कोरोना व्हायरसचं संक्रमण चीनमधून सुरू झालं नाही, अमेरिकन संशोधकांचा दावा

साधारण वर्षभरापूर्वी संशोधकांना कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars-CoV-2 विषाणूबद्दल समजलं. चीनमधल्या वुहानमध्ये काहीजणांना या विषाणुचा संसर्ग झाल्याच्या बातम्या आल्या.

पण एका संशोधनानुसार एका जागतिक साथीचं कारण बनलेला हा व्हायरस याच्या अनेक आठवड्यांआधीच लोकांमध्ये संक्रमित झालेला होता.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीझ कँट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)च्या संशोधकांनी हा अभ्यास केलाय. क्लिनिकल इन्फेक्शियर डिसीज नावाच्या जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आलंय.

आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार संशोधकांना कोरोना व्हायरसबद्दल अधिकृतरित्या 31 डिसेंबर 2019ला समजलं. न्यूमोनियाची गंभीर लक्षणं आढळणारी अनेक प्रकरणं नोंदवण्यात आल्याचं चीनच्या वुहानमधल्या हुबेई प्रांताच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. श्वसन यंत्रणेचा हा वेगळाच विकार असल्याचं त्यांनी म्हटलं.

पण अमेरिकेच्या तीन राज्यांमधल्या 39 लोकांच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडीज आढळल्या असून चीनने कोरोना व्हायरसविषयीचा इशारा देण्याच्या दोन आठवडे आधीपासून या अँटीबॉडीज या लोकांच्या शरीरात होत्या असं ही जागतिक साथ सुरू होऊन 11 महिने उलटल्यानंतर अमेरिकन संशोधकांनी म्हटलं आहे.

अमेरिकेमध्ये Sars-Cov-2 चं पहिलं प्रकरण 21 जानेवारी 2020ला नोंदवण्यात आलं होतं.

संशोधनाचे निष्कर्ष काय सांगतात?

या संशोधनानुसार अमेरिकेमध्ये 13 डिसेंबर 2019 ते 17 जानेवारी 2020 या काळामध्ये एकूण 7,389 लोकांनी रक्तदान केलं होतं. यापैकी 106 लोकांच्या रक्तामध्ये कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आढळण्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होऊन गेलेला आहे आणि त्याच्या रोग प्रतिकार शक्तीने या विषाणूशी लढण्यासाठीची यंत्रणा - अँटीबॉडीज तयार केलेली आहे.

कॅलिफोर्निया, ओरॅगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये 13 ते 16 डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांपैकी 39 नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडीज आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये मॅसेच्युसेट्स, मिशिगन, रोड आयलंड आणि विस्कॉन्सिनमधून रक्ताचे 67 नमुने गोळा करण्यात आले होते. हा या साथीचा प्रभाव वाढण्यापूर्वीचा काळ होता.

या व्हायरसच्या संपर्कातल आलेल्या लोकांमधले बहुतेकजण पुरुष होते आणि त्यांचं सरासरी वय 52 वर्षं होतं.

या लोकांच्या शरीरामध्ये आधीपासून असणाऱ्या कोणत्या तरी कोरोना विषाणूच्या विरोधात त्यांच्या शरीराने अँटीबॉडीज तयार केल्या असाव्यात असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण ज्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या त्यांच्यापैकी बहुतेकांना त्यावेळी कोव्हिड 19ची लक्षणंही आढळली होती.

अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. पण आता या व्हायरसच्या अस्तित्त्वाबद्दल जी माहिती मिळालेली आहे, त्याचा संशोधनावर काय परिणाम होईल?

व्हायरस सगळ्यात आधी नेमका कुठे आढळला?

Sars-Cov-2 सगळ्यात आधी कुठे आढळला, याचं उत्तर कदाचित कधीच खात्रीशीरपणे देता येणार नाही.

डिसेंबर 2019मध्ये हा व्हायरस चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. पण त्याच्या अनेक आठवडे आधीच हा व्हायरस जगात अस्तित्त्वात होता असं दाखवणारे अनेक पुरावे समोर येत आहेत.

पण या लोकांना अमेरिकेतच संसर्ग झाला की प्रवासादरम्यान त्यांना याचा संसर्ग झाला हे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचं सीडीसीच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

अमेरिकेतल्या रक्तांच्या ज्या नमुन्यांत अँटीबॉडीज आढळल्या, तो रक्तदान कार्यक्रम रेड क्रॉसने आयोजित केला होता. ज्या लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते त्यापैकी फक्त 3 टक्के जणांनी आपण आशियाचा प्रवास केल्याचं सांगितलं होतं.

चीनने या विषाणूबद्दल जगाला सांगण्याच्या आधीच इतर देशांमधल्या लोकांमध्ये कोरोना व्हायरस होता याचे पुरावे इतर काही संशोधनांमधूनही समोर आले होते.

27 डिसेंबरला पॅरिसजवळ एका व्यक्तीवर न्यूमोनियाचा रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले होते पण प्रत्यक्षात ही व्यक्ती कोरोनाग्रस्त होती असं यावर्षीच्या मे महिन्यात फ्रेंच संशोधकांनी म्हटलं होतं.

सांडपाण्याच्या नमुन्यांमध्येही कोरोना व्हायरस आढळल्याचं अनेक देशातल्या संशोधकांनी म्हटलं होतं. कोरोना व्हायरसची जागतिक साथ असल्याचं जाहीर करण्यात येण्याच्या अनेक आठवडे आधी हे नमुने घेण्यात आले होते.

मिलान शहराच्या सांडपाण्यामध्ये 18 डिसेंबरला कोरोना व्हायरसचं अस्तित्त्वं आढळल्याचं इटलीच्या संशोधकांनी जून महिन्यात जाहीर केलं होतं. पण इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण याच्या अनेक दिवसांनी आढळला होता.

स्पेनमध्येही याविषयी एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये जानेवारीच्या मध्यात बार्सिलोना शहराच्या सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यामध्येही कोरोना व्हायरसचे अंश आढळले. पण इथेही हे नमुने घेतल्याच्या चाळीस दिवसांनंतर पहिला रुग्ण आढळला होता.

हा व्हायरस ब्राझीलपर्यंत कसा पोहोचला याविषयीही काही प्रश्न विचारण्यात आले होते.

इथे कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 26 फेब्रुवारी 2020 ला आढळला. ही व्यक्ती होती साओ पाअलो शहरातले 61 वर्षांचे एक व्यापारी. काही दिवसांपूर्वीचे ते इटलीचा दौरा करून आले होते आणि तोपर्यंत इटली या जागतिक साथीचं दुसरं मोठं केंद्र झालेलं होतं.

पण फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सँटा कॅटरिना (UFSC) च्या संशोधक पथकाने याच्या काही महिने आधीच 27 नोव्हेंबर 2019ला सांडपाण्यात विषाणू आढळल्याचं म्हटलं होतं.

ओस्वाल्डो क्रूझ फाऊंडेशनने केलेल्या आणखी एका संशोधनानुसार ब्राझीलमध्ये अधिकृतरित्या कोरोनाचा रुग्ण आढळण्याच्या सुमारे एक महिना आधी 19 ते 25 जानेवारीदरम्यान इथे Sars-CoV-2च्या संक्रमणाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. पण या व्यक्तीने परदेश दौरा केला होता वा नाही, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

वुहानच्या प्राणी बाजारातून व्हायरस पसरला की नाही?

हा Sars-CoV-2 विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये कधी आला, आणि या व्हायरसने लोकांना संसर्ग व्हायला कधी सुरुवात झाली हे अजून समजू शकलेलं नाही.

वुहानच्या ज्या बाजारामध्ये जिवंत आणि मृत जंगली प्राण्यांची विक्री करण्यात येत होती, तिथूनच या सगळ्याला सुरुवात झाल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये संसर्गाची जी प्रकरणं आढळली त्यापैकी बहुसंख्य लोकांचा संबंध या मार्केटशी होता. पण इथूनच व्हायरस एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पसरायला सुरुवात झाली का, याबाबत संशोधक साशंक आहेत.

हाँगकाँग विद्यापीठातले मायक्रोबायोलॉजिस्ट युआन क्वाँग - युंग यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या मते जंगली प्राण्यांची खरेदी - विक्री होणाऱ्या बाजारातून व्हायरस पसरायला सुरुवात झाली असण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसबाबतीची आपली टाईमलाईन चीननेही थोडी मागे नेली आहे. झपाट्याने पसरणाऱ्या एखाद्या व्हायरसच्या उगमाच्या तपासाबाबत असं करण्यात येणं ही मोठी गोष्ट नाही.

चीनच्या वुहानमध्ये डॉक्टर्सनी केलेल्या अभ्यासानुसार इथे कोरोनाच्या पहिल्या प्रकरणाची खात्री 1 डिसेंबरला झाली आणि या व्यक्तीचा त्या प्राणी बाजाराशी काहीही संबंध नव्हता. लँसेट या मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आलं होतं.

या व्हायरसमुळे जागतिक साथ पसरू शकते, हे लक्षात न येता अनेक महिने असा विषाणू जगभर अस्तित्त्वात असणं शक्य नसल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे.

पण हा विषाणू आधीपासूनच अस्तित्त्वात असावा आणि उत्तर गोलार्धातल्या अतिशय थंडीच्या काळात या विषाणूची ओळख पटली असण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)