You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक: नितीश कुमार 15 वर्षांच्या सत्तेनंतरही निवडणुकीच्या केंद्रस्थानी कशामुळे?
- Author, प्रवीण शर्मा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चे नेते असतील, असं भारतीय जनता पक्षाने घोषित केलं आहे.
भाजपच्या या घोषणेमुळे "यंदाच्या निवडणुकीत भाजप नितीश कुमार यांना बाजूला सारून स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न करेल" किंवा "चिराग पासवान यांच्या माध्यमातून भाजप ही खेळी खेळत आहे" हे अंदाज तूर्तास तरी बाजूला सारले गेले आहेत.
दुसरीकडे, चिराग पासवान यांनी बिहार निवडणुकीपुरती NDA पासून फारकत घेतली आहे. JDU सोबत निवडणूक लढण्यास नकार देत लोक जनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे.
बिहार विधानसभेसाठी भाजप (121 जागा) आणि जेडीयू (122 जागा) यांचं जागावाटप होऊन, JDU ने उमेदवारही जाहीर केले आहेत.
हे आताचं चित्र आहे. निकालानंतर भाजप नितीश कुमार यांना पाठिंबा कायम ठेवेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय कोड्यात टाकणारा आहे. यामुळे अनेक शक्यता येणाऱ्या काळात दिसू शकतात.
पण बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याकडे प्रचंड ताकद आहे, त्यांच्याशी फारकत घेतल्यास सरकार बनवणं अवघड असल्याचं भाजपला वाटतं.
त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत भाजपने कोणताच धोका पत्करलेला नाही. नितीश कुमार यांनाच नेते मानून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
यंदाच्या निवडणुकीत अँटी-इन्कंबंसी म्हणजेत सत्ताविरोधी लाट असल्याचं सांगितलं जात आहे. याचा फटका जनता दल (संयुक्त)ला बसू शकतो. पण याचा अर्थ जेडीयू पूर्णपणे कमकुवत स्थितीत आहे, असं तज्ज्ञांना वाटत नाही.
कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आलेल्या अडचणी त्यांना घरी परतताना निर्माण झालेल्या समस्या यांच्यावरून नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
स्थलांतरित मजूर नितीश कुमार यांच्यावर नाराज असून त्यांचं मतदान विरोधात जाऊ शकतं, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
जनता दल युनायटेड आणि भाजपच्या जागावाटपाची घोषणा करण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी हेसुद्धा उपस्थित होते.
कुणाला कितीही जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असं मोदी यांनी स्पष्ट केलं होतं.
बिहारमध्ये नितीशकुमार यांना इतकं महत्त्व का?
पटना युनिव्हर्सिटीतील सामाजिक शास्त्र विभागाचे माजी प्रमुख आणि पटना कॉलेजचे माजी प्राचार्य प्रोफेसर नवल किशोर चौधरी यांच्याशी बीबीसीने याबाबत चर्चा केली. त्यांच्या मते नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणात इतकं महत्त्व असण्याची चार कारणं आहेत.
ते सांगतात, "नेतृत्व, सामाजिक न्यायासोबत विकास, NDA सोबत असल्याचा फायदा आणि स्वच्छ प्रतिमा या नितीश कुमार यांच्या जमेच्या बाजू आहेत."
ते सांगतात, "बिहारच नव्हे राजकारणामध्ये देशात सर्वत्रच नेतृत्व हे अत्यंत महत्त्वाचं असतं. लोकशाही देशात नेतृत्त्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हेच मोठं नेतृत्व आहे. त्यांच्याविरुद्ध तेजस्वी यादव यांचा चेहरा आहे. पण नितीश कुमार यांच्या तुलनेत त्यांचं कर्तृत्व मोठं नाही."
ज्येष्ठ पत्रकार अरूण पांडेय सांगतात, "लीडरशीप हा मोठा मुद्दा आहे. जनता दलाला नितीश कुमार यांच्यासाठीच ओळखलं जातं."
त्यांच्या मते, "बिहारमधील भाजप, जनता दल यूनायटेड आणि राजद या तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवून पाहिली. कुणीही पूर्ण बहुमत मिळवू शकलं नाही. नितीश कुमारांनी भाजपसोबत युती केल्यानंतर हे समीकरण यशस्वी ठरलं."
"बिहारच्या राजकारणात जातींच्या आधारे दोन ध्रुव बनले आहेत. बिहारमध्ये यादवांची संख्या 14 टक्के आहे. तर 17 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. दुसरा ध्रुव इतर जातींचा आहे. या जाती भाजपला मतदान करत नाहीत, असं मानलं जातं.
लालू यादव यांच्या मोठ्या व्होटबँकसमोर नितीश उभे राहिले. जातींच्या दोन ध्रुवांपैकी एक लालूंसोबत आहे, तर दुसरा ध्रुव नितीश कुमार यांच्या बाजूने आहे.तेव्हापासूनच बिहारमध्ये नितीश विरुद्ध लालू अशी लढाई पाहायला मिळते."
बिहारमध्ये 16-17 टक्के सवर्ण जाती वगळता 80 टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे.
युतीचं समीकरण
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये NDAने उत्कृष्ट कामगिरी केली. यावेळी 40 जागांपैकी 39 ठिकाणी विजय मिळवण्यात त्यांना यश आलं.
नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाही फायदा झाल्याचं सांगितलं जातं.
भाजपचे बिहारमधील प्रवक्ते प्रेम रंजन पटेल सांगतात, "लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचं काम आणि वचन घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत."
नितीश कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही, त्यामुळे त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, असं प्रोफेसर नवल किशोर चौधरी यांनी सांगितलं.
"भाजपसोबत राहिल्याने बहुसंख्यक हिंदू मतं मिळण्याचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा होतो. नितीश कुमार यांनी लालू यादव यांचा सामाजिक न्यायाचा मुद्दा घेतला. त्यामध्ये विकासाला समाविष्ट केलं. लालू यांच्याप्रमाणेच नितीश कुमार यांनीही जातींचा पुरेपूर वापर करून घेतला. NDA सोबत राहिल्याने त्यांना भाजपचा संघटनात्मक उपयोगसुद्धा झाला," असं चौधरी यांना वाटतं.
अँटी-इन्कंबंसीचा फॅक्टर चालेल का?
अँटी इन्कंबंसी आणि स्थलांतरित मजुरांची नाराजी या विषयावर आम्ही जनता दल (संयुक्त) चे प्रवक्ते कमल नोपानी यांच्याशी चर्चा केली.
ते सांगतात, "राज्य सरकारने या प्रकरणात केंद्राच्या नियमावलींचं पालन केलं. नंतर टप्प्याटप्प्याने मजुरांच्या मदतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले."
भाजप प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांच्या मते, "थोडीफार नाराजी असली तरी नेता निवडण्याची वेळ येईल, तेव्हा लोक नितीश कुमार यांनाच निवडतील."
पांडेय यांच्या मते, "बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या सत्तेनंतर अँटी-इन्कंबसी आहे, पण लालू यांच्या सत्तेविरुद्ध 2005 ला जशी अँटी इन्कंबसी होती, तशी ही नाही."
रोजगार, स्थलांतरित मजूर आणि इतर मुद्दे
बिहारमध्ये बेरोजगारी ही जुनी समस्या आहे. आजपर्यंत ही समस्या कायम आहे. लालू यादव आणि नितीश कुमार दोघांनी प्रत्येकी 15 वर्ष राज्य चालवलं. पण तरीही बेरोजगारी इथली प्रमुख समस्या आहे. राज्यातून होणारं स्थलांतर कायम आहे.
अरूण पांडेय सांगतात, "बिहारमध्ये रोजगाराचा प्रश्न अजूनही आहे. तेजस्वी यादव लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देतात. नितीश कुमार हेसुद्धा अशाच प्रकारच्या घोषणा करत आहेत."
राज्यात औद्योगिकीकरण कमी झालं आहे, आगामी काळात याकडे लक्ष देण्यात येईल, असं जनता दलाच्या प्रवक्यांनीही म्हटलं.
प्रेम रंजन पटेल यांच्या मते, बिहारमध्ये विकास सर्वात मोठा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्यात एकच सरकार असल्याचा फायदा राज्याला होतो."
रोजगाराशिवाय शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवर नितीश कुमार सरकारला कोंडीत पकण्याचा प्रयत्न राजद करत आहे.
"राज्यात बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. शिक्षण आणि आरोग्य या विषयांवरही सरकार सपशेस अपयशी ठरलं. विकासाचा कोणताही आराखडा नाही. कायदा व्यवस्था तळात आणि भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला आहे. नितीश कुमार बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकले नाहीत. पटना युनिव्हर्सिटीला केंद्रीय विद्यापीठ बनवू शकले नाहीत," असं तिवारी म्हणाले.
जनता दलाचं समीकरण LJP बिघडवणार?
LJP नितीश कुमार यांच्या विरोधात उभी ठाकल्याने आणि जनता दलाविरोधात उमेदवार उभे केल्याने निर्माण झालेला धोका मोठा नाही, त्याचा मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, असंच जनता दल आणि भाजपला वाटतं.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी सांगतात, "NDA ही एक बेजोड आघाडी आहे. चिराग पासवान यांना जनतेमधला असंतोष समजून येत आहे.
कमल नोपानी म्हणतात, "आम्ही नितीश कुमार यांच्या 15 वर्षांचा कार्यकाळ पुढे ठेवून मत मागण्यासाठी जाणार आहोत. LJP फक्त वोटकटवा पार्टी म्हणून शिल्लक राहील. त्यांच्यासारखे लोकच बिहारच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत."
पत्रकार अरुण पांडेय यांच्या मते, "आतापर्यंत ही निवडणूक NDA विरुद्ध महागठबंधन अशी होती. पण आता LJP स्वबळावर लढत असल्यामुळे रंजक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरंगी निवडणूक पाहायला मिळू शकते. LJP च्या उमेदवारांमुळे जनता दलाचं नुकसान होण्याची शक्यता आहे."
नितीश विरुद्ध तेजस्वी
बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्याविरुद्ध तुल्यबळ पर्याय दिसून येत नाही.
अनुभवी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नवोदित तेजस्वी यादव अशी ही लढाई आहे. नितीश कुमारांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो, असं पांडेय यांना वाटतं.
नोपानी यांच्या मते नितीश यांच्यासमोर कोणताच चेहरा नाही, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.
प्रा. चौधरी यांनासुद्धा दोन्ही नेत्यांमधील फरक स्पष्ट दिसून येतो. नितीश आणि तेजस्वी यांच्यात खूप अंतर असल्याचं ते सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)