हेमंत सोरेन: झारखंडमध्ये भाजपला सत्तेबाहेर ठेवणारं 'धनुष्यबाण'

    • Author, रवी प्रकाश
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून

झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस-राजद महाआघाडीनं झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केला आहे.

हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) अध्यक्ष आहेत. JMM-काँग्रेस-राजद ही महाआघाडी हेमंत सोरेन यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करूनच निवडणुकीला सामोरी गेलीय.

संथाल परगनामधील दुमका आणि बरहेट अशा दोन विधानसभा मतदारसंघातून हेमंत सोरेन निवडणूक लढत आहेत. त्यापैकी त्यांचा दुमका मतदारसंघातून विजय झाला आहे.

पुढचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचं नाव निश्चित मानलं जात आहे.

कोण आहेत हेमंत सोरेन?

हेमंत सोरेन यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालंय. हेमंत सोरेन यांचा जन्म रामगढ जिल्ह्यातल्या नेमरा इथं झाला.

पटना इथं हेमंत यांनी आपलं सुरुवातीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर बीआयटी मेसरामध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं, मात्र त्यांनी तो कोर्स पूर्ण केला नाही.

44 वर्षीय हेमंत सोरेन हे शिबू सोरेन यांचे दुसरे सुपुत्र. मोठा भाऊ दुर्गा सोरेन यांच्या आकाली मृत्यू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राजकारणात पाऊल ठेवलं.

हेमंत हे 2009-2010 मध्ये राज्यसभेत खासदार होते. त्यानंतर ते आमदार बनले आणि 2013 साली पहिल्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. त्यावेळी सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानं समर्थन दिलं होतं.

झारखंड विधानसभेच्या आता झालेल्या निवडणुकीतही झारखंड मुक्ती मोर्चासोबत काँग्रेस आणि राजद होती.

सध्या ते रांचीतल्या कांके रोडवरील सरकारी निवासस्थानी पत्नी कल्पना यांच्यासोबत राहतात. त्यांना दोन मुलं आहेत.

हेमंत सोरेन पहिल्यांदा असे बनले मुख्यमंत्री

2013 साली झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी हेमंत सोरेन हे 2010 साली अर्जुन मुंडा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी JMM आणि भाजपनं अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवून सरकार बनवलं होतं. मात्र दोन्ही पक्षात मतभेद झाले आणि दोन वर्षं चार महिने सात दिवसात सरकार कोसळलं.

त्यानंतर काँग्रेस आणि राजदनं JMMला समर्थन दिलं. त्यामुळं जुलै 2013 मध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात झारखंडमध्ये सरकार स्थापन झालं आणि त्यावेळी पहिल्यांदा हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले. हे सरकार एक वर्षं पाच महिने 15 दिवस चाललं. त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या.

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत JMMने हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वातच निवडणूक लढवली आणि त्यात 19 जागा जिंकल्या. मात्र, या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरला भाजप. त्यामुळं भाजपचे रघुवर दास मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

JMMकडे 19 आमदार असल्यानं हेमंत सोरेन विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेता म्हणून हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात आवाज उठवला.

JMMला नव्या पिढीचा पक्ष बनवला

झारखंड मुक्ती मोर्चाला नव्या पिढीचा पक्ष बनवण्याचं श्रेय हेमंत सोरेन यांना जातं. हेमंत सोरेन यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावर पक्षाला सक्रीय केलं, आणि पक्ष माध्यमांपासून दूर राहतं, ही प्रतिमा त्यांनी बदलली.

आताच्या निवडणुकीदरम्यान हेमंत सोरेन यांनी माध्यमांशी मोठ्या प्रमाणात बातचीत केली, सभांचा धडाका लावला आणि पक्षाला सुस्थितीत आणून ठेवलं.

सध्याच्या विधानसभेत हेमंत सोरेन साहीबगंज जिल्ह्यातील बरहेट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2014 सालीही त्यांनी दुमकामधून निवडणूक लढवली होती. मात्र तिथं ते पराभूत झाले होते.

यंदा त्यांनी दुमका मतदारसंघात भाजपच्या लॉईस मरांडी यांचा 13,188 मतांनी पराभव केला.

मुख्यमंत्री असताना हेमंत सोरेन यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षणासारखे निर्णय घेतले. आता झालेल्या निवडणुकीत त्यांनी मागास जातींसाठी 27 टक्के आरक्षणाचं आश्वासन दिलंय. आदिवासींच्या जमिनीचा मुद्दाही त्यांच्या अजेंड्यावर आहे.

CNT आणि SPT कायद्यात दुरुस्ती करण्याच्या रघुवर दास यांच्या सरकारच्या निर्णयाविरोधातल्या आंदोलनाचे हेमंत सोरेन हे नेतृत्त्व करत होते. हेमंत सोरेन यांनी रघुवर दास यांच्या भूसंपादन कायद्यातल्या दुरुस्तीच्या प्रयत्नांनाही विरोध केलाय. 'जल-जंगल-जमीन' या मुद्द्यांवर हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं ही निवडणूक लढवली होती.

हेमंत सोरेन यांच्या राजकारणाचं महाराष्ट्राशी साम्य

झारखंड आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत फरक असला, तरी काही साम्यस्थळंही आढळतात.

झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपने 2010ची झारखंड विधानसभा एकत्र लढवली. मात्र, त्यावेळी अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद या सूत्रावर ते एकत्र आले होते. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपच्या अर्जुन मुंडा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर हेमंत सोरेन हे उपमुख्यमंत्री बनले.

मात्र, दोन वर्षानंतर दोन्ही पक्षात बिनसलं आणि ते वेगळे झाले. भाजप आणि JMM वेगळे झाल्यानंतर काँग्रेस-राजदनं पाठिंबा दिला आणि हेमंत सोरेन 2013 साली थेट झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

महाराष्ट्रात 2019च्या निवडणुकीनंतर अगदी असंच झालं नसलं, तरी झारखंडमध्ये 2010 ते 2013 दरम्यान जे झालं, त्यातल्या काही गोष्टी प्रकर्षांनं महाराष्ट्रातल्या गेल्या दोन महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये दिसून येतात.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे 2019च्या विधानसभा लढल्या. मात्र, अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेनं भाजपसोबत घरोबा तोडला. त्यानंतर काँग्रसे-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी भाजपच सत्तेबाहेर राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळं दोन्ही राज्यांची राजकीय स्थिती, समीकरणं जरी वेगळे असले, तरी काही गोष्टी सारख्याच घडल्याच्या दिसून येतात.

एक गोष्ट योगायोग म्हणता येईल, भाजपला सत्तेबाहेर ठेवणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह एकच आहेत - धनुष्यबाण.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)