You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड वादात उदयन राजेंच्या एंट्रीमुळे या वादाला जातीय वळण मिळाले आहे का?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी (9 नोव्हेंबर) भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
गेले काही दिवस ही मालिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या या वादाशी उदयनराजे भोसले यांचा काय संबंध आहे आणि हा वाद त्यांची भेट घेतल्यामुळे कसा मिटणार, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नांची उत्तर समजून घेण्याआधी हा सगळा घटनाक्रम काय होता, ते पाहू.
मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आपल्या सहकलाकाराच्या वागणुकीमुळे ही मालिका सोडत असल्याचं म्हटलं.
दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यांनी प्राजक्ता यांच्याबद्दल काही आक्षेपही घेतले.
"मला सीरिअलमधून काढण्यात आलं नाहीये, मी स्वतःहून ही मालिका सोडली आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत," असं अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
मग तुम्ही मालिका सोडण्याचं नेमकं कारण काय होतं या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता गायकवाड यांनी सहकलाकार विवेक सांगळे यांनी केलेली शिवीगाळ आणि त्यासंबंधीच्या तक्रारीची न घेतली गेलेली दखल हे मालिकेतून बाहेर पडण्याचं कारण असल्याचं सांगितलं.
"त्यांनी अतिशय आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. मी मालिकेच्या निर्मात्या या नात्याने अलका कुबल यांच्याकडे तक्रार केली. पण दोन-तीन वेळा याबद्दल बोलूनही त्यांनी दखल घेतली नाही," असा आरोप अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केला आहे.
"त्या मुलाने त्यांना शिव्या दिल्या नाहीत. प्राजक्ताने त्याला गाडीतून उतरायला सांगितल्यामुळे त्याला राग आला. तो गाडीबाहेर उतरून फोनवर कोणाशी तरी बोलायला लागला," असं म्हणत मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्यावरील आणि अभिनेता विवेक सांगळेवरील आक्षेपांना उत्तर दिलं.
"प्राजक्ता गायकवाड या सेटवर खूप उशिरा यायच्या. आशालता, शरद पोंक्षे, मंजुषा गोडसे यांच्यासारखे सीनिअर कलाकार चार-चार तास थांबायचे. आमचं सत्तर जणांचं युनिट आहे. सगळं युनिट एकटीसाठी ताटकळत थांबायचं.
"अनेकदा उशीर झाल्यामुळे आम्हाला नाइट शूटिंगही करावं लागलं आहे. या सगळ्यांत निर्माती म्हणून आर्थिक नुकसानही झालं," असं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
...आणि अलका कुबल यांना मागावी लागली माफी
सोशल मीडिया, मुलाखतींच्या माध्यमातून अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांनी आपली बाजू मांडली होती. अशाच एका मुलाखतीदरम्यान अलका कुबल यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.
प्राजक्ता गायकवाड यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्याच अनुषंगानं अलका कुबल बोलत होत्या.
मात्र संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्यानं अलका कुबल यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. काही संघटनांनी अलका कुबल यांनी माफी मागावी अशीही मागणी केली.
अलका कुबल यांनीही आपण अनवधानानं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ पोस्ट केला होता.
संभाजी महाराजांचा एकेरी मुद्दा हा एक भाग झाला. अभिनेता विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावं असा सूरही उमटताना दिसत होता.
उदयनराजेंची भेट का?
"आई माझी काळुबाईचं शूटिंग साताऱ्यात हिंगणगाव इथं सुरू आहे. या वादामुळे शूटिंग बंद पाडण्यात येईल, अशा धमक्या आम्हाला येत होत्या," असं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"उदयनराजे हे आपल्याला भावासारखे आहेत. म्हणूनच या वादाच्या पार्श्वभूमीवर हक्काने त्यांची भेट घेतली,' असं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचंही अलका कुबल यांनी म्हटलं.
उदयनराजे भोसले यांनीही आपल्या ट्वीटरवरून या भेटीबद्दल लिहिताना म्हटलं की, "ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी भेट घेऊन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली."
खरंतर प्राजक्ता या मालिकेतून बाहेर पडल्या आहेत. त्यांच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप यांना कास्ट करण्यात आलंय आणि वीणा यांनी शूटिंगही सुरू केलंय.
वादाला जातीय वळण?
त्यामुळे प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल एकत्र येणार हे स्पष्ट झालं. मग उदयनराजे यांची भेट घेऊन अलका कुबल यांनी नेमका कोणता मेसेज दिला? यात जातीचं राजकारण आहे का?
प्राजक्ता गायकवाड यांनी आपल्यावरील आरोपांचं खंडन करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी संबंधित आहोत, असं म्हटलं होतं.
दुसरीकडे अलका कुबल यांनी उदयनराजेंची भेट घेतल्यानंतर त्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करताना म्हटलं की, "आज आई माझी काळुबाई'च्या टीमवर केले जात असलेले निराधार आरोप आणि येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मी स्वतः मराठा कुटुंबात जन्मले आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, कोणत्याही चुकीच्या आरोपांवर विश्वास ठेवू नये."
प्राजक्ता गायकवाड यांनी बडोदा घराण्याशी असलेल्या संबंधांचा केलेला उल्लेख तसंच महाराणी येसूबाईंची रील इमेज यांमुळे त्यांना संभाजी ब्रिगेड, शिवबा संघटनेसारख्या मराठा संघटनांचा पाठिंबा मिळताना दिसत होता.
उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळेच त्यांची भेट घेऊन तसंच आपण स्वतः मराठा कुटुंबातील असल्याचं सांगत अलका कुबल याही अप्रत्यक्षपणे मराठा संघटनांचा पाठिंबा मिळवू पाहत आहेत का?
अलका कुबल यांची याबद्दलची भूमिका आपण केवळ शूटिंग निर्वेधपणे पार पाडावं म्हणून उदयनराजेंची भेट घेतली अशी आहे.
"गेल्या काही दिवसात जो वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला शूटिंग बंद पाडण्यात येईल अशा धमक्या काही संघटनांकडून आल्या होत्या. अभिनेता विवेक सांगळेलाही ट्रोल केलं जात होतं. त्यामुळेच उदयनराजेंची भेट घेऊन त्यांच्या कानावर आमच्या अडचणी घातल्या," असं अभिनेत्री आणि मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी म्हटलं.
दुसरीकडे या वादाबद्दल बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं की, "अनेक सीरिअलमध्ये कलाकारांची रिप्लेसमेंट होत असते. तो प्रॉडक्शन हाऊसचा अधिकार असतो. पण अलका कुबल यांनी आधी सोशल मीडियावरून प्राजक्ता आणि त्यांच्यामधला व्यावसायिक वाद सार्वजनिक केला. आरोप-प्रत्यारोप झाले. सुरूवातीला त्या आक्रमक होत्या. कोणत्याही दबावाला घाबरत नसल्याचं म्हणत होत्या. मग आता त्या उदयनराजेंची भेट का घेत आहेत?"
"प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्या वादात आम्हाला पडायचं नाही. आम्ही तो जातीय वळणावर नेणारही नाहीये. पण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या, भ्रम पसरवणाऱ्या या मालिकेबद्दल अलका कुबल यांचं काय म्हणणं आहे? त्या आधारावर आमचा या मालिकेला विरोधच आहे," असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)