‘दिल्ली चलो’ शेतकरी मोर्चा : ‘शेतकऱ्यांमुळे त्रास होतोय, असं सामान्यांना वाटावं म्हणून सरकारने रस्ते खोदले’

फोटो स्रोत, ANI
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या तीन शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला आहे. या मोर्चाला हरियाणातच रोखण्याचे प्रयत्न झाले. हरियाणा पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलं होतं.
ऐन कडाक्याच्या थंडीत निघालेल्या मोर्चावर पानिपतमध्ये अंग गारठवणाऱ्या रात्रीत पोलिसांनी पाण्याचा मारा केला. मात्र, कुठल्याही अडथळ्याला न जुमानता हा मोर्चा पुढे निघाला.
दिल्लीला हरियाणाशी जोडणाऱ्या शंभू सीमेवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी चार पातळ्यांवर बॅरिकेड्ट उभारले होते.
सर्वात आधी काँक्रिट स्लॅब, त्यानंतर काटेरी कुंपण आणि त्यानंतर सशस्त्र जवान तैनात होते. पोलिसांमागे पाण्याचा मारा करण्यासाठीच्या गाड्या आणि या गाड्यांच्याही मागे मोर्चातल्या गाड्या रोखण्यासाठी वाळू भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करण्यात आले होते.
पहिल्या नजरेत कुणालाही ही अभेद्य तटबंदी वाटावी. मात्र, पंजाबहून दिल्लीला निघालेल्या शेतकऱ्यांना ही अभेद्य तटबंदीही रोखू शकली नाही. ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक आणि गाड्यांमध्ये भरून-भरून दिल्लीला निघालेल्या या शेतकऱ्यांनी याआधी हरियाणात लावण्यात आलेलं बॅरिकेटिंगही पार केलं होतं.
दिल्लीला जाऊन केंद्र सरकारसमोर आपलं म्हणणं मांडल्याशिवाय माघारी परतणार नाही, असा निर्धार हे आंदोलक शेतकरी व्यक्त करतात.
26 वर्षांचे गोल्डी बाजवा पंजाबमधल्या शंभूमधून या मोर्चात सहभागी झाले आहेत. ते म्हणतात, "मी बीएचं शिक्षण पूर्ण केलं. पण मला कुठेच नोकरी मिळाली नाही. आधी माझे आजोबा शेती करायचे, त्यानंतर माझ्या वडिलांनी शेती केली आणि आता मीदेखील शेती करतो. 5 जणांच्या आमच्या कुटुंबाचा खर्च शेतीतूनच भागतो. आमच्याकडे आधीपासूनच नोकरी नाही. खाजगी क्षेत्राला जमीन देऊन आमची शेतीही आमच्याकडून हिरावून घेतली तर आम्ही आमचं पोटही भरू शकणार नाही."

गोल्डी म्हणतात, "आम्ही दिल्लीला जाऊ. आम्हाला आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण केलं ते योग्य असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने आमच्या नोकरी-धंद्याची सोय करावी, आम्ही आपल्या घरी परत जाऊ."
गोल्डी विवाहित आहेत आणि त्यांना एक मुलगाही आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत ते आपल्या कुटुंबाला सोडून या मोर्चात सहभागी झाले आहेत. ते म्हणतात, "आमची परिस्थिती बरी असती तर आज एवढ्या कडाक्याच्या थंडीत आम्ही रात्री रस्त्यावर नसतो. आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही."
गुरूवारी या शेतकऱ्यांनी पानीपतच्या टोल नाक्यावर रात्र काढली. गोल्डी प्रमाणेच शेकडो तरुण शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. यातल्या बहुतांश तरुणांचं हेच म्हणणं आहे - आमच्याकडे काम नाही आणि हाती असलेल्या जमिनीवरही आता सरकारचा डोळा आहे.
जसवीर पानीपतमधल्या जैनपूरमधूनच मोर्चात सहभागी झाले आहेत. ते ऊस संघर्ष समितीचे सदस्य आहेत. जसवीर म्हणतात, "सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच तीन काळे कायदे शेतकऱ्यांवर थोपवले आहेत. हे कायदे माघारी घेतले जात नाहीत तोवर शेतकऱ्यांचा आक्रोश थांबणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत दिल्लीला जाऊ."
शेकडो ट्रॉली धीम्या गतीने दिल्लीकडे निघाल्या होत्या. या ट्रॉलींच्या पुढे छोटे ट्रक आणि चारचाकी गाड्या होत्या. काही आंदोलक थेट मोटरसायकलवरूनच निघाले होते.

रस्त्यात ठिकठिकाणी हरियाणा पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून तिथे माती टाकली होती. तर अनेक ठिकाणी हायवेवर पूल बांधण्यासाठी तयार केलेले मोठे सिमेंटचे स्लॅब रस्त्यावर आडवे टाकून रस्ता अडवला होता.
मात्र, एवढ्या अडचणीसुद्धा शेतकऱ्यांना रोखू शकल्या नाही. आंदोलनकांनी सिमेंटचे स्लॅब हटवले. जिथे हायवेवर रस्ता खोदून माती टाकली होती तिथे हायवे लगतच्या छोट्या-छोट्या गावातल्या कच्च्या रस्त्यांवरून मार्ग काढत दिल्ली गाठली.
आंदोलक शेतकरी दिल्लीला पोहोचू नये यासाठी पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक 44 पूर्णपणे जॅम केला होता. त्यामुळे हायवेवरून जाणारे ट्रक आणि इतर वाहनांनाही त्रास झाला.
एका आंदोलक शेतकऱ्याचं म्हणणं होतं, "आम्ही आमचा मार्ग स्वतःच तयार करतोय. अडथळे सरकारने आणले. शेतकऱ्यांमुळे त्रास होतोय, असं सामान्य जनतेला वाटावं, यासाठी कुठे रस्ता खोदला तर कुठे वाळू भरून ट्रक उभे केले आहेत. मात्र, लोक समजूतदार आहेत. या देशाचा बळीराजा सामान्य जनतेला सतावणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री आहे."

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीकडे कूच केलेल्या या शेतकऱ्यांनी वाटेत कुठेही अडचण आली तर रस्त्यातच बस्तान बसवण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. शेतकरी खाण्या-पिण्याच्या वस्तू, चूल, जेवण तयार करण्यासाठी लागणारी भांडी इतकंच नाही तर अंथरूण-पांघरूण घेऊन निघाले आहेत.
तरुण शेतकऱ्यांचा एक गट अंबालाहून एसयूव्हीने निघाला आहे. कारच्या मागे त्यांनी एक छोटी ट्रॉली बांधली आहे. यात खाण्या-पिण्याची व्यवस्था तर आहेच शिवाय तीन-चार जण आराम करू शकतील, अशीही सोय आहे.
अशा अनेक गाड्या या मोर्चात आहेत. गाडी चालवणारा एक तरुण म्हणतो, "दिल्ली सरकार अजून आम्हा पंजाबी लोकांना ओळखत नाही. आम्ही काय आहोत, हे त्यांना आता कळेलच. आम्ही माघारी परतण्यासाठी नाही तर सामना करण्यासाठी निघालोय."
बॅरिकेड्समध्ये शेतकऱ्यांनी काही सिमेंटचे स्लॅब तोडले. मात्र, मोठ्या स्लॅबला ते हलवू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा करण्याची तयारी करताच शेतकरी हायवेला बायपास करत दिल्लीकडे रवाना झाले.
पहाटे जवळपास चार वाजता हरियाणा-दिल्लीच्या शंभू सीमेवर सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचे जवान अर्धवट झोपेत होते. मीडियाचे कॅमेरे बघताच सगळे खडबडून जागे झाले.
हा नजारा बघताच मला पानीपतच्या एका वृद्ध शेतकऱ्याचे शब्द आठवले. ते म्हणाले होते, "दिल्लीश्वर सावधान, आम्ही येतोय."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








