You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित पवार यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल?
मुंबई महापालिका निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी असला तरी सर्वच पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे सोपविण्याच्या तयारीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी सूतोवाच केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसनं यासंदर्भात अजूनही कोणती अधिकृत घोषणा केली नाहीये. पण मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी मिळणं ही निश्चितच रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टिनं महत्त्वाची गोष्ट ठरू शकते.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फार प्रभावशाली नाहीये. अशावेळी रोहित पवार यांच्याकडे महापालिका निवडणुकांची जबाबदारी दिल्याने पक्षाला फायदा होईल का? सध्याच्या परिस्थितीत रोहित पवार यांच्यासमोर कोणती आव्हानं असतील? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत?
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी, असं म्हटलं होतं.
मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आघाडीतच लढवावी अशी भूमिकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली.
त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार का? हा प्रश्न आहे.
मुंबई महापालिकेवर 1985 साली शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली, त्यानंतर आजतागायत म्हणजे गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. यादरम्यान कधी भाजपसोबत तर कधी एकहाती सत्ता शिवसेनेनं मिळवली.
मात्र, 2017 साली मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढवली. त्यावेळी भाजपनंही शिवसेनेला जेरीस आणलं आणि दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये एका हातावर मोजता येतील इतक्याच जागांचा फरक राहिला.
2017 साली भाजपनं जोरदार टक्कर दिल्यानंतरही अपक्षांच्या साथीनं शिवसेनेनं पालिकेतल्या सत्तेच्या चाव्या हाती राखल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसला 2017 साली अवघ्या 8 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसच्या वाट्याला 28 जागा आल्या होत्या.
सध्याच्या घडीला मुंबईत नवाब मलिक वगळता राष्ट्रवादी काँग्रेकडे मोठा चेहराही नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुंबई महापालिकेत शिवसेनेचं वर्चस्व असताना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत गेल्यास त्यांना तडजोडी कराव्या लागतील का? रोहित पवार यांच्यासमोर हे आव्हान असेल?
याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "आघाडी, जागावाटप या गोष्टींमध्ये रोहित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत सुप्रिया सुळे यांचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
या आघाडीमध्ये काँग्रेसला सोबत घ्यायचं असेल तरी वरिष्ठ पातळीवरील, निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता हवा. त्यादृष्टिनं राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुप्रिया सुळे महत्त्वाच्या ठरू शकतात. "
रोहित पवारांबद्दल बोलायचं झालयास मुंबई महापालिकेची जबाबदारी हे त्यांच्यासाठी एका मोठ्या व्यासपीठावरचं लाँचिंग ठरेल, असं अभय देशपांडे यांना वाटतं.
"आतापर्यंत रोहित पवार हे पुण्यात अधिक सक्रीय होते. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करत असताना रोहित पवार यांच्यासारखा तरुण, फ्रेश चेहरा उपयुक्त ठरेल."
शिवसेनेसोबत आघाडी केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान काय असेल, या प्रश्नाचं उत्तर देताना अभय देशपांडे यांनी म्हटलं की, मुळात राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाहीये. त्यामुळे पूर्वी महापालिका निवडणुकीत (2012 च्या आधी) भाजप-शिवसेना युतीत भाजपला जे स्थान होतं, त्यापेक्षाही कमी स्थान राष्ट्रवादीला मिळेल. काँग्रेससोबतच्या आघाडीतही राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा यायच्या.
'रोहित पवारांमुळे फारसा फरक पडणार नाही'
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पुढे केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडेल, असं वाटत नसल्याचं मत वरिष्ठ पत्रकार किरण तारे यांनी व्यक्त केलं.
किरण तारे यांनी म्हटलं, "राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात 15 वर्षं सत्तेत असतानाही त्यांना मुंबईत स्वतःचं स्थान बळकट करता आलं नव्हतं. कारण त्यांच्याकडे मुंबईत कोणताही 'अॅक्सेसिबल' चेहरा नाहीये. सचिन अहिर काही प्रमाणात होते, पण आता ते शिवसेनेत आहेत.
अशा परिस्थितीत रोहित पवार यांना मुंबईत आणलं तर त्यांची तुलना स्वाभाविकपणे आदित्य ठाकरेंसोबत होईल. आदित्य हे मुंबईत राहिलेत, मोठे झालेत. मुंबईकर त्यांना ओळखतात. तशी स्वीकारार्हता रोहित यांना मिळेल का?"
रोहित यांचं आतापर्यंतचं राजकारण हे पुणे-नगर जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलं असून मुंबईची नस त्यांना कितपत माहीत आहे, असाही मुद्दा किरण तारे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे यांनाही मुंबईत त्यादृष्टिनं राजकीय बेस नसल्याचं सांगत किरण तारे यांनी या दोघांवर मुंबई महापालिकेची जबाबदारी देऊन फार काही साध्य होणार नसल्याचं म्हटलं.
सु्प्रिया सुळे किंवा रोहित पवार यांच्याऐवजी नवाब मलिकांसारखाच वर्षानुवर्षे मुंबईत काम केलेल्या नेतृत्वाला समोर करणं राष्ट्रवादीसाठी अधिक फायद्याचं ठरेल, असंही किरण तारे यांना वाटतं.
मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी मिळाल्यास रोहित यांचं पक्षातील महत्त्व वाढेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना किरण तारेंनी म्हटलं, "हे रोहित पवार यांना मिळणाऱ्या यशापयशावर अवलंबून आहे. त्यांना चांगल्या जागा मिळवता आल्या तर निश्चित त्यांचं पक्षातलं स्थान बळकट होईल. पण जर उलटं झालं तर अपयशाचं खापरंही त्यांच्यावरच फुटणार."
पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यातील सुप्त स्पर्धेचा संबंध देत किरण तारेंनी म्हटलं की, या निवडणुकीत पक्षाची घसरण झाली तर रोहित पवार यांच्यावर पार्थ यांच्याकडूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. मावळमधल्या पराभवानंतर पार्थ यांना पक्षात विशेष जबाबदारी दिली गेली नाही.
मग मुंबई महापालिकेसारख्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अपयश आलं, तर रोहित यांच्या पक्षातील स्थानाला पार्थ यांच्याकडून आव्हान मिळू शकतं.
कोण आहेत रोहित पवार?
रोहित पवार गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झाले. रोहित यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नाहीये.
शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार हे पवारांच्या कुटुंबात पितृस्थानी होते. त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता. पण अजित पवार आधीच सक्रीय असल्याने त्यांना ती संधी मिळाली नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती ऍग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला.
पण राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित यांना राजकारणात रस होता. त्यांनी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राजकारणाला सुरूवात केली.
रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलं होतं, की रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरूवात केली. विधानसभेसाठी त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावक्षेत्राबाहेरचा मतदारसंघ निवडला, तिथं काम केलं आणि निवडूनही आले. त्यांनी स्वतःसाठी 'ग्राउंड' तयार केलं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)