You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची खरंच मदत केली का?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
23 सप्टेंबरला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 32 साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या 32 कारखान्यांमध्ये बीड जिल्ह्यातील परळीमधल्या वैद्यनाथ साखर कारखान्याचाही समावेश आहे.
हा कारखाना माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. हा कारखाना बरेच महिने अडचणीत होता. ऐन निवडणुकीच्या वेळी कर्मचार्यांचे पगार थकल्यामुळे कर्मचार्यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे या अडचणीत आल्या होत्या. पण अखेर या कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाली. वैद्यनाथ साखर कारखान्याला थकहमी मिळण्यासाठी धनंजय मुंडे यांनी विरोध न करता राजकारण बाजूला ठेवून आग्रही मागणी केली असा दावा स्वतः धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तर पंकजा मुंडे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे. हा श्रेयवाद आहे का? धनंजय मुंडे हे खरंच पंकजा मुंडेंच्या मदतीला धावून आले का? याचा राजकीय अर्थ काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट...
सर्वाधिक थकहमी भाजप नेत्यांच्या कारखान्यांना!
राज्य सरकारने अडचणीत असलेल्या 32 साखर कारखान्यांना एकूण 392 कोटी रूपयांची थकहमी दिली. 32 साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 15 साखर कारखाने हे भाजप नेत्यांचे आहेत. या 15 साखर कारखान्यांना 167 कोटी 36 लाखांची थकहमी मिळाली आहे. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 8, कॉंग्रेसचे 5, शिवसेनेचे 2 आणि अपक्ष नेत्याच्या 1 कारखान्याचा समावेश आहे.
यंदा राज्यात ऊसाचं उत्पादन चांगले आहे. त्यामुळे जर हे कारखाने बंद राहिले तर शेतकर्याचं ऊसाचं पीक पडून राहील. यामुळे शेतकरी अडचणीत येईल आणि मग सरकारला या उभ्या ऊसाला भरपाई द्यावी लागू शकते म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं.
'आता तरी वैद्यनाथ नीट सांभाळा'
वैद्यनाथ साखर कारखान्याला थकहमी मिळवून देताना राजकीय विरोध बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
ते म्हणतात, "राजकीयदृष्ट्या या थकहमीची विरोध करता येऊ शकला असता पण ही थकहमी वैद्यनाथला मिळावी यासाठी आपण बीडचे पालकमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह धरला. हजारो शेतकरी आणि शेकडो कर्मचारी 'वैद्यनाथ' कारखान्याचे लाभार्थी आहेत, त्यांचे हित लक्षात घेत आम्ही यात कधीही राजकारण आणले नाही, उलट कधीही मदत करण्याचीच भूमिका घेतली आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी अथक प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याला आशिया खंडात अग्रस्थानी नेऊन ठेवले होते.
"त्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पगारासाठी उपोषणाची वेळ यावी, हे अत्यंत दुर्दैवी होते. यावर्षी कारखाना गळीत हंगाम सुरू होऊन परिसरातील 100 % उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. भविष्यात कधीही वैद्यनाथ कारखान्यासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर असू."
ते पुढे म्हणाले, "आता राज्य सरकारने दिलेल्या थकहमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत."
'इतरांनी श्रेय घेऊ नये'
धनंजय मुंडे यांनी केलेल्या दाव्यानंतर पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार करत मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि साखर संघाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच 'वैद्यनाथ' ला थकहमी मिळाली आहे. त्यामुळे इतरांनी श्रेय घेऊ नये असं म्हटलं.
त्या पुढे म्हणाल्या " मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. या कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल मी सर्वांचे आभार मानते."
स्थानिक राजकारणाचा भाग?
वैद्यनाथ साखर कारखान्याची बांधणी ही गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात या कारखान्याशी निगडीत घडामोडींना महत्त्व आहे. या कारखान्याच्या कमिटीवर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे स्थानिक राजकारणासाठी धनंजय मुंडे यांनी श्रेय घेणं स्वाभाविक आहे, असं जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात.
ते पुढे म्हणतात, "या कारखान्याला थकहमी मिळवून देणं हा एकट्या धनंजय मुंडे यांचा निर्णय नाही. पंकजा मुंडे यांचे शिवसेनेशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंकजा यांना या कारखान्याला थकहमी मिळण्यासाठी अडचणी असल्याचं दिसत नाही. धनंजय मुंडे यांना विरोध करता आला असता पण त्यांनी तो त्यांनी टाळला हे खरं आहे. पण जर हा निर्णय एकट्या धनंजय मुंडे यांच्या हातात असता आणि त्यांनी तो निर्णय विरोध न करता घेतला असता तर त्याला पूर्ण मदत करणं म्हटलं गेलं असतं. आता तसं दिसत नाही. हा श्रेयवाद स्थानिक राजकारणाचा भाग आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)