देवेंद्र फडणवीस यांना भाजप शब्दाचा पक्का आहे, असं का सांगावं लागलं?

बिहारमध्ये नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि भाजप हा शब्दाचा पक्का पक्ष आहे, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी होते. मंगळवारी (10 नोव्हेंबर) जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलं.

पण 'आपण शब्द पाळतो' हे अधोरेखित करण्याची वेळ देवेंद्र फडणवीसांवर का आली?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्येही महाराष्ट्रानं पाहिलेलं 'लहान भाऊ, मोठा भाऊ' राजकारण सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

याचं कारण म्हणजे जेडीयू आणि भाजपच्या जागांमधलं अंतर. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनं भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढवली.

निवडणुकीच्या आधीच भाजपनं नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असं म्हटलं होतं. मात्र निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आणि आता भाजप काय भूमिका घेणार ही चर्चा सुरू झाली.

कारण एनडीएमध्ये भाजपला 74, जेडीयूला 43, जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला चार आणि मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीला चार जागा मिळाल्या.

बिहारच्या निवडणुकांचे कल स्पष्ट होताना दिसल्यावर भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष अजितकुमार चौधरी यांनी आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणीही केली.

'नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, तर शिवसेनेचं श्रेय'

शिवसेना नेते संजय राऊत यांनी निकालांचे कल येत असतानाच बिहार निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं.

त्याचबरोबर महाराष्ट्रानं घालून दिलेल्या धड्यामुळे भाजपला नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असं म्हटलं होतं.

"बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सुरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल," असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

निकालानंतर लिहिल्या गेलेल्या सामनाच्या अग्रलेखातही दिलेला शब्द पाळला गेला नाही, तर महाराष्ट्रात राजकीय महाभारत घडलं. आता कमी जागा मिळून नितीश कुमारांना दिलेला शब्द पाळला गेला, तर त्याचं श्रेय शिवसेनेला द्यावं लागेल, असं लिहिण्यात आलं होतं.

नितीशजींचं नेतृत्व आम्हाला मान्य

देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्रात आपण शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, हे पुन्हा एकदा म्हटलं.

"महाराष्ट्रात उद्धवजींसमोर त्यांच्या संमतीनं आम्ही घोषणा केली होती की मुख्यमंत्री भाजपचाच होईल. आम्ही त्यावर अडून राहिलो. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भाजपच्या अध्यक्षांनी घोषणा केली होती की, नितीशजी मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे."

बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या कामगिरीवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

"त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिटच जप्त झालं नाही, तर त्यांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यांनी शिवसेना बिहार निवडणूक लढवणार अशी मोठा गाजावाजा करून घोषणा केली होती. स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली होती. त्यात पहिलं नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं होतं. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचं नाव होतं. पण काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. त्यामुळे शिवसेनेला आत्मचिंतनाची गरज आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)