You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर मुंबईतल्या एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर झारखंडमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचीही मागणीही त्यांनी केली आहे.
देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्यांवर अशाप्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि म्हणूनच ही चौकशी गरजेची असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
दुसरीकडे भाजप 'डर्टी पॉलिटिक्स' करत असल्याचं सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचं (जेएमएम) म्हणणं आहे.
दरम्यान, झारखंड उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात भाजपचे माजी मुख्यमंत्री रघूबर दास आणि इतर नेत्यांवर झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बाबूलाल मरांडी यांचे आरोप
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या वेगवान घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकारणाला अचानक वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी दुमकामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी केली.
ते म्हणाले, "मुंबईतल्या एका मुलीने मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. नुकताच तिचा अपघात झाला होता आणि हा आपल्याला मारण्याचा कट होता, असंही तिचं म्हणणं आहे. तिने पोलीस तक्रारही केली आहे. तिचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशावेळी नैतिकता हेच सांगते की मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा द्यावा आणि जनतेला सत्य काय ते सांगावं. त्यांनी स्वतःच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करावी आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस करावी."
"हा गंभीर आरोप आहे. या आरोपाचा निष्पक्ष तपास झाला नाही तर प्रत्येक प्रभावशाली व्यक्ती आपलं वजन वापरेल आणि मग प्रलोभन किंवा दबाव टाकून अशा प्रकरणांमध्ये तडजोड करेल. असं झालं तर देशात गुन्हे घडणं कधी थांबणारच नाही."
बाबूलाल मरांडी पुढे म्हणाले, "या घटनेविरोधात रस्त्यावर उतरणं आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करणं, ही प्रत्येक विवेकी आणि कायदा मान्य असणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. हा काही सामान्य आरोप नाही. आरोप करणाऱ्या तरुणीनेही मुंबई उच्च न्यायालयात अर्ज देऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे."
संपूर्ण प्रकरण
बॉलीवुडमध्ये स्ट्रगलर असल्याचं सांगणाऱ्या एका तरुणीने हे कथित आरोप केले आहेत. 2013 सालच्या 5 सप्टेंबर रोजी हेमंत सोरेन यांनी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे. यावेळी ठार मारण्याची धमकी दिल्याचंही तिचं म्हणणं आहे.
घटनेच्या 45 दिवसांनंतर तिने मुंबईच्या मेट्रोपोलिटन कोर्टात या घटनेची तक्रार केली. मात्र, पुढच्या 9 दिवसांनंतर तिने तक्रार मागे घेतली. त्यामुळे प्रकरण बंद झालं. हेमंत सोरेन त्यावेळीदेखील झारखंडचे मुख्यमंत्री होते.
या तरुणीचं 8 डिसेंबर 2020 रोजीचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या पत्रात तरुणीने वांद्रे पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांच्या झोन-9 चे डीसी अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रार आल्याचं मान्य केलं आहे. तसंच पोलीस तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने व्हायरल पत्राच्या आधारे महाराष्ट्रच्या डीजीपीकडे उत्तर मागितलं आहे. आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी यासंबंधी ट्वीटही केले आहेत.
आरोप करणारी तरुणी
ज्या तरुणीच्या पत्राच्या आधारे भाजपने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्या तरुणीने सार्वजनिकरित्या कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्यांचा फोन बंद आहे आणि बीबीसीने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायलाही उपलब्ध नाहीत. मुंबई पोलिसांनाही त्यांनी फक्त मेल केला होता. या मेलची कॉपीच सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
त्यांनी मुंबई पोलिसांची स्वतः भेट घेतली होती का, हेदेखील अजून स्पष्ट नाही.
भाजपचं 'डर्टी पॉलिटिक्स'- झारखंड मुक्ती मोर्चा
हे संपूर्ण प्रकरण आधारहीन असल्याचं झारखंड मुक्ती मोर्चाचं म्हणणं आहे. भाजप 'डर्टी पॉलिटिक्स' करत असून जनताच याला उत्तर देईल, असं पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.
नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजपला बंद झालेलं प्रकरण उकरून काढून एखाद्याची प्रतिमा मलीन करणं, हे नैतिक आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
बीबीसीशी बोलताना सुप्रियो भट्टाचार्य म्हणाले, "हा सरळ-सरळ प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार आहे आणि हे चुकीचं आहे. याविरोधात कनिष्ठ न्यायालयात (रांची सिव्हिल कोर्ट) आधीच मानहानीचा दावा दाखल आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधाात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावर कुठलाही निर्णय येण्याआधीच भाजपने गळे काढायला सुरुवात केली."
"हे लोक (भाजप) वर्षभरातच इतके घाबरले आहेत की कुठल्याही पातळीवर जाऊन काहीही करू शकतात. हे प्रकरण सात वर्ष जुनं आहे आणि त्याला कुठलाच पुरावाही नाही. केवळ एका चिठ्ठीच्या आधारावर राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली, यावरून भाजप घटनात्मक संस्थांचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट होतं. हाथरस प्रकरणात काल सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं. त्या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी बलात्कार झालाच नाही, असं म्हटलं होतं. महिला आयोगाने त्या प्रकरणाची दखल का नाही घेतली. अशी अनेक प्रकरणं आहेत ज्याची महिला आयोगाने दखल घेतलेली नाही. मात्र, अनेक वर्षांपूर्वीच बंद झालेलं प्रकरण ज्याचा कुठलाही आधार नाही त्याची मात्र दखल घेतली जातेय. जनतेला हे सगळं कळतं आणि जनता याला उत्तरही देईल."
'सरकार पाडण्याचं षडयंत्र'
दरम्यान, भाजप सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. रांचीच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीचे कॉल रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंट यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
झारखंडमध्ये भाजप लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं हेमंत सोरेन सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आपल्या याचिकेत माजी मुख्यमंत्री रघूबर दास, भाजप प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश, भाजप खासदार निशिकांत दुबे आणि राज्य सरकारला प्रतिवादी बनवलं आहे.
त्यांचे वकील राजीव कुमार बीबीसीशी बोलताना म्हणाले, " काही दिवसांपूर्वी येत्या 2 महिन्यात सरकार पाडू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी दुमकामध्ये म्हटलं होतं. झारखंड मुक्ती मोर्चाचे 10-12 आमदार आपल्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले होते. त्यावेळी नंदकिशोर सिंह नावाच्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात दुमकामधल्या पोलिसात देशद्रोहाची तक्रारही दाखल केली होती.
या प्रकरणाचा जलद गतीने तपास व्हायला हवा. तसंच ज्या तरुणीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे ती भाजपच्या कुठल्या-कुठल्या नेत्यांच्या संपर्कात होती, याची सीआयडी चौकशी व्हायला हवी. तिचे फोन रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंट तपासले पाहिजे. यावरून ती कुणाच्या इशाऱ्यावरून आरोप करत आहे, हे स्पष्ट होईल. भाजप बऱ्याच काळापासून झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न करतेय आणि हे नवे आरोपही त्याचाच एक भाग असल्याचं वाटतं. सीआयडी तपासातूनच यातील सत्य बाहेर येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)