'अर्णब गोस्वामींचे व्यक्तीस्वातंत्र्य महत्त्वाचे मग भीमा कोरेगाव कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे नाही का?'

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींना अंतरिम जामीन मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

अर्णब गोस्वामींच्या जामिनावर त्यांच्या बाजूने तसेच विरोधात इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी या सुटकेचं स्वागत केलं आहे तर काही जणांच्या मते अर्णब गोस्वामीप्रमाणेच इतर कार्यकर्त्यांची देखील सुटका व्हावी असं म्हटलं आहे.

सुनावणीदरम्यान न्या. चंद्रचूड यांनी व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा मांडला. व्यक्तीस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत ही " व्यक्ती कोण आहे. त्याचे विचार तुम्हाला आवडतात की नाही, हे विसरून जा. मी स्वतः त्यांचं चॅनेल पाहत नाही. पण, आमच्याकडे एक नागरिक आला आहे. आम्हाला प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचं रक्षण करायचं आहे," असं न्या. चंद्रचूड यांनी म्हटलं.

अर्णब गोस्वामी यांना मिळालेल्या अंतरिम जामिनावरून आता ट्विटरयुद्ध रंगलं आहे. गोस्वामी यांच्या बाजूने आणि विरोधात ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी देवाला नवस बोलणारे भाजप नेते राम कदम लिहितात, "महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात मारलेली सणसणीत चपराक. महाविकास आघाडी सरकारने देशाची माफी मागावी."

तर आसाम सरकारमधले मंत्री आणि भाजप नेते हेमंत बिस्वास सर्मा यांनीही गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळाल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे. ते लिहितात, "सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्याची बातमी वाचून अत्यानंद झाला. तसंच रिपब्लिक चॅनलचे मुख्य संपादक आणि चॅनलविरोधात सूडबुद्धीने करण्यात येणाऱ्या कारवाईचा अंत होईल, अशी आशा मी करतो. अखेर न्याय झाला."

आर. जगन्नाथ लिहितात, "अर्णबच्या शत्रूंनो कायदेशीररीत्या लढा देण्याऐवजी तुम्ही छद्मीपणे वागलात. मौन बाळगणाऱ्या संपादकांनाही याची किंमत चुकवावी लागेल. टीआरपी असो किंवा नसो, आज विजय अर्णबचाच झाला आहे. तुरुंगात बाहेर येणाऱ्या कुठल्या संपादकाला एवढी लोकप्रियता मिळाली आहे?"

शेफाली वैद्य लिहितात, "अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्याचं ऐकून आनंद झाला. त्यांना पुन्हा स्क्रीनवर बघण्याची वाट बघतेय. ते आज रात्री टिव्हीवर येणार असतील तर इतर सर्व चॅनल्सने रघुपती राघव लावावं. कारण आज त्यांना कुणीही बघणार नाही."

न्या. चंद्रचूड यांनी मांडलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा धागा पकडून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे विचारतात, "व्यक्तीस्वातंत्र्य सर्वांत महत्त्वाचं आहे. पण, ते निवडक असावं का? काश्मिरी जनता, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधी किंवा भीमा-कोरेगाव कार्यकर्त्यांचं व्यक्तीस्वातंत्र्य महत्त्वाचं नाही का? रिया चक्रवर्तीसाठी ते महत्त्वाचं नाही का?"

पत्रकार वीर सांघवी यांनीही चंद्रचूड यांच्या निर्णयावर उपरोधिक टोला मारत ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "उत्तम बातमी. न्या. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालय, तुम्ही उत्तम काम केलंत. आता आवश्यक नसताना ज्यांना जामीन नाकारला गेला, त्यांच्याबाबतीतही हेच तत्त्व राबबूया आणि त्याची कठोर अंमलबजावणी करूया."

अनिश गावंडे लिहितात, "सुप्रीम कोर्टाने आज वैयक्तिक स्वातंत्र्याचा मान राखला आहे. आता तोच मान कायम राखून कोरेगाव भीमामध्ये खोट्या आरोपांवर अटक केलेल्या सगळ्याच विद्वानांना कोर्टाने सुटका द्यावी."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)