राजधानी एक्सप्रेस फक्त एका मुलीसाठी का चालवावी लागली?

    • Author, रवि प्रकाश
    • Role, रांचीहून, बीबीसी हिंदीसाठी

3 व 4 सप्टेंबर दरम्यान रांची रेल्वे स्टेशनवर पत्रकार आणि छायाचित्रकारांची गर्दी जमली होती. रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलीस बलातील जवानसुद्धा त्यावेळी उपस्थित होते.

धुर्वा परिसरात राहणारे मुकेश चौधरी हेसुद्धा आपला मुलगा अमनसोबत या गर्दीत उभे होते. त्यांना आपल्या मुलीच्या येण्याची प्रतीक्षा होती. त्यांची मुलगी राजधानी एक्सप्रेसने रांचीला येणार होती.

रात्री पावणेदोनच्या सुमारास रेल्वेचा भोंगा ऐकू आला. धडधडत रेल्वे प्लॅटफॉर्मवर दाखल झाली.

रेल्वे थांबताच लोक बी-3 बोगीजवळ पोहोचले. या डब्यातच मुकेश चौधरी यांची मुलगी अनन्या चौधरी बसलेली होती.

मुकेश चौधरी डब्यात जाऊन अनन्याला भेटले. सामान घेऊन दोघेही बाहेर आले.

पण दोघांना बाहेर आलेलं पाहताच उपस्थित पत्रकारांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले. सर्वांनी अनन्या चौधरीचे फोटो घेतले.

नंतर मुकेश चौधरी आपला मुलगा आणि मुलीसह घरी रवाना झाले.

पण असं नेमकं काय घडलं होतं? अनन्या चौधरी हिचा फोटो घेण्यासाठी इतकी गर्दी का जमली होती?

कारण, आजपर्यंत कधीच घडलं नाही, ते याठिकाणी घडलं होतं.

अनन्याने डाल्टनगंज ते रांचीपर्यंतचा प्रवास राजधानी एक्सप्रेसमधून एकटीनेच केला होता.

डाल्टनगंज ते रांची हे अंतर सुमारे 535 किलोमीटर आहे. फक्त एका प्रवाशासाठी इतक्या लांब अंतरावर रेल्वे चालवण्याची ही पहिलीच वेळ होती.

इतकंच नव्हे तर तिच्या सुरक्षेसाठी खास रेल्वे पोलीस दलसुद्धा तैनात करण्यात आलं होतं.

त्यामुळेच हा प्रवास ऐतिहासिक ठरला.

पण या राजधानी एक्सप्रेसचं तिकीट फक्त अनन्या चौधरी हिनेच काढलं होतं का?

उत्तर - नाही.

या रेल्वेत 930 प्रवासी होते. रेल्वे मार्गावर आंदोलन सुरू असल्याने रेल्वे डाल्टनगंज स्थानकावर थांबवण्यात आली. रेल्वेतील 929 प्रवासी तिथंच उतरले. तिथून रांचीला जाण्यासाठी बसची सोय करण्यात आली होती. मात्र, अनन्याने बसने जाण्यास नकार दिला.

अनेकवेळा समजावून सांगितल्यानंतरसुद्धा अनन्या ऐकली नाही. अखेर दुसऱ्या मार्गाने सुमारे 15 तास उशिराने तिला रांचीला पोहोचवण्यात आलं. त्यामुळेच रांची स्टेशनवर तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली होती.

आंदोलन कशामुळे?

झारखंडमधील टाना भगत समुदायातील लोकांनी आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यांनी रांची-डाल्टनगंज रेल्वेमार्गही रोखून धरला.

यामुळे रांचीला जाणारी राजधानी एक्सप्रेस डाल्टनगंजवरच थांबवण्यात आलं. त्यावेळी अनन्या गाडीत आपल्या सीटवर झोपलेली होती.

सकाळी साडेदहा वाजता तिला वडिलांचा फोन आला. तेव्हाच तिला गाडी थांबल्याचं कळलं.

हा संपूर्ण घटनाक्रम अनन्याने बीबीसीशी बोलताना सांगितला.

ती सांगते, "माझी वरची सीट होती. यामुळे रेल्वे कधी थांबली मला कळलंच नाही. रेल्वे लेट आहे, असं मी झोपेतच पप्पांना सांगितलं. तेव्हा रेल्वे पाच तास लेट असल्याचं एका वयस्कर काकांनी मला सांगितलं. मी खाली उतरून पाहिलं तर डाल्टनगंज स्टेशन होतं.

टोरी या ठिकाणी रेल्वे मार्ग बंद असल्याचं सांगण्यात आलं. मुगलसरायमध्येही रेल्वे दुसऱ्या मार्गाने जाईल, अशी घोषणा होत होती. पण जुन्याच मार्गाने रेल्वे का आणण्यात आली, हा प्रश्न मला पडला. या प्रश्नाचं उत्तर रेल्वेच्या कोणत्याच अधिकाऱ्याकडे नव्हतं.

अनन्याने सकाळी साडेअकरा वाजता ट्वीट करून रेल्वेमंत्र्यांना याची माहिती दिली. सुमारे 1 वाजता त्यांनी दुसरं ट्वीट केलं. तोपर्यंत इतर प्रवासी खाली उतरून गोंधळ घालू लागले होते.

काही वेळानंतर अधिकारी तिथं आले. मार्ग बंद असल्यामुळे रेल्वे पुढे जाणार नाही, प्रवाशांसाठी बसची सोय केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

अनन्या म्हणते, "इतर प्रवाशांनी हा पर्याय स्वीकारला आणि ते बसने जाण्यासाठी निघाले. पण मी माझ्या म्हणण्यावर कायम होते. मी रेल्वेचं भाडं भरलं आहे, त्यामुळे रेल्वेनेच पुढचा प्रवास करेन, असं मी त्यांना सांगितलं."

ती सांगते, "रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मला समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर घाबरवलं. कुटुंबीयांचा नंबर मागितला. पण मी नंबर दिला नाही. तिकीट मी खरेदी केलाय, त्यामुळे माझ्याशीच चर्चा करा, असं मी म्हणाले. आता ती रेल्वेत एकटीच प्रवासी उरली होती. अधिकाऱ्यांनी मला कॅब करून पाठवण्याचा पर्यायही दिला. पण मी ऐकले नाही. माझी लढाई माझ्यासाठी नाही तर संपूर्ण व्यवस्थेसाठी होती."

अनन्या पुढे सांगते, "काही वेळानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे गया-गोमो मार्गे रांचीला जाईल, यामध्ये खूप वेळ जाईल, असं सांगितलं. आहे, एकटी प्रवासी असल्यामुळे माझ्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले. संध्याकाळी चार वाजता रेल्वे डाल्टनगंजहून निघाली. गया-गोमो मार्गे ती रांचीला पोहोचली. रेल्वेने मी सकाळी केलेल्या ट्वीटवर संध्याकाळी सात वाजता प्रतिक्रिया दिली, तोपर्यंत माझी रेल्वे गोमोपर्यंत पोहोचली होती."

रेल्वेची ही यंत्रणा चुकीची आहे, असं अनन्याला वाटतं.

कोण आहे अनन्या चौधरी?

रांचीच्या धुर्वा परिसरात राहणारी अनन्या बनारस हिंदू विद्यापीठात कायद्याची विद्यार्थिनी आहे.

तिचे वडील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनमध्ये (HEC) काम करतात. कमी वयातच अनन्याच्या आईचा मृत्यू झाला होता.

पदवीपर्यंतचं शिक्षण रांचीमध्ये पूर्ण केल्यानंतर कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी तिने BHU ला जाण्याचा निर्णय घेतला.

रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

रांची रेल्वे विभागाचे वरिष्ठ DCM अवनीश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "राजधानी एक्सप्रेसला पुढे रांचीलाच यायचं होतं. कारण इथून पुन्हा तिचा पुढचा प्रवास निर्धारित होता. लोकांनी याची तिकिटं काढलेली होती. रेल्वेप्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही बसची सोय केली कारण दुसऱ्या मार्गाने येण्यासाठी जास्त वेळ गेला असता.

अवनीश कुमार पुढे म्हणतात, "अनन्या चौधरी बसने जाण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांना रेल्वेनेच आणण्यात आलं. यामध्ये एका प्रवाशासाठीच ही विशेष रेल्वे चालवली, असं काही नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)