You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्तियाज जलील यांची चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका, 'त्यांना वाटतं तेच हिंदू धर्माचे ठेकेदार'
मंदिरं आणि मशिदी उघडण्याच्या मागणीवरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात आता नवा वाद सुरू झाला आहे.
हिंदूच्या ठेकेदारीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.
औरंगाबादमध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना मंदिरं खुली करण्यासाठी निवेदन देणार असल्याचं जलील यांनी सांगताच, आमची मंदिरं खुली करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा पवित्रा खैरे यांनी घेतला.
अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात धार्मिक स्थळं खुली करण्यात यावी अशी मागणी एमआयएमकडून करण्यात आली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिरात जाऊन पुजाऱ्यांना निवेदन देऊ तसंच मंगळवारी स्वत: मशीद खुली करू असं म्हटलं होतं.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी "मंदिरांबाबत जलील यांनी भूमिका घेऊ नये. आमचे आम्ही बघू. मुख्यमंत्री सांगतील तेव्हा मंदिरं खुली करू," अशी भूमिका घेतली आहे.
पाच ते सहा दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच "मंदिरांना हात लावून तर बघा, आम्ही उत्तर देऊ," असंसुद्धा त्यांनी एमआयएमला उत्तर देताना म्हटलंय.
चंद्रकांत खैरे यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देतना टीव्ही-9 मराठीशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, "जे लोक वाद घालत आहेत त्यांना जातीधर्माचं राजकारण करायचं आहे, त्यांना असं वाटतं की हिंदू धर्माचे तेच ठेकेदार आहेत. मी लोकांचा खासदार आहे, माझ्याकडे लोक येतात ते माझी जात आणि धर्म पाहून येत नाहीत. मीही त्याचं काम करताना त्यांची जात आणि धर्म विचारत नाही. ही लोकांची भावना आहे की मंदिरं आणि मशिदी उघडल्या पाहिजेत. मी मंदिरात गेलो तरी मंदिराचं पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत."
औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची भेट घेऊन मंदिरं खुली करण्याबाबतचं निवेदन एमआयएमकडून देण्यात येणार आहे. तर बुधवारपासून मशिदी उघडण्याबाबत करण्याची मोहिमही राबवली जाणार आहे.
एमआयएमकडून मंगळवारी हे निवेदन देण्याचं ठरलं होतं. पण त्याआधीच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे खडकेश्वर मंदिराबाहेर पोहोचले. त्यावेळी त्यांच्याबरोबर काही शिवसेना कार्यकर्तेदेखील होते. त्यानंतर पोलीसही मोठ्या फौजफाट्यासह तिथं दाखल झाले.
कायदा सूव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून एमआयएमकडून मंदिर उघडण्याबाबतचं आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
सध्या स्थिती जैसे थे आहे, पण खैरे आणि जलिल यांच्यात शाब्दिकयुद्ध रंगलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)