बिहार निवडणुकीत प्रशासनाची धुरा सांभाळणारे हे मराठी अधिकारी तुम्हाला माहिती आहेत का?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सध्या बिहार निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नितीश कुमारांना यावेळी चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांनी कडवं आव्हान दिलं आहे. कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे.

त्यामुळे रोगाची साथ रोखणं आणि निवडणुका घेणं हे दुहेरी आव्हान तिथल्या प्रशासनासमोर आहे. काही मराठी अधिकारीही तिथे हे आव्हान पेलत आहेत. जाणून घेऊ या त्यांच्या अनुभवाविषयी.

सुजाता चतुर्वेदी 1989 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. बिहारमध्ये काम करणाऱ्या त्या सर्वांत ज्येष्ठ मराठी अधिकारी आहेत. सध्या त्या केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांचं शिक्षण नागपुरात झालं असून लोकप्रशासन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

दरभंगा जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. नंतर त्यांनी बिहार प्रशासनात आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवली. सध्या त्या केंद्र सरकारच्या कार्मिक विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहत आहेत.

डॉ. निलेश देवरे यांनीही आपल्या कार्याने बिहारमध्ये ठसा उमटवला आहे. देवरे 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. मूळचे नाशिकचे आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या देवरे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय का घेतला याची प्रेरणादायक कहाणी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगितली आहे. सध्या ते मधुबनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे.

"इथल्या कामाची पद्धत सुधारणं अतिशय कठीण आहे," असं उद्विग्न ट्वीट त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याविषयी विचारलं असता ते म्हणतात, "ते एक प्रासंगिक ट्वीट होतं. सध्या बिहार निवडणुका होत आहेत आणि त्यासंदर्भातलं एक काम योग्य प्रकारे होतं नव्हतं. म्हणून ते तसं लिहिलं होतं."

बिहार हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे. इथल्या जमीनदारी व्यवस्थेमुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या लोकांना देवत्वाला पोचवण्याची पद्धत इथे अजूनही आहे असं ते नमूद करतात. महाराष्ट्रातून आल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांना बरेच धक्के बसले. पण आता त्यांनी इथे व्यवस्थित जुळवून घेतलं आहे. अनेक चांगली कामं केली आणि त्या कामांची त्यांना वेळोवेळी पावतीही मिळाली आहे. बिहारमध्ये राजकीय हस्तक्षेप अजिबात नाही अशी एक आश्चर्यकारक गोष्ट त्यांनी सांगितली.

याशिवाय अश्विनी ठाकरे, कपिल शिरसाठ या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिरसाठ सध्या मोतिहारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या कामाची ते सोशल मीडियावरून वेळोवेळी माहिती देत असतात.

पोलिसी खाक्यातही महाराष्ट्र अग्रेसर

शिवदीप लांडे हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. 2006 च्या बॅचचे धडाडीचे IPS अधिकारी असलेल्या लांडेंनी बिहारमधील गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे बिहारच्या जनतेत ते प्रचंड लोकप्रिय आहेत.

याचा त्यांनाही फटका बसला होता. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेही झाले. पण तरीही त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. सध्या ते महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मुंबईत अंमली पदार्थ निवारण विभागात काम करताना त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती.

मात्र सायली धुरत यांची कारकीर्द सगळ्यांत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 2010 च्या बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या धुरट मुळच्या मुंबईच्या. 22 व्या वर्षी IPS अधिकारी झालेल्या धुरत यांना बिहार केडर मिळालं आणि त्याबरोबर त्यांच्यासमोर आव्हानांची जंत्री उभी राहिली. मुंबईतून थेट बिहार हा त्यांच्यासाठी मोठा बदल होता. पण तो बदल आता पचवला असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

बिहार सारख्या राज्यात एका महिलेने थेट IPS अधिकारी असणं अतिशय आव्हानात्मक आहे. सध्या अनुपमा निलेकर आणि धुरत या दोन मराठी स्त्रिया आयपीएस आहेत. निलेकर सध्या केंद्र शासनाात प्रतिनियुक्तीवर आहेत.

"मी अगदी 24-25 वर्षांची असताना थेट पोलीस अधीक्षक झाले. माझ्या टीममधले सगळे लोक 40-50 अगदी 55 च्या पुढचेही होते. ते सुरुवातीला माझं अजिबात ऐकायचे नाहीत. सुरुवातीला हे करता करताच माझा खूप वेळ गेला. आता मात्र केडरने मला स्वीकारलं आहे. आताही ही समस्या असली तरी ती कमी झाली आहे." धुरत सांगतात.

सायली धुरत बिहारमध्ये चांगल्या रुळल्या आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांच्या विविधांगी कार्यकाळात सोडवल्या. बलात्काराच्या प्रकरणात तातडीने दोषींना तातडीने शिक्षा मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकदा कौतुकही केलं. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापनासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिकही मिळालं आहे.

कोरोना आणि बिहार

सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. बिहारही त्यातून सुटला नाही. मात्र इतर राज्यांसारखी विदारक परिस्थिती तिथे नाही. नागरीकरण कमी प्रमाणात असल्याने तिथे कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. त्यातच निवडणुकांचं आवाहनही या अधिकाऱ्यांना पेलावं लागत आहे.

निवडणुकीच्या काळात सनदी अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. त्यातच कोरोनाने ही जबाबादारी आणखी वाढवली आहे. मात्र ती समर्थपणे पेलताना हे अधिकारी दिसतात. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्याा मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

अगदी ताज्या दमाचे आयएएस अधिकारी विक्रम वीरकर यांनी यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अनुभव सांगितले. जेव्हा देशाच्या विविध भागातून स्थलांतरित मजूर बिहारमध्ये परत येत होते त्या काळात त्यांचं बिहारमध्ये पोस्टिंग झालं. त्यांची ही पहिलीच नेमणूक होती ही संपूर्ण परिस्थिती पाहून ते उद्विग्न झाले. संपूर्ण भारतात बिहारी मजुरांची हेटाळणी का होते याची कारणं त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर काही दिवस पाटण्याच्या AIIMS मध्ये प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. त्यातच पाटण्याला ESIC तर्फे एक रुग्णालय दोन वर्षांपूर्वी उभारलं होतं. मात्र काही कारणाने ते तसंच पडून होतं. वीरकर यांनी प्रयत्न करून ते सुरू करण्यात मोठा वाटा उचलला. काम करण्यासाठी बिहारमध्ये खूप संधी आहे असं त्यांना वाटतं आणि त्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत. सध्या ते समस्तीपूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.

"भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा य दोन्ही अखिल भारतीय सेवा आहेत. त्यामुळे अधिकाऱ्याला एकाच राज्यात आयुष्यभर सेवा द्यावी लागते. आपल्या राज्यापासून, आपल्या माणसांपासून दूर राहणं इतकं सोपं नाही. त्यामुळे मराठीपण जपण्यासाठी प्रयत्न सुरू असतो. आम्ही सगळे मराठी सणवार साजरे करतो," असं देवरे सांगतात.

देवरे यांना दोन लहान मुली आहेत. घरात मराठी बोलत असल्याचं ते सांगतात. "वर्षातून एक दोनदा महाराष्ट्रात जाणं होतं. सध्या लॉकडाऊन आणि निवडणुकीच्या कामामुळे जाणं झालं नाही," असं ते सांगतात.

तर "महाराष्ट्राची आठवण येतच असते. आता तुमच्याशी मराठी बोलतेय तर बरं वाटतंय नाहीतर इथे राहून इथलीच भाषा बोलली जाते," सायली धुरत सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)