शेतकरी आंदोलनासाठी पैसा कुठून येत होता?

- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे गेतले. या कायद्यांना विरोध करणारे आंदोलन उत्तर भारतात सुरू होते. या आंदोलनाला पैसे कुठून येतात असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला होता.
फतेहगड साहिबचे संदीप सिंग 20 लोकांसमवेत शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला आलेत. दोन ट्रॉलीजमध्ये बसून हे लोक दिल्लीच्या सीमेपर्यंत आलेत. त्यांच्या गटातले 4 जण गावी परत चाललेत तर आणखी 8 लोक त्यांच्या जागी येत आहेत.
संदीप म्हणतात, "माझ्या गव्हाची पेरणी बाकी होती, पण गावातल्या लोकांनी माझ्यामागे माझ्या शेतात पेरणी करून टाकली आहे. आम्ही इथून हलणार नाही, आमच्या मागे शेतीची काम होत राहतील."
संदीपसारखे हजारो शेतकरी दिल्ली हरियाणा सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. ते इथेच स्वयंपाक बनवतात, इथेच जेवतात आणि इथेच झोपतात. हे शेतकरी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात निदर्शन करत आहेत. या कायद्यांनी खाजगी कंपन्या कृषीक्षेत्रात प्रवेश करू शकतील.
सरकारचं म्हणणं आहे की हे कायदे शेतकऱ्याच्या हिताचे आहेत. यामुळे त्याचं उत्पन्न वाढेल पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने हे कायदे आणले आहेत.
कुठून येतात पैसे?
या शेतकरी आंदोलनाविषयी एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे या आंदोलनासाठी पैसा येतोय तरी कुठून? संदीप आणि त्यांच्यासारख्या अनेकांशी आम्ही बातचीत केली तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की या आंदोलनासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घातले आहेत, वर्गणी काढली आहे.
"आम्ही ज्या ट्रॅक्टर्समधून आलोय ते इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त इंधन खातात. येण्या-जाण्यात माझं दहा हजाराचं डिझेल खर्च झालं आहे. आतापर्यंत माझे आणि माझ्या काकांचे एकूण वीस हजार रूपये खर्च झाले आहेत," संदीप सांगतात.
पण त्यांना हे पैसै खर्च झाल्याचं दुःख नाहीये. उलट त्यांना वाटतं की हा पैसा त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी खर्च होतोय. ते म्हणतात, "आता तर दहाच हजार खर्च झालेत. जर हे कायदे लागू झाले तर होणारं नुकसान कित्येक पटीने जास्त असेल."
नृपेंद्र सिंग आपल्या गटासोबत लुधियाना जिल्ह्यातून आलेत. त्यांच्यासमवेत आसपासच्या तीन गावांची लोक आहेत. त्यांच्या गटानेही इथे येण्यासाठी वर्गणी गोळा केली आहे. ते म्हणतात, "आम्ही स्वतः पैसे जमवलेत. गावातल्या लोकांनीही इथे येण्यासाठी खूप सहकार्य केलंय. बाकी जे लोक आमच्यासोबत आलेत तेही आपआपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक सहाय्य करत आहेत."
एनआरआय करतायत मदत
आपल्या परदेशात राहाणाऱ्या मित्राने आपल्याला आर्थिक मदत पाठवल्याचं नृपेंद्र नमूद करतात, "त्यांनी माझ्या खात्यात 20 हजार रूपये टाकले आहेत आणि आश्वासन दिलंय की अजून गरज पडली तर अजून पैसै मिळतील.आमच्या आंदोलनाला पैसै कमी पडणार नाहीत."

या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक लोकांनी सांगितलं की त्यांचे एनआरआय मित्र, नातेवाईक आंदोलनाची माहिती घेत आहेत आणि आर्थिक मदत करत आहेत.
नृपेंद्र म्हणतात की, "आम्ही शेतकरी इतकेही गरीब नाही की आपलं आंदोलन चालवू शकणार नाही. आता जसे इथे लंगर चालू आहेत ना, तसे लंगर आमच्याकडे शेकडो वर्षं चालू आहेत. एकत्र येवून जेवणं ही आमची संस्कृती आहे. आंदोलनाला काही कमी पडणार नाही."
हरियाणा आणि पंजाब
सिंघु बॉर्डरवर हरियाणा आणि पंजाबहून आलेले शेकडो ट्रॅक्टर, ट्रक आणि ट्रॉल्या उभ्या आहेत. रोज यांची संख्या वाढतच चालली आहे. ट्रॉल्यांमध्ये जेवणा-खाण्याचा शिधा भरलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या झोपण्याची व्यवस्था आहे.
इथे दिवसभर चुली पेटलेल्या असतात आणि काही ना काही शिजत असतं. दिल्लीतल्या अनेक गुरुव्दारांनीही इथे लंगर चालवले आहेत. याव्यतिरिक्त दिल्लीतली काही शीख कुटुंबही इथे येऊन लोकांना जेवायला घालत आहेत.

इथेच आम्हाला भेटले इंद्रजित सिंग. ते आपला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आंदोलनात येऊन पोहचले आहेत. त्यांच्या सोबत आलेले लोकही वर्गणी काढून आले आहेत. ते सांगतात, "आम्ही पंधरा जण आहोत. ट्रॅक्टर माझा स्वतःचा आहे आणि त्यात मी इंधन भरलंय. बाकी प्रत्येकाने आपआपल्या ऐपतीप्रमाणे पैसै दिले आहेत. ज्याची जास्त जमीन आहे त्याने जास्त पैसै दिलेत."
ते पुढे सांगतात की "आम्ही घरून निघताना ठरवून आलो होतो की जोपर्यंत आंदोलन चालेल तोवर आम्ही मागे हटणार नाही, परत जाणार नाही. काहीही लागलं तर गावाकडून आम्हाला मदत येते. आमच्या आणि आमच्या आसपासच्या गावांची माणसं येत आहेत, ते येताना घेऊन येतात."
राजकीय पक्षांनी दिले पैसै?
आता हाही प्रश्न विचारला जातोय की आंदोलनातले पैसै राजकीय पक्षांकडून तर येत नाहीयेत ना?
या प्रश्नाचं उत्तर देताना इंद्रजीत आणि त्यांच्यासमवेत आलेले लोक म्हणतात, "ज्या लोकांचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष आम्हाला आर्थिक पाठबळ पुरवत आहेत त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत. आमच्या गावातले ते लोकसुद्धा आम्हाला आर्थिक मदत करतायत जे इथे आलेलेच नाही. काही काही लोकांनी जमेल तेवढी, अगदी 100-100 रुपयांचीही मदत केली आहे."

मनदीप सिंग होशियारपूरहून आलेत. ते आसपासच्या तीन गावांमधल्या शेतकऱ्यांच्या एका गटासोबत आले आहेत. हे लोक दोन ट्रॅक्टर ट्रॉली आणि एका इनोव्हा कारमधून आलेत.
मनदीप म्हणतात, "मी 2100 रूपये दिलेत. आम्ही सगळ्यांनीच खिशातून पैसे काढलेत. आम्ही इथे थांबण्यासाठी कोणावर अवलंबून नाहीत." मनदीप सिंग यांना वाटलं होतं की ते चार-पाच दिवसात परत जाऊ शकतील पण आता त्यांना वाटतं की आंदोलन अनेक दिवस चालेल आणि त्यांना इथेच राहावं लागेल.
"आता वाटतंय की इथे अनेक महिने राहावं लागू शकतं. पण आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता नाहीये. कोणत्याही गोष्टीची गरज पडली की गावकरी आमच्यापर्यंत पोहचवतात."
मनदीप यांचीही पेरणी बाकी होती. ते म्हणतात, "गावातले लोक म्हणतात की तेच आमची पेरणी करून टाकतील. समजा मी परत गेलो तर माझ्या जागी आणखी दोन लोक येतील. आम्ही जे आता करतोय, हे आंदोलन सगळ्यात मोठी गोष्टी आहे आमच्या दृष्टीने. जर ही गोष्ट तडीस गेली नाही तर आमची सगळी पिढी बरबाद होईल. ही कोण्या एका माणसाची लढाई नाही. आमच्या सगळ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे."
अनेक महिन्यांपासून होतेय आंदोलनाची तयारी
पंजाबातल्या तीसहून अधिक शेतकरी संघटनांनी हे आंदोलन उभं केलं आहे. या संघटनांशी संबंधित नेते सांगतात की ते गेल्या चार महिन्यांपासून या आंदोलनाची तयारी करत होते.
किर्ती शेतकरी संघटनेशी संलंग्न असलेले युवा शेतकरी नेते राजिंदर सिंग दीपसिंगवाला म्हणतात, "आमच्या संघटनेने आतापर्यंत या आंदोलनात पंधरा लाख रूपये खर्च केले आहेत. पंधरा लाखांचा निधी आमच्याकडे अजून आहे. सगळ्या संघटनांनी खर्च केलेल्या पैशांचा हिशोब काढला तर आतापर्यंत जवळपास पंधरा कोटी रूपये या आंदोलनावर खर्च झाले आहेत."

राजिंदर सिंह सांगतात की अनिवासी भारतीय पण भरभरून या आंदोलनासाठी निधी पाठवत आहेत. "निधीचा प्रश्नच नाहीये. पंजाबचे शेतकरी आपली लढाई लढण्यासाठी सक्षम आहेत. अर्थात हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाहीये. या कायद्याने मजूर आणि ग्राहकही प्रभावित होणार आहेत. जसंजसं आंदोलन मोठं होईल तसं तसे अनेक सामान्य माणसं आणि मजूर यात सहभागी होतील.
पैशांचा पूर्ण हिशोब
या आंदोलनाशी संलग्न असणाऱ्या संघटनांनी वर्गणी गोळ्या करण्यासाठी गावापासून जिल्ह्यापर्यंत समित्या बनवल्या आहेत. पैशांचा पूर्ण हिशोब ठेवला जातोय. राजिंदर सिंग म्हणतात, "आम्ही एकेका पैशाचा हिशोब ठेवला आहे. ज्यांना पाहायचं असेल ते लोक येऊन पाहू शकतात."
फक्त पैसेच नाही या संघटनांचे नेते आंदोलनात येणाऱ्या लोकांचाही हिशोब ठेवत आहेत. एका नाट्यसंस्थेची तरूण मुलंही आपआपसात वर्गणी गोळा करून इथे आले आहेत.

यातल्याच एका तरूणाचं म्हणणं होतं की, "जो पंजाब अख्ख्या देशाचं पोट भरतो तिथला शेतकरी उपाशी मरणार नाही. आम्ही सगळे आपली आपली व्यवस्था करून आलो आहोत. एका ट्रॉलीत भले एका गावातून पाच माणसं आली असतील पण निधी पूर्ण गावाने दिला आहे. आम्ही आमच्या कष्टाच्या पैशाने हे आंदोलन चालवत आहोत."
संध्याकाळ होता होता पंजाबहून आलेली अनेक नवी वाहनं या आंदोलनात सहभागी होत होती. अनेक ठिकाणी सामान वाहाणाऱ्या गाड्यांमधून पोळ्या बनवायचे मशिन्स उतरवले जात होते.
त्या मशिन्सकडे हात दाखवत एक शेतकरी म्हणाला, "वेळ आली तर आम्ही अख्ख्या दिल्लीला जेवायला घालू."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








