शेतकरी आंदोलन: अमित शाह यांच्या बैठकीला गैरहजर राहणारे उगराहा कोण आहेत?

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

9 डिसेंबरला होऊ घातलेल्या आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यानच्या चर्चेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांना अनौपचारिक भेटीचं निमंत्रण दिलं. याबद्दल शेतकरी नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या अनौपचारिक चर्चेसाठी 13 शेतकरी नेत्यांना बोलवण्यात आल्याची माहिती बीबीसी पंजाबीचे पत्रकार सरबजीत धालीवाल यांनी दिली.

पंजाबातली सगळ्यांत मोठी शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान युनियन (उगराहा)चे नेते या बैठकीसाठी गेलेले नाहीत.

ही एक अनौपचारिक चर्चा असल्याचं भारतीय किसान युनियन (राजेवाल)चे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी बीबीसीला सांगितलं. ते या बैठकीत सहभागी होत आहेत.

पण काही नेत्यांनी या बैठकीसाठी एकटं जायला नको होतं, यामुळे शेतकरी संघटनांमधल्या एकजुटीबद्दल शंका निर्माण होऊ शकते असं मत भारतीय किसान युनियन (उगराहां)चे नेते जोगिंदर सिंह उगराहा यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलंय.

जोगिंदर सिंह उगराहां
फोटो कॅप्शन, जोगिंदर सिंह उगराहां

आजच्या बैठकीसाठी सरकारकडून आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं त्यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं.

यामुळे शेतकरी संघटनांमध्ये फूट पडतेय का, अशी शंका व्यक्त केली जातेय.

या बैठकीबद्दल सगळ्या शेतकरी संघटनांना कळवण्यात आलं नाही, हा शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो असं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांच्याशी बोलताना सांगितलं.

मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेधा पाटकर गेली अनेक वर्ष नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा देत आहेत.

अमित शाहांसोबतच्या बैठकीबाबत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहेत.

अमित शहांनी शेतकरी नेत्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटायला बोलवल्याचं सगळ्यात आधी भारतीय किसान युनियन (टिकैत)चे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी जाहीर केलं होतं. यानंतर 13 जण गृहमंत्र्यांना भेटायला जाणार असल्याचं संध्याकाळी साडेचार वाजता शेतकरी नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेत जाहीर केलं.

पण ही बैठक नेमकी कुठे होतेय याबद्दल पत्रकारांनी संध्याकाळी 7 वाजता पत्रकारांनी या शेतकरी नेत्यांना विचारलं असता, आपणही याबद्दलची माहिती काढत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गृह मंत्रालय किंवा मग अमित शाहांच्या सरकारी निवासस्थानी ही बैठक होईल, असं सुरुवातीला सांगण्यात आलं.

त्यानंतर ही बैठक पुसा इन्स्टिट्यूटच्या गेस्ट हाऊसमध्ये हत असल्याचं सांगितलं गेलं.

पण गृहमंत्र्यांशी चर्चेसाठी गेलेले 13 शेतकरी नेते या बैठकीमध्ये इतर सगळ्या समूहाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होत असून आपण सगळे एकत्र असल्याचा दावा गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांच्याशी बोलताना केला.

कोण आहेत उगराहा?

जोगिंदर सिंह उगराहा हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा आहेत. संगरुर जिल्ह्यातील सुनाम शहरात ते राहतात. शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असणाऱ्या लढ्यात उतरले. 2002 मध्ये त्यांनी भारतीय किसान युनियन (उगराहा)ची स्थापना केली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते संघर्ष करत आहेत.

जोगिंदर सिंह अमोघ वक्तृत्वासाठी ओळखले जातात. लोकांना एकत्र आणणं हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी उभारलेली संघटना पंजाबमधल्या प्रमुख शेतकरी संघटनांपैकी एक आहे. पंजाबमधील मालवा हा त्यांचा बालेकिल्ला आहे.

"गेली वीस ते पंचवीस वर्ष मी जोगिंदर यांना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना पाहतो आहे. ते लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतात. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचं काम नसतं," असं संगरुरचे स्थानिक पत्रकार कंवलजीत लहरागागा यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)