You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा संसर्ग गरोदरपणात झाल्यास गर्भपाताची शक्यता किती?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
आत्तापर्यंत आपल्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग गरोदर मातेकडून बाळाला होण्याची शक्यता असते हे माहिती होतं. पुण्यात आईच्या गर्भातच बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती. मात्र, कोव्हिड-19 च्या संसर्गामुळे मिस-कॅरेज म्हणजेच गर्भपात होऊ शकतो का? यासंदर्भात बीबीसी मराठीने कोरोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात घेतलेला हा आढावा...
मुंबईतील एका महिलेचा गरोदर असताना अचानक गर्भपात झाला. संशोधनानंतर स्पष्ट झालं, या महिलेचा गर्भपात कोव्हिड-19च्या संसर्गामुळे झाला. मुंबईच्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
का करण्यात आलं संशोधन?
मुंबईत राहणारी ही महिला दोन महिन्यांची गरोदर असताना एका कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली. या महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली. या महिलेला कोरोनाची लक्षणं दिसून येत नव्हती. पण, तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहून औषधोपचारांनंतर ही महिला कोरोनामुक्त झाली.
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झाल्यानंतर 13 व्या आठवड्यात ही महिला रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात सोनाग्राफी करण्यासाठी गेली. तेव्हा गर्भ मृत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. याचं कारण काय असावं? याबाबत माहिती घेत असताना, गर्भपातास COVID-19 चा संसर्ग कारणीभूत असल्याचा संशय डॉक्टरांना आला.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कांदिवलीच्या ईएसआईसी (ESIS) रुग्णालयातील डॉक्टरांनी संशोधनासाठी राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेकडे संपर्क केला. ज्यानंतर या महिलेच्या गर्भपातास कोव्हिड-19 चा संसर्ग कारणीभूत आहे का? या दिशेने संशोधन सुरू झालं.
'कोव्हिड-19 मुळे झाला गर्भपात'
कोरोनाची लागण झाल्यामुळे गर्भपात झाल्याची घटना समोर आली नव्हती. राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेच्या संशोधकांच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 मुळे गर्भपात झाल्याची ही बहुदा पहिलीच घटना होती.
याबाबत बीबीसीशी बोलताना संस्थेच्या मॉलिक्युलर आणि सेल्युलर बायलॉजी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. दिपक मोदी सांगतात, "आम्ही या महिलेची पुन्हा कोरोना तपासणी केली. ही महिला कोरोनामुक्त होती. मात्र, गर्भपाताचे कारण शोधण्यासाठी आम्ही प्लॅसेंटा, गर्भाशयातील अॅमनिऑटीक फ्लूईड आणि गर्भाची कोरोना चाचणी केली. धक्कादायक म्हणजे, या तिन्हीमध्ये कोव्हिड-19 व्हायरस असल्याचं आम्हाला आढळून आलं. याचा अर्थ, आईच्या गर्भाशयात गर्भाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरस गर्भाच्या मृत्यूला कारणीभूत आहे."
खरंतर, प्लॅसेंटा आईपासून गर्भाला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी एक मजबूत भिंत म्हणून काम करते. मग असं का व्हावं? प्लॅसेंटाला छेद देवून कोव्हिड-19 व्हायरस गर्भापर्यंत पोहोचण्याचं कारण काय?
"कोव्हिड-19 हा फुफ्फुसांमध्ये झपाट्याने पसरणारा व्हायरस आहे. पण, आमच्या संशोधनात आढळून आलं की, फुफ्फुसांमध्ये या व्हायरसला वाढण्यासाठी असणारी पोषक परिस्थिती किंवा मशिनरी प्लॅसेंटामध्येही उपस्थित असते. या पोषक परिस्थितीत कोव्हिड-19 व्हायरस प्लॅसेंटामध्ये राहून वाढू शकतो. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यात प्लॅसेंटा मजबूत झालेली नसते. ती तयार होत असल्याने कमकुवत असते. त्यामुळे व्हायरसची वाढ झाल्यानंतर ही भिंत तुटते आणि व्हायरस गर्भापर्यंत पोहोचतो," असं डॉ. मोदी सांगतात.
डॉ. मोदी यांच्या माहितीनुसार, प्लॅसेंटामध्ये व्हायरस मोठ्या संख्येने वाढला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यामुळेच गर्भाचा मृत्यू झाला आहे. सर्व तपासणी केल्यानंतर गर्भाच्या मृत्यूला फक्त कोव्हिड-19 कारणीभूत आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
व्हर्टिकल ट्रान्समिशनमध्ये, आईच्या रक्तातून व्हायरस प्लॅसेंटामध्ये, त्यानंतर अॅम्निऑटीक फ्लूइडमधून गर्भापर्यंत पोहोचतो, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
गरोदर महिलांनी सतर्क रहावं
राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेने 22 ऑगस्ट 2020 ला कोव्हिड-19 ची लागण गर्भपातास कारणीभूत असल्याचा रिपोर्ट पब्लिश केला होता.
याबाबत बीबीसीशी बोलताना संस्थेच्या संचालक डॉ. स्मिता महाले म्हणतात, "या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कोव्हिड-19 व्हायरसला वाढण्यासाठी प्लॅसेंटामध्ये पोषक परिस्थिती असते. या ठिकाणी व्हायरस बाइंड होवू शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. आईपासून बाळाला होणाऱ्या संसर्गाबाबत (व्हर्टिकल ट्रान्समिशन) अधिक संशोधन करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही गरोदर महिलांची रजिस्ट्री बनवण्यास सुरूवात केली आहे."
पण गरोदर महिलांमध्ये कोव्हिडची लक्षणं का दिसून येत नाहीत? याबाबत NIRRH चे शास्त्रज्ञ डॉ. राहुल गजभिये सांगतात, "बहुसंख्या गरोदर महिलांमध्ये कोव्हिड-19 ची लक्षणं दिसून येत नाहीत. या महिला प्रसूतीसाठी आल्यांनतर त्यांची चाचणी करण्यात येते. कोव्हिड-19 मुळे पहिल्या तीन महिन्यात गर्भपात झाल्याची प्रकरणं घडली असतीलही. पण, बहुदा पहिल्या तीन महिन्यात तपासणी न झाल्याने आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचली नसेल."
या संशोधनाचा उद्देश काय?
गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यात कोव्हिड-19 गर्भपातास कारणीभूत ठरू शकतो का, याबाबतचं संशोधन राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेनं ईएसआईसी रुग्णलयासोबत केलं होतं.
या संशोधनाबाबत बीबीसीशी बोलताना ईएसआईसी रुग्णालयाच्या वरिष्ठ कंन्सल्टंट डॉ. प्राजक्ता शेंडे म्हणाल्या, "या संशोधनाचा प्रमुख उद्देश लोकांना याबाबत माहिती देण्याचा होता. कोव्हिड-19 व्हायरस गर्भपाताचं एक कारण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी काळजी घेतली पाहिजे. या महिलेच्या प्रकरणात गर्भपाताचं कारण कोरोना व्हायरसशी जोडलेलं आहे का? यासाठी हे संशोधन करण्यात आलं. ही फक्त एक केस समोर आली आहे. अशा प्रकरणांमध्ये अधिक संशोधन गरजेचं आहे."
गरोदर महिलांची रजिस्ट्री
डॉ. राहुल गजभिये म्हणतात, "गरोदरपणात कोव्हिड-19 चा संसर्ग झालेल्या राज्यभरातील महिलांची माहिती राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था ठेवत आहे. यासाठी राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयं आणि नायर रुग्णालयाकडून माहिती गोळा केली जात आहे. आत्तापर्यंत 1000 हून अधिक महिलांची माहिती गोळा करण्यात आली आहे. यातील फक्त 10 टक्के महिलांमध्ये कोव्हिडची लक्षणं दिसून आली आहेत."
व्हर्टिकल ट्रान्समिशन्स
पुण्याच्या ससून रुग्णालयात आईपासून बाळाला गर्भातच कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. देशातील व्हर्टिकल ट्रान्समिशनची ही पहिली केस होती. ज्यावरून हे स्पष्ट झालं की आईकडून बाळाला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते.
मार्च 2020 मध्ये स्वित्झर्लॅंडमध्ये एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर प्लॅसेंटामध्ये कोव्हिड-19 व्हायरस असल्याचं आढळून आलं होतं.
(स्त्रोत- जामा नेटवर्क)
'गरोदर महिलांची काळजी घेणं आवश्यक'
गरोदर महिलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. याबाबत बोलताना पुण्याच्या मदरहूड रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणतात, "गरोदर महिलांना कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक आहे. गर्भारपणात महिलांना काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ नये. गरोदर महिलांना ठराविक वेळी तपासणीसाठी बोलावण्यात येत आहे. एकाच दिवशी त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्यात करण्यात येतात जेणेकरून त्यांना वारंवार रुग्णालयात येण्याची गरज नाही."
"सरकारच्या निर्देशांनुसार प्रसूतीपूर्व महिलांची कोव्हिड-19 तपासणी करण्यात येते. गर्भवती महिलांना सुरूवातीच्या तीन महिन्यात कोव्हिड-19 चाचणी करणं बंधनकारक नाही. फक्त महिलांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वत:ची काळजी घेण्यावर भर द्यावा," असं डॉ. पवार पुढे म्हणाल्या.
स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांची संघटना फॉग्जीच्या मेडिकल डिसॉर्डर कमिटीच्या डॉ. कोमल चव्हाण बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "एका प्रकरणावरून आपण आईकडून बाळाला गर्भात कोव्हिड-19 चा संसर्ग होतो असं म्हणणं योग्य ठरणार नाही. जगभरात अजूनही कोव्हिड-19 व्हायरसमुळे व्हर्टिकल ट्रान्समिशन होण्याचा काही एस्टॅब्लिश रोल नाहीये. यासाठी आपल्याला रॅन्डमाइज कंट्रोल ट्रायल करायला हवी. यावर अजून अभ्यास होणं गरजेचं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)