You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉल्बी-डीजेचा दणदणाट ठरू शकतो गर्भपाताचंही कारण
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"एक दिवस असा येईल जेव्हा ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या रोगांचा आपल्या भोवती फास असेल. या रोगांशी लढणं तितकंच अवघड असेल जितकं गेल्या शतकात प्लेग किंवा कॉलराशी लढणं अवघड होतं."
नोबेल पारितोषिक विजेते जीवाणू तज्ज्ञ रॉबर्ट कोच यांनी 1905मध्येच हे विधान केलं होतं. त्याचे पडसाद आता जाणवायला लागले आहेत.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाचा आलेला निर्णय. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि डीजेवर घातलेली बंदी उठवायला कोर्टाने नकार दिला.
डीजेवरील बंदी उठवावी अशी याचिका 'पाला' या संघटनेनं केली होती. पण मुंबई हायकोर्टानं ती फेटाळली.
या मुद्दयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हा निर्णय योग्य वाटतो तर काहींना हा धर्मात हस्तक्षेप वाटतो आहे.
भरीस भर म्हणून राजकीय नेत्यांनाही या वादात उडी घेतली आहे.
कोर्टाचा आदेश असतानाही पुन्हा एकदा 'आपण डॉल्बी वाजवणारच' अशी ठाम भूमिका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.
डॉल्बीसाठी आपण नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशीच उभे राहू, असे करताना न्यायालयाचा अवमान होत असेल तरी त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही असे उदयनराजे असंही विधान त्यांनी केलं होतं.
दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंनीही गणेशोत्सव मंडळाची परवानगी असेल तर बिनधास्त डीजे वाजवा, असं डीजे-डॉल्बीवाल्यांना सांगून एक प्रकारे याला पाठिंबाच दर्शवला आहे.
सण येत जात राहतील, मात्र उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असं हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं होतं.
ज्या डीजे-डॉल्बीवरून राज्यात एवढं रान पेटलं आहे, त्याच्या दणदणाटाचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात माहिती आहे?
हृदयविकार, डायबेटिस होण्याचा धोका
औरंगाबादचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. तुकाराम औटे म्हणतात की, "ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणं, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात."
"तसंच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात वावरलं तर जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो."
ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम
कान-नाक-घसा तज्ज्ञ असलेल्या डॉ. नीता घाटे सांगतात की, सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरं होण्याची शक्यता असते. "मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
जितका जास्त काळ हा आवाज पडेल तितका धोका वाढत जातो. अनेकदा कानात सतत शिटी वाजल्यासारखे, मधमाशा गुणगुणल्यासारखे आवाज येतात. याला टीनीटस असं म्हणतात. ही परिस्थिती तात्पुरती असू शकते किंवा कायमस्वरूपीही."
मोठ्या आवाजामुळे होणारे बहिरेपणाचे किंवा कानाचे त्रास टाळता येण्यासारखे आहेत. डीजे-डॉल्बीवर असणारी बंदी त्यामुळे स्वागतार्ह आहे असंही त्या म्हणतात.
वेळेपूर्वी प्रसूती तसंच गर्भपाताचा धोका
डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि नवजात शिशू यांच्यावर. "कर्कश आवाजामुळे पोटातलं बाळ दचकू शकतं. त्यामुळे बाळाची हालचाल वाढते.
ही हालचाल सतत होत राहिली तर आईची वेळेपूर्वीच प्रसूती होऊ शकते," असं चाळीसगावमधले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय चव्हाण सांगतात.
"दुसरं म्हणजे बाळाच्या तसंच आईच्या हृदयाचे ठोके वाढतात. क्वचित प्रसंगी गर्भपाताचाही धोका असतो.
पोटात असताना मोठा आवाज सतत कानी पडला तर त्याचा मानसिक परिणाम होऊन बाळ नंतरही आवाजाला घाबरू शकतं. कधीकधी हा परिणाम आयुष्यभर सोबत राहू शकतो," ते पुढे नमूद करतात.
त्वचेचे आजार
होय, मोठ्या आवाजामुळे त्वचाविकारही होऊ शकतात. "कर्णकर्कश आवाजात सतत वावरलात तर त्वचेचे आजारही होऊ शकतात," असं डॉ. तुकाराम औटे सांगतात. "अर्थात ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे, अशांनाच मोठ्या आवाजामुळे त्वचेचेही आजार होतात. इतरांना होण्याची शक्यता फारच कमी असते,"असंही डॉ. औटे स्पष्ट करतात.
मानसिक आरोग्यावर परिणाम
ठणठणाटामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. "संगीताविषयी प्रत्येकाची एक आवड-निवड असतो. ते ऐकताना त्याचा आवाज कमी असावा की जास्त हाही चॉईस असतो. पण डीजे-डॉल्बीवाल्या संगीताने फक्त झिंग येते. ते संगीत कानाला गोड वाटतच नाही," असं कोल्हापूरमधल्या सायकोथेरेपिस्ट शुभांगी कारखानीस सांगतात.
"त्यामुळे हा ठणठणाट ऐकला की सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास म्हणजे चिडचिड वाढणं. याचा झोपेवरही परिणाम होतो आणि त्यामुळे माणसं अजूनच वैतागतात. माझा स्वतःचा असा अनुभव आहे."
"आमच्या घरासमोर दहा दिवस गणपती असायचा. रात्रभर तिथे गोंगाट चालायचा, त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा येणं, आळसावलेलं वाटणं आणि चिडचिड होणं अशी लक्षणं दिसायची. दुसरं म्हणजे ज्या लोकांची मानसिक स्थिती ठीक नसते, त्यांनी सततचा गोंगाट ऐकला तर मात्र त्यांच्यातला आजार बळावू शकतो. नैराश्यासारखा आजार असणाऱ्या लोकांना अजूनच त्रास होऊ शकतो," असंही त्या सांगतात.
हायकोर्टाच्या निर्णयावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचाही विचार करायला हवा, असाच या डॉक्टरांचा प्रातिनिधिक सूर आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)