शेतकरी आंदोलन दिल्ली : ‘तुम्हाला माहिती आहे देश विकला गेलाय, कसं माहिती असेल तुमचे तर डोळेच बंद आहेत’

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

फोटो कॅप्शन, रात्रीच्यावेळी पाहारा देणारे शेतकरी
    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

"आपनु पता है? देश बिक गया है, अरे खाक पता होंगा, आपकी आखें कहा खुली है? " ( तुम्हाला माहिती आहे देश विकला गेलाय, कसं माहिती असेल, तुमचे तर डोळेच बंद आहेत.) दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात फेरपटका मारत असताना एक व्यक्ती सतत मागून येऊन एकच वाक्य बोलत होता.

रात्री उशीरा आंदोलनाची काय स्थिती असते हे पाहाण्यासाठी मी मुद्दाम रात्री 12 नंतर त्या भागात गेले होतो. मीडियाची मंडळी आली आहेत, असं कळल्यावर रात्रीचा पहारा देणारे काही तरूण आमच्याशी बोलण्यासाठी आले. आंदोलनाचा तो परिसर. मी त्यांच्याबरोबर फिरत असताना ही 'देश बिक गया है' बोलणारी व्यक्ती माझ्या मागेमागे फिरत होती आणि ज्या ज्यावेळी माझ्याशी बोलण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी मला एकच वाक्य ऐकवत होती.

सुरुवातीला मी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं. थोडेसे मळके कपडे, डोक्याला मुंडासं आणि भलमोठं पोट सुटलेली ही व्यक्ती मला काहीशी वेगळी वाटली. त्यांनी सतत हे वक्तव्य करत राहिल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पंजाबीमध्ये सरकार आणि मीडियाबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला एखादा नशा केलेला किंवा मानसिक रुग्ण भासलेली ही व्यक्ती शेतकरी होती. चांगली शिकलेली होती. पण, टीव्हीवर आणि मीडियामध्ये येणारं वेगवेगळ्या प्रकारचं कव्हरेज पाहून बेजार झालेली होती.

मी त्यांना कॅमेरावर बोलता का, असं विचारल्यावर भडकून नकार दिला. मला फोटोसुद्धा काढू दिला नाही. "तुम्ही आता काहीच करू शकत नाही, आपल्या कुणाच्याच हातात आता काहीच उरलेलं नाही," असं म्हणत त्यांनी भारतातल्या काही बड्या कंपन्यांना दुषणं द्यायला सुरुवात केली. शेवटी मी त्यांना नमस्कार केला. त्यांचं म्हणण ऐकून घेतल्यानंतर मात्र त्यांनी माझ्या मागेमागे येणं बंद केलं.

70 वर्षांचे तरूण शेतकरी

दिल्लीत डिसेंबरच्या महिन्यात चांगलीच थंडी पडते. दिल्लीत सध्या किमान तापमान 12 अंशाच्या आसपास असतं. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री उघड्यावर झोपण झोखमीचं असतं. त्यामुळेच रात्रीच्या वेळी आंदोलनात काय परिस्थिती असते हे पाहाण्यासाठी मी तिथं पोहोचलो होतो. रात्री 12च्या सुमारास तिथं पोहोचल्यानंतर 70 वर्षांचे 2 पुरूष पहारा देण्याचं काम करत होते. दोघांचंही नाव सतसिंग होतं.

"रात्रीच्यावेळी आमच्या ट्रॅक्टर्सची आणि सामानाची चोरी होऊ नये आणि आमच्या इतर बांधवांना शांत झोपता यावं म्हणून आमची इथं ड्युटी लागली आहे," ते सांगू लागले.

पाहारा देणारे शेतकरी

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

इथं आलेल्या प्रत्येक जिल्ह्याचा किंवा शहराचा मिळून एक डेरा आहे. त्यातल्या प्रत्येकाला कामाची वाटणी करून देण्यात आली आहे.

त्यातल्याच काही मंडळींना साफसफाईचं काम देण्यात आलं होतं. रात्रीच्यावेळी सर्व परिसर साफ करण्याची कामं ही मंडळी करत होती. त्यांच्या जोडीला सरकारी सफाई कर्मचारी सुद्धा दिसत होते.

मागे राहिलेल्या शेतीसाठी व्हॉट्सऍप ग्रुप

लोक झाडू मारत असल्याचा धुरळा बाजूला सारत पुढे जातो तोच एक छोटेखानी डिस्पेंसरी आणि औषधांचं वाटप करणारा मांडव दिसला. 8-10 माणसं त्यात ओळीने झोपलेली दिसली. पण 30 वर्षांचे हरपाल सिंग मात्र जागे होते.

व्हीडिओ कॅप्शन, दिवसभर धगधगणाऱ्या शेतकरी आंदोलनात रात्री जागता पहारा कसा असतो?

डोक्यावर पगडी आणि शॉल पांघरलेले हरपाल कुणाला इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर गैरसोय होऊ नये म्हणून जागे असल्याचं सांगत होते. औषधांबरोबरच त्यांच्याकडे आंघोळीचा साबण, टुथब्रश, पेस्ट, शॅम्पु सारख्या गोष्टीसुद्धा होत्या.

"आमच्या जमीनी वाचल्या तरच आमचे इतर उद्योगधंदे आणि आम्ही वाचू त्यामुळे गुरूदासपूरमधलं माझं पशूखाद्याचं दुकान बंद ठेवून इथं आले आहे," हरपाल सांगू लागले.

परपाल सिंग

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

फोटो कॅप्शन, हरपाल सिंग

हरपाल एकटेच नाहीत. त्यांच्या सारखे हजारो लोक या आंदोलनात स्वतःची शेती आणि उद्योगधंदे मागे सोडून आले आहेत. पण आपल्यामागे आपण लावलेल्या पिकांची निगा निट राखली जावी यासाठी आता पंबाजमधल्या प्रत्येक गावात व्हॉट्सऍप ग्रुप सुरू करण्यात आल्याचं एका तरूणाने मला सांगितलं.

कुणाच्या शेतात कधी किती पाणी आणि खत द्यायचं आहे याची माहिती त्या व्हॉट्सऍप ग्रुपवर दिली जाते. त्यानुसार मग त्या त्या वेळी ती ती जबाबदारी गावी माघारी थांबलेले लोक पार पाडतात.

"आम्ही आंदोलन करत आहोत म्हणून आमची शेतं ओसाड पडलेली नाहीत. आम्ही त्यांची सोय लावून इथं आलो आहोत," तो तरूण सांगत होता.

पंजाबच्या गावांतून रोज येते रसद

गावांमध्ये माघारी राहिलेली मंडळी आंदोलनाला काही कमी पडणार नाही याचीसुद्धा काळजी घेत आहेत. गावांमधून रोज वेगवेगळ्या गाड्या भरून अन्नधान्य, ताज्या भाज्या आणि दुधाचा पुरवठा केला जात आहे. असेच एक स्थानिक धार्मिक नेते एक डेऱ्यात आम्हाला भेटले जे त्यांच्या गावातून लोकांसाठी रसद घेऊन आले होते.

रात्री 2 च्या सुमारास काही तरूणांबरोबर आम्ही त्यांच्या डेऱ्यात प्रवेश करताच 'काय खायला देऊ,' असा पहिला सवाल त्यांच्याकडून आम्हाला आला.

BBC/NileshDhotre

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

वारंवार नकार देऊनही त्यांनी शेवटी आम्हाला रात्री 2 वाजता दूध पिण्यास भाग पाडलं. आमच्या गावातून दूध आणल्याचं त्यांनी सांगितलं. या डेऱ्यामध्ये अन्नधान्य, पीठ, भाजीपाला, तयार खाद्यपदार्थांचा मोठ्ठा ढिग पडला होता. सकाळच्या नाष्ट्यासाठी शेकडो किलो भजींची अर्ध्या कच्च्या तळून रास मांडण्यात आली होती.

नोकदार तरुणांचा असाही सहभाग

हरियाणाच्या कुरुक्षेत्रातून आलेली एक तरुणांची टोळी रात्रीच्यावेळी आंदोलनाचा आढावा घेत होती. काही ठिकाणी तंबू उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा ही टोळी करत होती. उच्चशिक्षित तरुणांची ही टोळी बोलायला लागल्यावर त्यांचे मुद्देही धारधारपणे मांडत होती.

फक्त कुरुक्षेत्रच नाही तर चंदिगढ, मोहाली, अंबाला, मोगा अशा वेगवगळ्या भागातून तरुणांच्या टोळ्या रात्रीच्यावेळी या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत होत्या. शुक्रवारची रात्र असल्याने शनिवार-रविवार आंदोलनात घालवण्याच्या निश्चयानं ही मंडळी येत होती. यातले बरेच तरूण हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे होते.

कुलवंत सिंग

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

फोटो कॅप्शन, कुलवंत सिंग

त्यातलेच एक होते बँकेत काम करणारे कुलवंत सिंग. मोहालीतून ते त्यांची शुक्रवारची ड्युटी संपवून आंदोलनाला येण्यासाठी निघाले होते आणि रात्री उशीरा तिथं दाखल झाले होते.

"नोकरीमुळे आंदोलनात येता आलं नाही, पण आता शनिवार-रविवार सुट्टी आहे, त्यामुळे मी माझी उपस्थिती लावण्यासाठी इथं आलो आहे. रविवारी परत जाईन कारण सोमवारी पुन्हा कामावर जायचं आहे," असं 27 वर्षांचे कुलवंत सिंग सांगत होते.

रात्रीच्या त्या शांततेत फेर फटका मारता एका डेऱ्यावर बरीच गर्दी दिसत होती. मुस्लिम फेडरेशन ऑफ पंजाबचा तो डेरा होता. रात्रीचे 2 वाजता देखील त्यांच्या डेऱ्यात 'मिठे चावल'चं वाटप सुरू होतं. रात्री उशीरा नव्याने आंदोलनात पोहोचणारे तरूण तिथं खाण्यासाठी येत होते.

हरियाणातून आलेले तरूण

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

फोटो कॅप्शन, हरियाणातून आलेले तरूण

आंदोलनाच्या ठिकाणी एन्ट्री पॉइंटवर जेवढे पोलीस दिसले ते तेवढेच. पुढे 7 किलोमीटरच्या आंदोलनाच्या पट्ट्यात एकही पोलीस सुरक्षा देताना दिसला नाही. ठिकठिकाणी सुरक्षेची जबाबदारी त्या त्या डेऱ्यातल्या लोकांनी स्वतः उचलेली होती. काठ्या घेऊन ठिकठिकाणी वयस्कर मंडळी पाहारा देताना दिसत होती.

72 वर्षांच्या हलिंदर सिंग यांच्यावर एका मोठ्या डेऱ्यातल्या अन्नधान्याची रखवालीची जबाबदारी देण्यात आली होती. रात्रीचे 3 वाजता ते आम्हाला भेटले. 'रात्रीचे तीन वाजलेत तुम्ही झोपणार कधी?' असा सवाल मी त्यांना केला तर हासून म्हणाले, "मोदींना जाग आली की मी झोपणार."

हलिंदर सिंग

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

फोटो कॅप्शन, हलिंदर सिंग

पुढे आणखी एक अजोबा लोकांना ब्लँकेट्स वाटण्यासाठी बसले होते. आम्हाला आवाज देऊन त्यांनी विचारलं "तुम्हाला ब्लँकेट हवेत का, तुमच्याकडे पुरेसे गरम कपडे आहेत का?" आम्ही नकार दिला. पण बीबीसीचं आयकार्ड माझ्या गळ्यात पाहिल्यानंतर त्यांनी अस्खलित इंग्रजीत संवाद साधायला सुरुवात केली. त्यांना नमस्कार करून पुढे निघेपर्यंत 4 वाजले होते.

हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांच्या डेऱ्यात खूपच हालचाल दिसत होती. चहा उकळत होता. सर्व वयस्क ताऊ मंडळी हुक्क्याच्या भोवती गोल बसली होती आणि त्यांचा गप्पांचा फड रंगला होता.

ताऊ

फोटो स्रोत, BBC/NileshDhotre

'4 वाजले तुम्ही झोपणार कधी?' असा सवाल केला तर आमची झोप झालीय. आता आमची सकाळ झालीय, असं ही ताऊ मंडळी सांगू लागली. आता तुम्ही आमच्याकडे सकाळचा चहा पिऊनच जा असा आग्रह एका ताऊने धरला.

रात्री 12 ते 4 च्या दरम्यान माझा 2 वेळा दूध आणि 2 वेळा चहा पिऊन झाला होता. हलिंदर सिंग यांनी आग्रहानं शक्करपारी खाऊ घातली होती. सकाळी 4च्या दरम्यान त्या 7 किलोमीटरच्या पट्ट्यात आता सकाळ व्हायला सुरुवात झाली होती.

लोकांना भेटता भेटता त्यांच्याशी बोलता बोलता मी कधी तो 7-8 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केलाय हे मलासुद्धा लक्षात आलं नव्हतं.

क्रमश:

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)