धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे वाद परळीत चिघळला, बहिणीला भोवळ अन् भावाच्या डोळ्यांत पाणी

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या असल्या, तरी बीडमधील राजकारण तापलंय.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या कथित टीकेमुळं नवा वाद उभा राहिलाय.

धनंजय मुंडे यांनी कथित टीका केलेली व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आणि धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पंकजा मुंडे यांच्यावर टीका केल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे विरूध्द कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं लोकसत्तानं म्हटलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहाटकर यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची सुओ मोटो दखल घेतली असून मुडेंना या प्रकरणी नोटिस पाठवली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत पंकजा मुंडेवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जातोय. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लिपही सोशल मीडियावरून पसरवली जातेय.

मात्र, धनंजय मुंडे यांचं हे भाषण नेमकं कुठं झालं आणि त्यातल्या आक्षेपार्ह विधानांबाबत किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

दुसरीकडे, परळीत धनंजय मुंडे यांच्या या भाषणाचा दाखल देत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकेची तोफ डागली.

याच भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडे व्यासपीठावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यामुळं सभेच्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडाला.

कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.

धनंजय मुंडे यांचं म्हणणं काय?

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाषणाच्या क्लिपबद्दल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरणं दिलं. ते म्हणाले, "शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी."

तसेच, "अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे," असंही धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी काय गुन्हा केलाय त्यामुळे बहिण-भावाच्या नात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं. मला तर जग सोडून जावंसं वाटतंय असं धनंजय मुंडे म्हणाले.

मला तीन मुली आहेत, बहिणी आहेत तेव्हा मी कधी कोणत्याही महिलेबाबत असं वक्तव्य केलं नाही.

बहिण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जर मला शब्द टाकला असता तर मी निवडणुकीतून माघार घेतली असती असं धनंजय मुंडे म्हणाले. पण निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं, असं मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या टीकेमुळंच पंकजांना भोवळ - सुरेश धस

भाजपचे नेते सुरेश धस यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत म्हटलं, "आता मी तो व्हीडिओ पाहिला. तो व्हीडिओ संवेदनशील, भावनिक असून, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं टीका केली गेलीय. त्यामुळं पंकजा मुंडे दिवसभर नाराज होत्या."

"राजकारण कोणत्या स्तराला चाललंय. व्हायरल व्हीडिओतले काही शब्द सांगूही शकत नाही. असंस्कृतपणाचं लक्षण आहे. 29 वर्षे राखी बांधणाऱ्या बहिणीबद्दल काय बोलावं हे राष्ट्रवादीच्या लोकांनी ठरवलं पाहिजे," असंही सुरेश धस म्हणाले.

पंकजा मुंडे यांना प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकामुळं थकवा आल्यानं भोवळ आल्याची माहिती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. तर भाजप प्रवक्ते शिरीष बोरालकर यांनी सांगितलं की, पंकजा मुंडेंना तातडीनं जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. उपाध्ये आणि बोरालकर एनडीटीव्हीशी बोलत होते.

परळीत काय फरक पडेल?

परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला हिंसेचा इतिहास आहे. मात्र, काल धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात जे झालं तसा इतिहास नाही, असं बीडचे वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात.

धनंजय मुंडे यांच्या कथित टीकेच्या व्हीडिओमुळं परळीत निवडणुकीवर काही परिणाम होईल का, हा सहाजिक प्रश्न आता उपस्थित होतोय.

सुशील कुलकर्णी सांगतात, "धनंजय मुंडेंच्या कथित टीकेचा परिणाम होईल. ग्रामीण भागात महिलांची मानसिकता धनंजय मुंडेंच्या विरोधात गेलीय."

"सोशल मीडियावरही धनंजय मुंडेंच्या बातम्यांचं निरीक्षण केल्यास लक्षात येईल, महिलांच्या कमेंट्स वाढल्यात. कालच्या घटनेनंतर महिलांनी धनंजय मुंडेंवर टीकात्मक कमेंट केल्याचे दिसून येतंय. शिवाय, या घटनेमुळं कुंपणावरचे जे लोक होते, ते पंकजा मुंडेंच्या बाजूनं झुकण्यास मदत होईल," असं कुलकर्णी म्हणतात.

परळीत कुणाचं वजन?

परळी शहर हे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजपसाठी मारक ठरलंय. गोपीनाथ मुंडे हयात असतानाही परळी शहरानं त्यांना फारशी मदत केल्याची आकडेवारी सांगत नाही. गोपीनाथ मुंडेंना परळी शहरानं लोकसभा किंवा विधानसभेला लीड दिली नव्हती.

परळी विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई आणि परळी या दोन तालुक्यांचा ग्रामीण भागही येतो.

"अंबाजोगाईच्या ग्रामीण भागात मुंदडा यांचा प्रभाव आहे. ते आधी राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये आलेत. त्यामुळं तोही फायदा पंकजा मुंडे यांना मिळेल," असं सुशील कुलकर्णी सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)