You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गूढ रोगाचे आंध्र प्रदेशावर सावट, 340 जण रुग्णालयात दाखल
आंध्र प्रदेशात एका गूढ आजारामुळे एकाचा मृत्यू आणि 340 जणांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. यापैकी 180 पुरुष आणि 160 महिला आहेत.
या रुग्णांमध्ये समान लक्षणं दिसून येत आहेत. मळमळ, आकडी येणे, अस्वस्थ वाटणे आणि बेशुद्ध पडणे ही लक्षणं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
हे रुग्ण एलुरू या शहरातले आहेत. हा आजार कशामुळे होतोय याचा तपास आरोग्य अधिकारी घेत आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असताना हा अज्ञात आजार समोर आला आहे.
आंध्र प्रदेशात आतापर्यंत 8 लाखहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत आंध्र प्रदेश देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या दोन दिवसांत रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत नाही. या सर्व रुग्णांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनीवास यांनी दिली.
एलुरू येथील सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, "जे लोक आजारी पडले आहेत त्यापैकी विशेषत: लहान मुलांना डोळ्यात जळजळ झाली आणि त्यांनी अचानक उल्टी करण्यास सुरुवात केली. यापैकी काही जण बेशुद्ध पडले तर काहींना अचानक झटका आल्यासारखे वाटले."
आतापर्यंत 70 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून 270 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
या आजाराचे कारण शोधण्यासाठी विशेष वैद्यकीय टीम एलुरू येथे पाठवण्यात आल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिली. ते रुग्णांना आणि त्यांच्या नातवाईंकांना भेटण्याची शक्यता आहे.व्हायरल संसर्ग असल्याचा कोणताही पुरावा रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळला नाही अशी माहिती आरोग्यमंत्री श्रीनीवास यांनी दिली.
"हे रुग्ण ज्या भागात राहतात त्या ठिकाणची पडताळणी करण्यात आली. तपासाअंती हा आजार पाण्यातून किंवा वायू प्रदूषणामुळे झाला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले." असंही त्यांनी सांगितले.
ते पुढे सांगतात, "हा गूढ आजार आहे आणि केवळ प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर आजाराचे नेमके कारण लक्षात येऊ शकते."
विरोधी पक्ष तेलुगू देसमने हा आजार प्रदूषणामुळे होत असल्याचा दावा केला आहे. या घटनेची चौकशी करावी अशीही मागणी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)