवण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली आहे.
लेहच्या पूर्वेस 135 किमी अंतरावरील प्रदेशात दोन गाड्या भरुन हे सैनिक आले होते. त्यांनी स्थानिक नागरिकांसारखा पेहराव केला होता. स्थानिक पशुपालकांना त्यांनी त्या प्रदेशात चराईस बंदी घातल्यानंतर त्यांना विरोध करण्यात आला. तसेच नंतर आयटीबीपीसही कळवण्यात आले. या चिनी सैनिकांना स्थानिक लोक आणि आयटीबीपी जवान विरोध करत असल्याचा व्हीडिओही प्रसारित झाला आहे, असं टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)