You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक : नित्यानंद राय बिहार भाजपचा नवा चेहरा ठरत आहे का?
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी
बिहार विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आगे. पण अजूनही राजकारणाची रंगत काही कमी होताना दिसत नाही. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, टीका-प्रतिटीका सुरूच आहेत.
नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव असा सरळ सामना या निवडणुकीत होताना दिसतोय. अर्थात, दोन्हीकडून युत्या-आघाड्या आहेतच. म्हणजेच, नितीश कुमार हे भाजपप्रणित एनडीएचे नेते, तर तेजस्वी यादव हे काँग्रेससोबतच्या महागठबंधनचे नेते आहेत.
इथेच काही प्रश्न निर्माण होतात, ते म्हणजे, प्रचारात नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांची फौज दिसत असली तरी एरव्ही भाजपचे बिहारमधील नेते म्हणवले जाणारे सुशीलकुमार मोदी फारसे पुढे दिसत नाहीत.
सुशीलकुमार मोदी हे काहीसे पडद्यामागे गेल्याचं एकीकडे चित्र आणि दुसरीकडे नित्यानंद राय यांची चर्चा, अशा दोन्ही गोष्टींचा नीट अभ्यास केल्यास आगामी काळातील नवीन समीकरणांचा अंदाज लागतो, सोबत नित्यानंद राय यांना बिहार भाजपमध्ये इतकं महत्त्वं येण्याबाबतही प्रश्न उपस्थित होतात.
बिहार भाजपचं नेतृत्त्व नेमकं कोण करतंय आणि पुढे सत्ता आल्यास भाजपकडे येणारं सर्वोच्च पद कुणाकडे जाऊ शकतं, याचे काही अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतात. आपण त्या अंदाजांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊया.
गेल्या दहा-पंधरा वर्षांचा इतिहास पाहिल्यास लक्षात येतं की, बिहारमध्ये कधीही भाजप सत्तेत असला की, सुशीलकुमार मोदी हे भाजपला सत्तेत मिळणाऱ्या वाट्याचे सर्वोच्च दावेदार असायचे. म्हणजे, उपमुख्यमंत्रिपद भाजपला मिळाल्यास सुशीलकुमार मोदीच त्या पदावर विराजमान व्हायचे, विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्याकडेच जात असे. मात्र, या निवडणुकीत हे चित्र काहीसं उलट फिरताना दिसतंय. सुशीलकुमार मोदी हे दोन पावलं मागे गेल्याचं चित्र आहे.
बिहार निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वांनी तयार केलेल्या समित्यांमध्येही फारशी मोठी जबाबदारी सुशीलकुमार मोदी यांच्याकडे दिली गेली नाहीये.
सुशीलकुमार मोदी हे बिहार भाजपच्या चित्रातून बाजूला सारले जात आहेत, एवढीच चर्चेची गोष्ट नाहीय, तर या चित्रात ठळकपणे पुढे येत आहेत ते केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे.
याबाबतच्या सर्व शक्यतांचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत.
तत्पूर्वी आपण सुशीलकुमार मोदी आणि नित्यानंद राय यांनी आजवर राजकारणात भूषवलेली पदं पाहूया. जेणाकरून आपल्याला त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज सुद्धा येईल.
सुशीलकुमार मोदी आणि नित्यानंद राय यांचा प्रवास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेल्या सुशीलकुमार मोदी यांचा राजकारणाशी थेट संबंध आला तो 1973 साली. पटना विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे ते सरचिटणीस झाले होते. लालू प्रसाद यादव हे त्यावेळी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते, हेही इथं नमूद करायला हवं.
पुढे सुशीलकुमार मोदी हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात उतरले आणि आणीबाणीच्या वेळी त्यांना अटकही झाली. वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये त्यांनी जवळपास दीड-दोन वर्षे तुरुंगवास भोगला.
पुढे आणीबाणी संपल्यानंतर एबीव्हीपीच्या राज्य सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1977 ते 1986 या कालखंडात एबीव्हीपीसोबत विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये सक्रीय सहभाग घेतला.
1990 साली पटना मध्य मतदारसंघातून विधानसभा लढवली आणि जिंकलीही. नंतर 1995 साली ते पुन्हा याच मतदारसंघातून विजयी झाले.
1996 साली जेव्हा विजयी झाले तेव्हा मात्र त्यांच्याकडे बिहारचं विरोधी पक्षनेतेपद आलं, ते अगदी 2004 सालापर्यंत राहिलं. या काळात त्यांनी लालू प्रसाद यांच्यावरील चारा घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला. त्यात त्यांनी पटना हायकोर्टात लालूंविरुद्ध PIL सुद्धा दाखल केली होती. 2004 साली ते लोकसभा लढून संसदेत गेले.
2005 साली बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सोबतीने सत्ता आल्यानंतर सुशीलकुमार मोदी पुन्हा राज्यात परतले आणि थेट उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. रा
जद-जदयूचा 2013 ते 2017 हा सत्तेचा कालावधी वगळता 2005 ते आतापर्यंत सुशीलकुमार मोदी हे बिहारचे उपमुख्यमंत्री राहिलेत. भाजपचा बिहारमधील चेहरा म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं गेलंय.
सुशीलकुमार मोदी यांच्या तुलनेत नित्यानंद राय हे तसे फारच ज्युनियर आहेत. सुशीलकुमार मोदी हे 68, तर नित्यानंदर राय हे 54 वर्षांचे आहेत.
नित्यानंद राय यांची राजकीय कारकीर्दी 2000 सालापासूनच सुरू झाली. त्यापूर्वी ते एबीव्हीपीमध्ये कार्यरत होते. 2000 ते 2014 या काळात ते बिहारमधील हाजीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत.
2014 साली मात्र त्यांनी उजियारपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मग आमदारकीचा राजीनामा दिला.
गेल्यावर्षी म्हणजे 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते याच मतदारसंघातून जिंकले आणि मोदी सरकारमध्ये त्यांना स्थानही मिळालं. केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदी ते विराजमान झाले.
नित्यानंद राय हे केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहारच्या राजकारणात आगामी काळातील प्रमुख दावेदार मानलं जाण्यालासुद्धा कदाचित हेच कारण असावं, याबाबत फारशी शंका घ्यायला वाव नाही.
'सुशीलकुमार मोदींना स्वतंत्र चेहरा नाहीये'
मुळात सुशीलकुमार मोदी यांना बिहार भाजपमधीलच नेते-कार्यकर्ते नेता मानत नाहीत, असं पत्रकार मणिकांत ठाकूर सांगतात. ठाकूर यांना बिहारच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्षं बिहारमध्ये पत्रकारिता केली आहे.
मणिकांत ठाकूर म्हणतात, "सुशीलकुमार मोदींचा स्वतंत्र चेहरा नाहीये. कारण सुशीलकुमार हे कायमच नितीशकुमार यांच्या मागे फिरताना दिसतात. काही मुद्द्यांवर नितीश कुमार यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवलं असतं, तर ते वेगळा चेहरा ठरले असते. मात्र, तसं होत नाही. शिवाय, बिहार भाजपमध्येही सगळेच जण सुशीलकुमार मोदींना नेते मानत नाहीत."
भारतीय निवडणुकांचा अभ्यास करणारे आणि विशेषत: उत्तरेतील निवडणुकांचं वृत्तांकन केलेले पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर यांना तर सुशीलकुमार मोदी यांची ही निवडणूक शेवटची असल्याची वाटते.
ब्रह्मनाथकर म्हणतात, "सुशीलकुमार मोदी हे भाजपचे बिहारमधील चेहरा नाहीत. किंबहुना, प्रचारातसुद्धा त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. निवडणुकीसंदर्भातल्या कार्यकारिणीत भाजपनं सुशीलकुमार मोदींना एका छोट्या समितीत घेतलंय. हे त्याचेच संकेत आहेत. सुशीलकुमार मोदी निर्णयप्रक्रियेत नाहीत. ते नितीशकुमार यांच्या जवळचे आहेत."
बिहार भाजपचा नवा चेहरा 'ज्युनियर होम मिनिस्टर'?
पण भाजप कार्यकर्त्यांची सुशीलकुमार मोदींवर असेलली नाराजी किंवा सुशीलकुमार मोदी यांची नितीशकुमार यांच्यासोबत असलेली सलगी या एवढ्या कारणांमुळे नित्यानंद राय हे पर्याय ठरू शकतील का?
बीबीसीसाठी बिहारमध्ये काम करणारे पत्रकार नीरज प्रयदर्शी सांगतात त्याप्रमाणे, नित्यानंद राय यांची केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यापासून बिहारमध्ये त्यांना 'ज्युनियर होम मिनिस्टर' म्हणूनच ओळखलं जातं. नित्यानंद राय यांची ही ओळख बिहारच्या आगामी राजकारणाची दिशा दाखवून देणारी आहे.
त्यात नित्यानंद राय हे यादव समाजातून येतात. बिहारमधील जातीच्या राजकारणाचा विचार केल्यास नित्यानंद राय यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जाते.
2016 ते 2019 या कालावधीत नित्यानंद राय हे बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. याच काळात राजद-जदयू यांच्यातील युती तुटून जदयू पुन्हा भाजपच्या सोबत एनडीएत आली होती.
शिवाय, नीरज प्रियदर्शी सांगतात त्याप्रमाणे, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिल्याने नित्यानंद राय यांची पक्षसंघटनेवर मजबूत पकड आहे. पुढे गृहराज्यमंत्री झाल्याने ते अर्थातच राज्यात अधिकचं लक्ष घालत असतात. त्यामुळेही त्यांची पकड आणखी घट्ट झालीय.
मणिकांत ठाकूरही या गोष्टीला दुजोरा देतात की, नित्यानंद राय हे अमिता शाह यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल बिहार भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळा दरारा आहे. संघटनेवरील पकडीसाठी असा दरारा आवश्यक असतो. त्यामुळे पुढे-मागे ते बिहारमध्ये परतल्यास आश्चर्य वाटायला नको.
मात्र, त्याचवेळी मणिकांत ठाकूर हे सुशीलकुमार मोदी यांच्याबद्दलही एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतात. ते म्हणतात, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांच्यासोबत जाऊन जदयू-राजदने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2017 साली जदयूला पुन्हा भाजपकडे आणण्यासाठी सुशीलकुमार मोदीच उपयोगी ठरले होते.
सुशीलकुमार मोदी हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांना हे शक्य झालं, असं मणिकांत ठाकूर सांगतात.
मात्र, इथेच खरं राजकारण दडलंय. सुशीलकुमार मोदी हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात, हे बिहारच्या आगामी राजकारणात सुशीलकुमार मोदी यांना फायद्याचंच ठरेल, असं चित्र नाही.
उद्या सत्तेची समीकरणं बदलण्याची वेळ आली तर सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी नित्यानंद राय यांच्यासारख्या नेत्याचा विचार होऊ शकतो, ही शक्यता पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नाकारत नाहीत.
अर्थात, 10 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि सत्ता कुणाकडे जाईल हे स्पष्ट होईल.
पण याच निकालांवरूनच बिहार भाजपमधल्या आगामी राजकारणाची खरी दिशा स्पष्ट होईल, हे मात्र खरं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)