महाराष्ट्रात मंदिरं बंद असताना जैन मंदिरं उघडण्यासाठी कशी मिळाली परवानगी?

दिवाळीच्या काळात मुंबई आणि राज्यातली 102 जैन मंदिरं उघडण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटलं होतं की दिवाळी हा जैनांसाठी मोठा सण असून या काळात जैन मंदिरं उघडण्याची परवानगी देण्यात यावी.

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे महाराष्ट्र सरकारने अजूनही धार्मिक प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी परवानगी दिली नाहीये. या निर्णयाच्या विरोधात दोन जैन मंदिर ट्रस्टनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने 102 मंदिर उघडण्याची परवानगी नाकारत फक्त ज्या ट्रस्टनी याचिका दाखल केली होती त्यांची मुंबईतली दोन जैन मंदिर, धनत्रयोदशी ते भाऊबीज या काळात अतिशर्तींसह खुली करायला परवानगी दिली.

परवानगी मिळालेली जैन मंदिर दादर आणि भायखळा या भागात आहेत. इतर मंदिरांनी स्वतंत्रपणे कोर्टात याचिका दाखल करावी असंही कोर्टाने म्हटलं.

जैन मंदिरं उघडण्यासाठी परवानगी कशी मिळाली?

मुंबई हायकोर्टाच्या न्या. एस. जे. काठेवाला आणि न्या अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अॅड प्रफुल्ल शाह यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की दिवाळी हा सण जैनांसाठी अतिशय शुभ समजला जातो, त्यामुळे त्यांना या काळात मंदिरांत जाता आलं पाहिजे म्हणूनच मंदिरं खुली करावीत.

याआधी ऑगस्ट महिन्यात पर्युषण पर्वात जैन मंदिरं खुली करण्याची परवानगी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिली होती, असं वृत्त मुंबई मिररमध्ये आलं होतं. याचा दाखलाही अॅड शाह यांनी कोर्टाला दिला.

सुप्रीम कोर्टाने पर्युषण पर्वात मुंबईतली तीन जैन मंदिर दोन दिवसांसाठी खुली करण्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी म्हटलं होतं की, "अशी परवानगी गणपती किंवा तत्सम सणांसाठी देता येणार नाही कारण त्यावेळी मोठ्या संख्येन लोक जमा होतात."

आताही खुल्या करण्यात आलेल्या मंदिरांना कठोर अटीशर्तींचं पालन करावं लागणार आहे. ही मंदिरं दिवाळीच्या काळात पाच दिवसांसाठी सकाळी 6 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या काळात खुली राहाणार आहेत. मंदिरात दर पंधरा मिनिटांना फक्त 15 भाविक आत सोडले जातील.

राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. त्यावर दिवाळी हा फक्त जैन बांधवांचा सण नसून समस्त हिंदूंसाठी महत्वाचा आणि मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीचे पाच दिवस जैन समुदायासाठीच फक्त महत्वाचे आहेत, असा याचिकाकर्त्यांचा दावा निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं.

"हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान या सर्वच धर्मातील भाविक, श्रद्धाळू, त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यास उत्सुक आहेत. मात्र, राज्य सरकारला कोरोना परिस्थितीचे भान आणि जाण आहे. दिवाळीनंतर मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत विचारविनिमय सुरू असून सध्याच्या परिस्थितीत सरकारने संयमी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जैन समुदायानेही संयम राखवा," असंही त्यांनी म्हटलं.

सध्या राज्य सरकारने राज्यात धार्मिक प्रार्थनास्थळं खुली करण्याची परवानगी दिलेली नाही.

हिंदू पुरोहितांचा विरोध

या निर्णयावर साधू महंतांनी यावर आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्र शासन न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडल्याचं म्हटलं आहे. नाशिकच्या संस्थान श्री काळाराम मंदिराचे पुजारी आणि निर्वाणी आखाडाचे महंत सुधीर दास महाराज यांनी सरकारवर या विषयावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

दोन जैन मंदिरांच्या ऐवजी एक जैन आणि एक हिंदू मंदिर उघडण्यास परवानगी का नाही मागितली असा प्रश्न उपस्थित केला आहे.

!रस्त्यांवर लाखोंची गर्दी असताना सरकारला फक्त हिंदू मंदिरांमध्येच कोरोना दिसतोय का," असा सवाल देखील महंत सुधीरदास महाराज यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "या केसमध्ये राज्यसरकारने बाजू नीट मांडली नाही. सरकार काही ठराविक लोकांच्या पक्षपाती धोरण स्वीकारत आहे. हिंदूंची मंदिरं जाणीवपूर्वक बंद ठेवली जात आहेत असा संशय येतोय. हिंदूंच्या बाबतीत अतिपरिचयात अवज्ञा असं तर होतं नाहीये ना?"

पण सरकारने ही दोन जैन मंदिरं खुली करायलाही विरोध केला होता.

राज्य सरकारचं काय म्हणणं?

दुसरीकडे राज्य सरकारने मात्र राज्यातली मंदिरं खुली करण्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याविषयी जनतेला संबोधित करताना म्हटलं होतं, "प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मंदिरावरुन माझ्यावर टीका केली जाते. मात्र राज्यातील लोकांसाठी आपण मंदिरं उघडायला उशीर करत आहोत. मात्र लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील."

माझ्यावर टीका होत असली तरी हरकत नाही, मी महाराष्ट्रच्या भल्यासाठी टीका सहन करायला तयार आहे. टीका करणारे चार दिवस टीका करतील पण उद्या त्यांच्यामुळे आपल्यावर संकट आलं तर? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)