एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडे आता काय करतील?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले. हा अपवाद म्हणायचा की भाजपाला गळती लागली अशी चर्चा लगेचच सुरु झाली. त्याचं कारणंही सरळ आहे.

केवळ खडसेच नाही, तर भाजपात अस्वस्थ असलेल्या, अन्याय्य वागणूक मिळाली अशी भावना असणा-या नेत्यांची संख्या बरीच आहे. या चर्चेत पहिलं नाव लगेचच आलं ते पंकजा मुंडेंचं. पंकजा मुंडे आता काय करणार?

हा प्रश्न खडसेंच्या बातमीनंतर सगळ्यांच्याच मनात आल्यावर पंकजा मुंडेंनाही प्रश्न विचारले गेले. त्यांच्या अतिवृष्टी दौ-याच्या वेळेस पत्रकारांनी खडसे आणि त्यासंबंधानं प्रश्न विचारल्यावर मुंडे यांनी सांभाळूनच प्रतिक्रिया दिली.

अधिक काही बोलायचं टाळलं. इकडे शिवसेनेनं पंकजा यांना त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देऊनही टाकलं. अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील या सेनेच्या नेत्यांनी आता पंकजांनी शिवसेनेत यावं असं जाहीर आमंत्रण दिलं. अर्थात त्याला पंकजा आणि त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

पंकजा मुंडेंची अस्वस्थता लपून राहिली नाही आहे

खडसे बाहेर पडताच पंकजा यांच्याबद्दल चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे त्यांची भाजपामधली अस्वस्थता आणि घुसमट कायम जाणवत राहिली आहे. त्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री असतानाही असमाधान व्यक्त करत राहिल्या.

त्यांच्या 'मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री' या आशयाच्या वक्तव्यानंतर त्यांचं महत्त्व कसं पक्षांतर्गत आणि मंत्रिमंडळात कमी होत गेलं याची चर्चा झाली. चिक्की घोटाळ्याचे आरोप सभागृहामध्ये झाल्यावर आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याची त्यांची भावना झाली. 'बीबीसी मराठी'च्या एका कार्यक्रमात 'या सरकारच्या काळात जे समुद्रमंथनातून विष निघालं ते सगळं माझ्या वाट्याला आलं' अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.

पण त्याहीपेक्षा परीक्षेचा काळ त्यांच्या वाट्याला 2019च्या निवडणुकीपासून आला. त्यांच्याच परळी मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. धनंजय मुंडे यांच्याकडून झालेला हा पराभव होता. या पराभवाबद्दल अनेक शंका पंकजा समर्थकांनी बोलून दाखवल्या.

त्यांना विधान परिषदेत भाजपा संधी देईल असा अनेकांचा कयास होता. पण त्यांना परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली. असं म्हटलं गेलं की जे जे पक्षामध्ये फडणवीसांचे स्पर्धक मानले गेले त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये धक्का बसला. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना दोन्ही सभागृहाची उमेदवारी मिळाली नव्हती.

पंकजांची ही अस्वस्थता दबून राहू शकली नाही. त्यांचंही एक विस्तारित नाराजीनाट्य महाराष्ट्रात घडलं. त्या आता पक्षाला सोड्चिठ्ठी देणार असं बोललं गेलं. त्यांनी परळीत गोपीनाथगडावर त्यांच्या समर्थकांची मोठी सभाही घेतली. तेव्हा त्या हा निर्णय घेतील असे कयास केले गेले.

पण भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाला त्यांची समजूत तेव्हा काढण्यात यश आलं. पंकजांनी आपण पक्षातून बाहेर पडणार नसल्याचं जाहीर केलं. 'हा माझ्या बापाचा पक्ष आहे, मी कशाला बंड करू' असा प्रश्नही त्यांनी विचारला. याच सभेत मात्र एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर तोफ डागली होती.

आता खडसेंनंतर पंकजा मुंडे काय करतील?

सभागृहात पंकजा मुंडे नसल्या तरीही नुकतीच पक्षानं त्यांना नवी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. त्यांची नुकतीच केंद्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणात रस असला आणि केंद्रात रस नसला, तरीही त्यांच्याकडे ही जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या नाराजीवर मलम नक्कीच लावलं आहे.

गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजातले मोठा जनाधार असलेले नेते होते आणि भाजपला त्याचा फायदाही झाला. त्यांच्यानंतर पंकजा आणि खडसे हे भाजपाचे चेहरे बनले. आता खडसें पश्चात पंकजा या भाजपचा एक महत्त्वाचा बहुजन चेहरा आहेत. अशा स्थितीत त्या पक्ष सोडतील का?

खडसे राष्ट्रवादीत गेले. पण मग पंकजांसाठी, त्यांनी विचार करायचाच ठरवल्यावर, कोणता पर्याय असेल?भाजप सोडल्यावर महाराष्ट्रातले तीन महत्त्वाचे पक्ष आहेत ते तीनही आता एकत्र 'महाविकास' आघाडी सरकारमध्ये आहेत. त्याच सरकारमध्ये पंकजा यांचे बंधू आणि राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे मंत्री आहेत? तिथं त्या जातील का? धनंजय हे 'राष्ट्रवादी'चे महत्वाचे नेते आहेत. मुख्य म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा वारसा त्या चालवतात. त्यांचं नाराजीनाट्यही जेव्हा महाराष्ट्रात घडलं होतं तेव्हाही ते पक्ष सोडून गेले नव्हते.

जी शिवसेना त्यांना आमंत्रण देते आहे त्या सेनेचे मराठवाड्यात अनेक नेते आहेत. तिथं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी पंकजांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. 'उद्धव ठाकरे हे मला भावासारखे आहेत' असं पंकजा पूर्वी म्हणाल्या आहेत, पण ते उद्धव पंकजा यांना राजकीयदृष्ट्या काय देऊ शकतील, हाही प्रश्न उरतोच. शिवसेनेतली एक आणि दोन नंबरची जागा उद्धव आणि आदित्य यांच्यासाठी राखीव आहे. पंकजा मुंडेंना तिसऱ्या स्थानासाठीच संघर्ष करावा लागेल.

दुसरीकडे, भाजपाच्या नजरेतून बघताना, पंकजा मुंडेंसारखा जनाधार असलेला ओबीसी नेता गमावणं हे परवडण्यासारखं आहे का? सत्ता हातातून गेलेली असतांना पंकजा यांना पक्षापासून लांब जाणं हे त्यांच्यासाठी योग्य ठरेल का? म्हणूनच जेव्हा जेव्हा त्या नाराज होतात तेव्हा तेव्हा त्यांची समजूत घातली जाते.

त्या केवळ ओबीसी चेहराच नाही, तर भाजपच्या राज्यभर ठाऊक असलेल्या एकमेव महिला नेत्या आहेत. त्या गेल्या तर पक्षाचं नुकसान करू शकतील, याची जाणीव झाल्यामुळेच कदाचित पक्षानं त्यांना आता नवी जबाबदारीही दिली आहे. खडसे यांच्याबाबतीत जे धोरण पक्षानं अवलंबलं त्यापेक्षा पंकजांना वेगळी वागणूक दिली जातेय.

कोणत्याही जनाधार असलेल्या राजकीय नेत्याकडे अशा स्थितीत तीन पर्याय असतात. एक म्हणजे स्वत:च्याच पक्षात स्वत:च स्थान पुन्हा हवं आहे तसं निर्माण करणं. जसं गोपीनाथ मुंडेंनी केलं. दुसरा म्हणजे पक्षांतर करणं, जे खडसे वा राणे यांनी केलं. आणि तिसरा म्हणजे नवा पक्ष स्थापन करणं जो पर्याय राज ठाकरे यांनी निवडला होता.

'पंकजा खडसेंच्या वाटेवर जाणार नाहीत'

पंकजांचं राजकारण जवळून पाहणा-या राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना पंकजा भाजपातच राहतील आणि खडसेंचा वाटेवर जाणार नाहीत असं वाटतं. "मुंडेंचं भाजपातलं स्थान वेगळं आहे त्यामुळे त्या आहे तिथंच राहतील. शिवाय भाजपालाही त्या हव्या आहेत. म्हणूनच त्यांना केंद्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली गेली. त्यामुळं तुम्हाला सामावून घेतलं जाईल हा मेसेज त्यांना गेला आहे. दुसरं म्हणजे धनंजय मुंडे 'महाविकास'आघाडीमध्ये असतांना त्या तिथं जाणार नाहीत. शिवसेनेला त्या येणं पथ्यावर पडेल पण ते सेना-राष्ट्रवादी यांच्या संबंधांवर अवलंबून असेल," असं नानिवडेकर म्हणतात.

असंच मत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांचंही आहे. "पंकजा जाणार नाहीत कारण त्या आणि खडसे आपापल्या राजकीय करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभे आहेत. खडसे रिस्क घेऊ शकतात, पंकजा नाही. शिवाय, जशी वागणूक खडसेंना मिळाली तशी पंकजांना मिळाली नाही. खडसेंचं तिकीटच कापलं होतं. त्यामुळं असं टोकाचं पाऊन पंकजा घेणार नाहीत. एक नक्की, की या घटनेमुळं भाजपातला फडणवीस-विरोधी गट जो आहे, त्यांना बोलायला मुद्दे मिळतील," असं देशपांडे म्हणतात.

अर्थात, पंकजा मुंडेंबद्द्लही ही चर्चा एकनाथ खडसे बाहेर पडले या निमित्तानं होते आहे. गेला बराच काळ त्या शांत आहेत. पण राजकारणात शांततेचा अर्थ सारं आलबेल आहे असा होत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)